'मोहिनी'चे भूत

प्रसाद राजन क्षीरसागर
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

एखादे गाणे वेड लावते. आसपासचे सगळेच त्याविषयी बोलायला लागतात आणि आपणही नकळत त्या गाण्याच्या, त्या नायिकेच्या, त्या चित्रपटाच्या मोहात अडकतो.

एखादे गाणे वेड लावते. आसपासचे सगळेच त्याविषयी बोलायला लागतात आणि आपणही नकळत त्या गाण्याच्या, त्या नायिकेच्या, त्या चित्रपटाच्या मोहात अडकतो.

चांबळीच्या कृषी औद्योगिक विद्यालयात शिकत होतो. दहावीच्या अभ्यासाची जोरदार तयारी सुरू होती. शाळेत नाईट स्टडी सर्कल सुरू झाले. या तासांना मुली नसल्याने मुलेही आपल्याला जे समजले नाही, ते बिनदिक्कतपणे शिक्षकांना विचारून घेत होते. एरवी शाळेत मुलींसमोर, शिक्षकांना विचारायची लाज वाटायची. जी गत मुलांची तीच मुलींची. त्याही एखाद्या विषयातले काही समजले नाही, तरी विचारायच्या नाहीत. शांत असायच्या. मुलांसाठी रात्रीचे जादा तास, तर मुलींसाठी शाळा सुरू होण्यापूर्वी जादा तास ठेवला होता. दर रविवारी मात्र मुला-मुलींचा एकत्र जादा तास व्हायचा.

एक रविवार अजून चांगला आठवतोय मला. त्या वेळेस रामायण ही मालिका प्रचंड गाजत होती. त्या रविवारी सकाळी साडेसात वाजता जादा तास सुरू झाला. साधारण साडेआठपर्यंत संपेल, असे आम्हाला वाटत होते; पण नऊ वाजले, तरी गणिताच्या सरांचे थांबायचे नाव नाही. आमची चुळबूळ सुरू झाली होती. कुजबुज झाली. पोरे म्हणाली की, तू सरांशी बोल. सर तुझे ऐकतील. मी सरांसोबतच राहत होतो. त्यामुळे इतरांपेक्षा सर माझ्या अधिक जवळचे होते. पण माझे काही धाडस होत नव्हते. शेवटी वर्गातल्या एका "मुली'ने डोळ्यानेच मला विनंती केली, की सरांना थांबव आता. सव्वानऊ वाजत आले आहेत. आता मुलीच्या विनंतीला कसे डावलणार म्हणून मग सरळ उठून सरांना विनंती केली, ""सर, सव्वानऊ वाजले आहेत आणि सध्या रामायण मालिकेत राम-रावणाचे युद्ध सुरू आहे. आम्हाला पाहायचे आहे. प्लीज आम्हाला सोडा.'' सरांनी घड्याळाकडे पाहत आम्हाला ताबडतोब सुटी दिली.

शाळेने गेस्ट हाउसमधील तीन खोल्या अविवाहित शिक्षकांना राहायला दिल्या होत्या. तेथेच शिक्षकांबरोबर मी राहत असे. रेडिओव्यतिरिक्त करमणुकीचे कोणतेही साधन आमच्याकडे नव्हते. रोज सकाळी सहा-साडेसहापासून रेडिओ चालू होत असे. एका गाण्याची मोहिनी पडली होती. "तेजाब'मधील मोहिनीची मोहिनी. डिंग डॉंग डिंग.... एक.. दो.. तीन.. "तेजाब' चित्रपटाची जाहिरात सुरू होती. जवळपास रोज हे गाणे लागायचे. शिक्षकही हे गाणे गुणगुणायला लागले होते. मीही अधूनमधून हे गाणे गुणगुणत होतो. आमचे शिक्षक खास "तेजाब' पाहायला पुण्याला गेले होते. चित्रपट पाहून आल्यावर चार-आठ दिवस त्या मोहिनीचेच (माधुरी दीक्षित) कौतुक सुरू होते. माधुरीचा नाच, तिचे सौंदर्य, तिचा अभिनय, जणू सर्व शिक्षक मोहिनीच्या मोहात अडकले होते. मी नुसतेच हे सर्व ऐकत होतो. मलाही या मोहिनीला पाहायचे होते; पण दहावी होती. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नव्हते.

दहावीचे जादा वर्ग झाले. बोर्डाची परीक्षा झाली. दोन-तीन महिन्यांची सुटी झाली. पण, माझ्या डोक्‍यातून ती मोहिनी काही केल्या जात नव्हती. दूरचित्रवाणीवर हे गाणे पाहिले होते. माधुरीला पाहिले होते. पण पूर्ण चित्रपट पाहायचा योग काही अजून आला नव्हता. दहावीनंतर सासवडच्या वाघिरे महाविद्यालयात अकरावी शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होतो. आमच्या वसतिगृहाच्या बाजूलाच आमच्या प्राचार्यांचा बंगला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या "कमवा व शिका' या योजनेअंतर्गत अर्ज केला. माझे शेती विद्यालयात शिक्षण झाले असल्याने, मला प्राचार्यांच्या बंगल्यातील बागेची निगा राखण्याचे काम देण्यात आले. रोज सकाळी एक तास काम करायचे. महिना शंभर रुपये विद्यावेतन. घरी आई-बाबांना याबद्दल काहीच बोललो नव्हतो. पूर्ण महिना काम केल्यावर शंभर रुपये मिळाले. त्याच वेळी सासवडच्या "दौलत' चित्रपटगृहात "तेजाब' लागला होता. खिशात शंभर रुपये होते आणि समोर मोहिनी. रात्री वसतिगृहातील मेसमध्ये जेवून मित्राबरोबर "तेजाब' पाहिला. माधुरीचा नाच, तिचें सौंदर्य, चित्रपटातील गाणी, अनिल कपूरचे विविध रंगी स्वेटर्स, त्याचे पोरी पटवण्याचे फॉर्म्युले... महाविद्यालयीन तरुणांना जे जे हवे ते सर्व त्या चित्रपटात होते.

त्या रात्री झोपच लागली नाही.... डोळे बंद केले की डोळ्यांसमोर मोहिनीच यायची... तिचे हसणे...तिचा नाच... गाणी ... गाण्यातली ती दृश्‍ये.... तिचा स्विमिंग कॉश्‍चूममधला सीन... पहाटे कधीतरी झोप लागली असेल... दुसऱ्या दिवशी उठलो... महाविद्यालयात गेलो... महाविद्यालयातील सर्व मुलींमध्ये माझी नजर मोहिनी शोधत होती... दिवस कसा तरी ढकलला... अन्‌ परत रात्री चित्रपटगृहात मोहिनीला भेटायला गेलो. सलग चार दिवस "तेजाब' पाहिला. माझ्या मित्रांनी मला "मोहिनीचे भूत बसलंय' असे चिडवायला सुरवातही केली होती. महाविद्यालय, अभ्यास, माळीकाम, बसस्टॅंडवर जाऊन आईला भेटणे सारे सुरूच होते.... पण लक्ष मात्र कशात लागत नव्हते...अशातच पहिली चाचणी परीक्षा दिली. मोहिनीच्या भुताने आपला प्रभाव दाखवला होता. दोन विषयांत लाल शेरा मिळाला होता.

Web Title: prasad kshirsagar write article in muktapeeth