हरवलेली सुटी

हरवलेली सुटी

उन्हाळ्याची सुटी म्हणजे मामाच्या गावाला जाण्याची सुटी हे ठरलेलेच असायचे. शाळा संपली आणि ही उन्हाळ्याची सुटीही हरवली. तितकीच अचानक ही हरवलेली सुटी आठवली.

नुकतीच एसटीने प्रवास करताना काही लहान मुले आपल्या आईसोबत मामाच्या गावाला जाताना दिसली, तेव्हा त्या मुलांना पाहून माझ्या सुटीतील आठवणी जाग्या झाल्या. आठवू लागले, की "मामाच्या गावाला जाऊया' गात आपण शेवटच्या सुटीवर कधी गेलो. आठवेनाच पटकन. शाळा संपून अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आणि नंतर सारं विसरलोच आपण. ते मजेचे दिवस कधी निघून गेले ते समजलंच नाही, कुठे हरवलीय आपली उन्हाळ्याची सुटी.

शाळेला सुटी लागल्यावर दुसऱ्याच दिवशी मामा घ्यायला यायचे. नगर जिल्ह्यात, एका छोट्याशा जेऊर हैबती गावात मामाचा मळा होता. गणेश विठ्ठलराव शेटे आणि सुरेश विठ्ठलराव शेटे. छोटे मामा मळ्यात राहायचे. त्यांना सगळा गाव "काका' म्हणत असे. गर्द दाट हिरव्यागार झाडीत मामांचे छोटेशी पडवी असलेले घर होते. सुरूची उंच झाडे दूरवरूनच दिसायची, आता घर जवळ आले हे कळायचे आणि मन आनंदाने उड्या मारायला लागायचे. घरी माझी पणजी, आजी, मामा, मामी आणि मामाची मुले असा सगळा गोतावळा होता. आजोबांनी नारळ, आंबा, चिकू, चिंच अशी सगळी झाडे घराच्या आजूबाजूला लावलेली होती. माझ्या आजोबांना सगळे लोक "शेटे सर' म्हणून ओळखत असत, ते शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. त्यांना झाडांची फार आवड होती, पण ती सगळी मोठी झालेली झाडे पाहायला ते राहिले नाहीत.

घराच्या समोरच्या शेताच्या बांधावर आंब्याची झाडे होती. आम्ही सुटीवर जात असू, त्या वेळी हिरव्यागार कैऱ्या त्या झाडांवरती झोका घेत असायच्या. एका ओळीत उभी असलेली ही झाडे म्हणजे रांगेत जणू सैनिक उभे आहेत आणि ते आमचे उन्हापासून संरक्षण करत आहेत असे वाटायचे. वारा आला, की झाडांची पाने टाळ्या वाजवल्यासारखी जोरात आवाज करायची, जणू काय ती आमचे आनंदाने स्वागत करीत आहेत. तो आवाज आजही कानांत घुमत असतो. त्या झाडाच्या गार सावलीत आम्ही दुपारी बैठे खेळ खेळायचो. झाडाखाली ठेवलेल्या त्या माठातले गोड, थंडगार पाणी सगळ्या शीतपेयांचे विस्मरण करून टाकायचे. आठवडा बाजारातून मामा मोठाले टरबूज, कलिंगड, शेव मुरमुरे, गोडी शेव असा खाऊ आणायचे. त्या झाडाच्या दाट सावलीत आमची पंगत बसायची. त्या भेळीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.

मामा- मामी दिवसभर शेतांत कामगारांसोबत राबायचे. मामाचा गोठा बराच मोठा होता. गोठ्यात एक तरी दुभती म्हैस असायचीच. सुटी लागली आणि गोठ्यात दुभती म्हैस नसेल, तर मामा दुधासाठी एक म्हैस घेऊन यायचे. रोज सकाळी ग्लास भरून दूध प्यायल्याशिवाय सुटका व्हायची नाही. पाणी न मिसळलेले, जाड सायीचे, गोड दूध मामाच्या मळ्याबाहेर कधी पुन्हा प्यायला मिळाले नाही.

संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात क्रिकेट खेळत असू. सूर्य मावळतीला जाण्याची ती वेळ असायची. आजी तुळशी वृंदावनात दिवा लावायची. आम्ही आजीला "आक्का' म्हणत असू. त्या वेळी पक्षी आपापल्या घरट्याकडे रवाना व्हायचे. लगबगीने घरट्यात मिटत चाललेली आणि त्याचवेळी किलबिलाटाची वरची पट्टी गाठलेली ती संध्याकाळ आता आठवली ती तेवढीच मनात किलबिलाट करीत. दिवसभर दमल्यावर रात्री कधी झोप लागायची ते कळायचेच नाही. सकाळी चिमण्यांच्या किलबिलाटाने जाग यायची. रानातले पक्ष्यांचे आवाज ओळखायची, त्यांची रानात झडलेली पिसे, चिंचा, झाडावरचा डिंक गोळा करण्याची आमची स्पर्धा असायची.

घराशेजारच्या हौदात दिवसभर थंड पाण्याची मोटर चालायची, शेजारीच बदामाच्या मोठाल्या दोन झाडांच्या सावल्यांनी त्या हौदावर जणू काय छप्परच तयार केले होते. त्या हौदात पोहण्याची मज्जा काही न्यारीच होती. काही दिवसांतच आंबे पाडी लागायचे. आक्का त्या कैऱ्या झाडावरून उतरवून मोठ्या काळजीने, घराशेजारी असलेल्या अडगळीच्या खोलीत भुशात पिकायला ठेवायची. जसे आंबे पिकायचे तसा त्याचा सुगंध, घमघमाटच म्हणायचे, आसमंतात दरवळायचा. मग कोपरापावेतो हात भरेपर्यंत आंबे खाण्याची खूप गंमत असायची.

पाहता पाहता सुटी कधी संपायची ते कळायचेच नाही. पप्पा मामाच्या मळ्यात आले, की सुटी संपल्याचे लक्षात यायचे. खरे तर महिनाभर राहूनही डोळे ते निसर्गरूप पाहून निवायचे नाहीत, कानात पाखरांची किलबिलगाणी पुरायची नाहीत, पाय निघायचे नाहीत, मन भरायचे नाही. रडत रडत, कसाबसा आम्ही लाडक्‍या आजीचा, मामा-मामींचा आणि सगळ्या मळ्याचाच निरोप घ्यायचो. शाळेत गेल्यावर पुढचे आठ दिवस तरी ती सुटी बाई वर्गात शिकवत असतानाही आठवत राहायची.

शाळा संपली. इंजिनिअरिंगच्या शिक्षणात अडकतानाच सुटीचे चक्र बदलले आणि मोबाईल, व्हॉट्‌सऍप, फेसबुकच्या नादात ही उन्हाळ्याची सुटी कधी हरवून गेली ते कळलेच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com