जनरेशन गॅप

जनरेशन गॅप

जनरेशन गॅप म्हणजे दोन पिढ्यांमधील अंतर. या अंतर पडण्यातून केवळ विसंवादच घडेल असे नाही. सामाजिक, कौटुंबिक स्थित्यंतराचा तो एक स्वाभाविक परिणाम आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे हे हिताचे आहे.

सध्या सर्वत्र ज्या अनेक पारिभाषिक शब्दांचा वारंवार उपयोग सर्व माध्यमांमधून होतो आहे, त्यापैकी एक म्हणजे "जनरेशन गॅप'. असे शब्द प्रचारात यायला त्यामागची परिस्थिती अगर प्रत्यक्ष अनुभव येण्याचे कारण असते. खरे तर "जनरेशन गॅप' ही संज्ञा अलीकडच्या काळात फारच प्रचारात आली, याचे मुख्य कारण म्हणजे बदलती कौटुंबिक व सामाजिक परिस्थिती. "जनरेशन गॅप" याचा साध्या मराठीतील अर्थ म्हणजे "पिढ्यांमधील अंतर'. एक पिढी म्हणजे सुमारे पंधरा-वीस वर्षांचे अंतर. आधीची पिढी व त्यानंतरची पिढी यामधील आचार, विचार, राहणी, सवयी, रुची यामधील दिसून येणारा फरक म्हणजे या दोन पिढ्यांमध्ये पडलेला फरक म्हणजेच अंतर होय.

पूर्वीचा काळ पाहिला तर समाज, कुटुंब एका बंदिस्त वातावरणात असे. मुख्यतः एकत्र कुटुंबव्यवस्था असल्याने घरातील सर्व सदस्य दैनंदिन जीवनात सतत एकमेकांशी संपर्कात राहत असत. मोठ्या पिढीचे वर्तन, व्यवहार, आचार, विचार, राहणी यांचे पुढच्या पिढीसमोर एक जिवंत चित्रच असे. त्यामुळे घरातील थोरली मंडळी हीच एक वस्तुपाठ नंतरच्या पिढीसमोर ठेवत असे. स्वाभाविकपणे आदर्श जीवनाचे मापदंड घरातूनच शिकायला मिळायचे. याचे साधे उदाहरण म्हणजे नियमित व्यायामाची सवय.

घरामधील वरिष्ठ मंडळी, काका - वडील, मोठा भाऊ त्याकाळी घरामध्येच व्यायाम करीत असत. त्या वेळचे व्यायामाचे प्रकारही साधे-सोपे होते. म्हणजे जोर, बैठका, सूर्यनमस्कार. फारच क्वचित एखाद्या तालमीत जाऊन व्यायाम करणारे दिसायचे. जास्तीत जास्त महाराष्ट्र मंडळ (पुणे) यांसारख्या एखाद्या सामायिक व्यायाम केंद्रात जाऊन व्यायाम करणे - पोहणे अशी प्रथा असे. वडील, काका साधा व्यायाम करीत आहेत, रोज सूर्यनमस्कार घालीत आहेत. हे घरातील तरुण पिढी म्हणजे मुलगा, पुतण्या रोज पाहत असायचे. नाही म्हटले तरी, त्याचा प्रभाव पडतोच. मग व्यायाम करताना कदाचित वडील - मुलगा, काका-पुतण्या असे एकत्र जोर-बैठका मारत आहेत असे चित्र दिसले, तर त्याचे आश्‍चर्य वाटत नसे. कौटुंबिक जीवनाची ती एक रुळलेली वाट असे. त्यासाठी मुद्दाम काही करावे लागत होते असेही नाही. व्यवस्थापन शास्त्रात याला "अंतर्गत प्रभाव' असे म्हटले जाते. हे अनुकरण चांगल्या - वाईट सर्वच वृत्तींचे असू शकते.

पूर्वीच्या त्या बंदिस्त वातावरणात बंडखोरी करणेही सोपे, शक्‍य नसायचे. त्यामुळे घरातील मोठी पिढी जसे वागेल, बोलेल तसेच पुढची पिढीही करीत असे. प्रस्थापित प्रथा-परंपरा मोडून स्वतःची वेगळी वाट धरण्याचे धाडस दाखविण्याची उद्दामवृत्ती त्या वेळी नव्हती. त्या वेळची तरुण पिढी आहे ते सर्व स्वीकारत होती. म्हणजे त्यांच्याकडे दुसरा विचार करण्याचा मार्ग नव्हता, असे नाही. पण सभोवतालची कौटुंबिक - सामाजिक परिस्थिती अशी होती, की जे घरात चालत आलेले आहे, ते उत्तम आहे, सुखावह आहे आणि त्यामुळे काही नुकसान होत नाही हे तरुण पिढीला जाणवत असल्याने आधीच्या पिढीच्या मळलेल्या वाटेने जाणे अत्यंत स्वाभाविक वाटायचे. या सर्वांचा एकूण परिणाम म्हणजे मोठी पिढी व पुढची पिढी यांच्यामध्ये पूर्वीच्या काळी जनरेशन गॅपच नसायची निदान तसें काही जाणवायचे नाही.

जमरेशन गॅप ही संज्ञा सध्याच्या काळातील आहे आणि कौटुंबिक - सामाजिक परिस्थितीमध्ये जसजशी स्थित्यंतरे होत गेली त्याप्रमाणे ही गॅप वाढतच गेली असे दिसते. सध्याच्या पिढीचा विचार केला तर त्यांचे ज्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाशी संबंध येतो तेथील घटक पूर्वीपेक्षाही वेगवान पद्धतीने बदलत असतात. शिवाय त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आकांक्षा, उद्दिष्टे यामध्येही फरक पडतो. कौटुंबिक व्यवस्था बदलली आहे. पूर्वी तीन-चार भाऊही एकत्र राहत होते. आता वडील व मुलगाही स्वतंत्र राहताना दिसतात. यामुळे आजच्या पिढीला पूर्वीपेक्षा स्वतंत्रपणे राहायला, विचार करायला आवडते. स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नाही याचेही भान त्यांच्या मनात असतेच. पण यामुळेच मोठ्या पिढीची मळलेली वाट न धरता आपण आपली वेगळी, स्वतंत्र वाट धरावी असा पिढी-सुलभ विचार त्यांच्या मनात येतो व त्यातूनच निर्माण होते जनरेशन गॅप! बाहेरच्या जगाचा नव्या पिढीवरचा प्रभावही याला कारणीभूत आहे. आताची पिढी ही बाहेरच्या जगात जास्त वावरत असल्याने तेथील स्थित्यंतरे, बदल यानुसार आपल्या जीवनशैलीत बदल करणे अपरिहार्य वाटते. त्यातूनच मोठ्या पिढीपासून ते बाजूला जातात.

जनरेशन गॅप ही सामाजिक, कौटुंबिक परिस्थितील स्थित्यंतराचा एक स्वाभाविक परिणाम आहे. त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे हे हिताचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com