पतंग जेव्हा विहरण्यास सुरवात होते...

kite
kite

माणसाला माणूस म्हणून भेटायचे असते याचेच भान संपते. माणूस असूनही पशुसारखे वर्तन घडत राहते आणि त्यातून माघारी येण्याचा मार्गही विसरला जातो. हे टाळताही येऊ शकले असते, होय नक्कीच टाळता आले असते, जर हा पतंग जेव्हा विहरण्यास सुरवात होते, तेव्हाच जर त्याचा मांजा भक्कम राहिला असता तर...

निळ्याशार आकाशात विविधरंगी पतंगांची वाऱ्यासोबत स्पर्धा रंगात आली होती. बालचमूंच्या बोलांची त्याला साथसंगत लाभली होती. चिमुकल्या हातांची मांजा घट्ट धरून पतंगाला ताब्यातून निसटू न देण्याची कसरत सुरू होती. डोळ्यांच्या बाहुल्या पतंगांसोबत आकाशाच्या निळाईवर विहरत होत्या. त्या नजरेत कुतूहल, आश्‍चर्य, भीती, उत्सुकतेचे इंद्रधनुष्य उमटून आले होते. पतंगाच्या गिरकीसोबत मांजावरील पकड घट्ट होत होती, तर वाऱ्याची साथ मिळते हे ध्यानी येताच तीच पकड झेपावण्यासाठी सैलावत होती.

आपल्या पतंगाला वरच्या हवेवर स्वार करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच साथीदार कोठे पोचला यावरही नजर ठेवली जात होती. तो कोठे आहे याचं भान राखत आपल्या पतंगाला ढिल देण्याचे कसब साधणे सुरू होते. आपल्याच पतंगाची भरारी अधिक उंच व्हावी यासाठीचे प्रयत्न कसोशीने चालले होते. निर्व्याज मनाचा एक सुरेख मेळा तेथे भरला होता. तेथे इर्षा होती; पण ती जीवघेणी नव्हती. एकाद्याचा पतंग कटला की त्यावर एकमेकांना टाळ्या देत तोंडातून चित्कार काढत त्याचा आनंद लुटला जात होता. आनंदाच्या वाहणाऱ्या झऱ्यात ती बालमंडळी डुंबून गेली होती. किती निरागस असतं ना बालपण...

आपण मोठे होतो आणि आपलं आयुष्यंच बदलून जातं. हे आयुष्य असंच पतंगासारखंच आहे नाही. या पतंगाला धरून ठेवणारा मांजा जर घट्ट नसेल तर तो केव्हा वाऱ्याच्या प्रवाहावर भरकटेल याचा काही नेम नाही. जगण्याचा प्रवास सुरू होतो आणि जगण्याचे वेगवेगळे रंग आपल्या अंगावर येऊ लागतात. या आयुष्याचे विविध कंगोरे तोपर्यंत अनुभवाला आलेलेच नसतात. या आयुष्याची तरा ही किती वेगळी, अनाकलनीय. त्याचा ना ठाव लागतो ना थांग. येथे ठामपणे बोलताच येत नाही. राग, लोभ, द्वेष, मत्सर, प्रेम, कपट, जात, धर्म अशा अनेक चक्रव्युहांनी अवघं व्यापून राहतं. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना जिवाची अगदी दमछाक होत राहते. अगदी मोजक्‍याच लोकांना त्यावर स्वार होण्याचं, त्यातून बाहेर पडण्याचं कसब साधतं; मात्र बहुतेक जण यातच गुरफटून जातात आणि हळूहळू फेकले जातात. अनेकांची धडपड अपुरी ठरते. अनेकांच्या प्रयत्नांची झेप तोकडी पडते. कित्येकांनी उत्साहाने घेतलेली झेप लक्ष्यापर्यंत पोचतच नाही. ज्या वेगाने ते वर गेलेले असतात त्याच वेगाने खाली येतात. अपयशाचा धक्का पचवणे त्यांना जड जाते. काही हार मानतात आणि विझून जातात.

अनेक जण काम, क्रोध, मोह, मद, मत्सर यामध्येच गुरफटून राहतात. भांडणे, वाद, कुचाळक्‍या, कट, कारस्थान यातच धन्यता मानत राहतात. दुसऱ्याचे पाय ओढण्यात मश्‍गुल होतात. दुसऱ्याच्या यशाने आनंदीत न होता मत्सर करत राहतात. मदतीचा हात देण्याएवजी अडचणी उभ्या करण्यात गढून जातात. नव्याचे स्वागत करण्यापेक्षा जुन्यालाच कवटाळून नव्याचा तिरस्कार करत राहतात. जगणं सुंदर असते हे विसरून तेच अवघड बनवत राहतात. आनंदाच्या झऱ्याला बांध घालून त्याचा निर्मळपणा खुंटवतात. विचारांच्या झऱ्यांची डबकी होतात आणि वाहण्यातील प्रसन्नपणा हरवून जाते. जगण्याचं सोपं गणित अगदी अवघड करून ठेवले जाते. त्याचा ताळाच जुळत नाही आणि मग एकमेकांवर दोषांरोपांची चिखलफेक करत आयुष्य अक्षरशः वाया घालवले जाते.
माणसाला माणूस म्हणून भेटायचे असते याचेच भान संपते. माणूस असूनही पशूसारखे वर्तन घडत राहते आणि त्यातून माघारी येण्याचा मार्गही विसरला जातो. हे टाळताही येऊ शकले असते होय नक्कीच टाळता आले असते, जर हा पतंग जेव्हा विहरण्यास सुरवात होते, तेव्हाच जर त्याचा मांजा भक्कम राहिला असता तर...
--
गिरकी घेणाऱ्या पतंगाला मांजाची घट्ट सोबत वाऱ्यावर सोडू देत नाही. त्याचं स्वतंत्र अस्तित्व राखून पतंगाला विहरण्यासाठी हाच मांजा पूरकपणे काम करत राहतो. पतंग आकाशात जरी विहरत असला तरी त्याला हवे त्या दिशेने नेण्यासाठी खाली कुशल हात असावेच लागतात. छोट्या चिमुकल्यांना हे कसब जमते; कारण त्यांची मनं स्वच्छ असतात. त्यावर कोणत्याच संस्कारांची पुटं चढलेली नसतात आणि जगण्याच्या काटेकोर कायद्यांचा विळखाही पडलेला नसतो. ते केवळ आनंदयात्रेचे वारकरी असतात. त्यांच्या चिमुकल्या मुठींमध्ये स्वप्ने एकवटलेली असतात. ती पतंगाच्या रूपाने भरारी घेत असतात; पण जेव्हा तीच चिमुकली पावले जगण्याच्या बाजारात उतरतात तेव्हा सर्व आयामच बदललेले असतात.

आई, बाबा, आजी-आजोबा, बायको, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिण, शिक्षक हे मांजा बनून आयुष्याचा तोल सांभाळतात. जगण्याला दिशा देतात, उंच भरारीत बळ भरतात. छोटे दोस्त जसे पतंग दूरवर जात असताना त्याच्या काळजीने मांजाची ढिल अगदी बेताबेताने देतात तसेच वरील नातीही तुम्हा-आम्हाला जपत असतात. फक्त आपण ते जाणून घेणं गरजेचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com