सीमेवरून...

सीमेवरून...

नव्या शस्त्रांची चाचणी करायला काश्‍मिरात पोचलो. लष्कराच्या कॅम्पवर होतो. नदीच्या रेषेपल्याड पाकिस्तानच्या चौक्‍या. तेथील सैनिकांच्या हालचालीही इथून दिसायच्या. अधूनमधून गोळीबार चाले. ही आमच्यासाठीही एन्डुरन्स चाचणी होती म्हणा ना...!

मी संरक्षण खात्यात होतो. आमच्या संस्थेने विकसित केलेल्या इन्सास शस्त्रांची सहनशील चाचणी (एन्डुरन्स ट्रायल) करण्यासाठी काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातल्या मच्छल भागात गेलो होतो. झेलम एक्‍स्प्रेसने जम्मूला व तेथून पुढे लष्करी वाहनातून श्रीनगरमधील "मिलिटरी कॅम्प'ला पोचलो. मच्छल गावापर्यंत गेलो. सर्वत्र लष्कराचा बंदोबस्त होता. आम्हाला शस्त्रांची चाचणी मच्छलच्या चौकी किंवा ठाण्यावर करायची होती. या चौक्‍या अतिशय उंचावर पहाडावर होत्या. तेथे जाण्यापूर्वी आमची शारीरिक क्षमता वाढण्यासाठी व वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आम्हाला मच्छल कॅम्पमध्ये दहा-बारा दिवस राहणे आवश्‍यक होते. कारण उंचावर सर्वत्र बर्फच होते व प्राणवायूची कमतरताही होती. जाण्यापूर्वी आमची वैद्यकीय चाचणीही होणार होती.

कॅम्पमधील वास्तव्यात आम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला व ऐकायला मिळाल्या. एक दोन दिवसांत आम्हाला दिसले, की पंधरा-वीस काश्‍मिरी युवक व एक अफगाण पेहरावातील थोडा अधिक वयाचा गृहस्थ मिळून एका घराचे बांधकाम करीत आहेत. जवानांकडून कळले, की हे तरुण युवक या अफगाणी गृहस्थाबरोबर सीमा पार करून पाकिस्तानात पळून जाताना सीमा सुरक्षा दलाच्या रक्षकांनी त्यांना पकडले व जवानांच्या हाती सोपवले होते. भारतीय लष्कराने त्या युवकांचे मन वळविण्यासाठी त्यांना कॅम्पमध्येच घर बांधण्याचा रोजगार देऊ केला होता. त्यांचा प्रमुख अफगाणी सेनेला दाद देत नव्हता, की कोणतीही माहिती द्यायला तयार नव्हता. त्या सर्व तरुणांना नंतर श्रीनगरच्या सुधारगृहात दाखल केले गेले. कळले, की हा अफगाणी पाकिस्तानच्या हेर खात्याचा हस्तक होता. तो काश्‍मिरी तरुणांना फूस लावून पाकिस्तानमध्ये अतिरेकी प्रशिक्षणासाठी नेत असे. तो लष्कराच्या रडारवर होताच.
वीस वर्षांपूर्वी जी परिस्थिती काश्‍मीरमध्ये होती, तिच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आता आहे असे वाटते. त्या वेळी श्रीनगरमध्ये जागोजाग चेक पोस्ट होते. सर्व प्रवाशांना बस/ट्रकमधून उतरवून त्यांची बारकाईने तपासणी होत असे. सर्व पुरुष वूलनचा पायघोळ झगा घालतात. तसेच स्त्रियाही बुरख्यासहित सर्व शरीर झाकणारे कपडे घालतात. अशा वेळी कित्येकदा हे पुरुष किंवा स्त्रियाही सोबत बंदूक लपवीत असत व प्रसंगी पोलिसांवर गोळीबारही करत. हिवाळ्यात तर सीमेवर सर्वत्र बर्फाचे राज्य. अशा वेळी पाकिस्तानी अतिरेकी प्रसंगी बर्फावर घसरत, स्किइंग करत घुसखोरी करीत. बंदुकीच्या धाकाने काश्‍मिरींच्या घराचा आश्रय घेत. अशा वेळी जवान घरोघरी जाऊन या घुसखोरांना पकडत असत. प्रसंगी काश्‍मिरींवर जवानांकडून अत्याचार झाल्याचीही ओरड झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक जवानांना सहकार्य करीत नव्हते.
आमची वैद्यकीय चाचणी झाली. आम्हा सर्वांना मच्छल चौकीवर जाण्यासाठी परवानगी मिळाली. आमच्यातील एकाला मात्र त्याच्या तब्येतीमुळे खालीच राहावे लागले. आम्हा प्रत्येकाला एक एक घोडा दिला गेला. तेथील घोडे या पहाडी बर्फाळ प्रदेशामध्ये चढण्यासाठी वाकबगार होते. चढणही अगदी उभी असल्याने त्यांचा मार्ग झिगझॅग पद्धतीचा होता. मच्छल चौकीवर आम्ही पाच-सहा तासांनी पोचलो.

डोंगरमाथ्यावर सर्वत्र जंगली लसणाचा वास पसरला होता. ऑक्‍सिजनची कमतरता असल्याने थोडे चालले की दम लागायचा. चौकीपासून खाली तळाला किशनगंगा नदीची रेषा स्पष्ट दिसत होती. नदीच्या पलीकडे काही अंतरावर पाकिस्तानच्या चौक्‍या व त्यांच्या हालचालीही दिसत होत्या. किशनगंगा नदीचे पाणी दोन्ही सेना वापरत असत. दुपारपर्यंत भारतीय लष्कर व नंतर पाकिस्तानी. काश्‍मिरी पोर्टर हे काम करीत. ते लष्करासाठी कावडीवर जेरिकॅनमध्ये पाणी भरून सहजतेने आणत असत. काश्‍मिरी पोर्टर लष्करासाठी खूप बहुमोल कामगिरी करतात. त्यांची भाषा काश्‍मिरी आहे.

पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो. कायम विजेचा कडकडाट होऊन वीज पडते. संरक्षणासाठी जागोजाग कंडक्‍टरचे खांब उभे केले आहेत. कंडक्‍टरमार्फत वीज खेचली जाऊन जमिनीत जाते. अशा वेळी जवान शस्त्रे जवळ बाळगत नाहीत. हिवाळ्यात दहा-बारा फुटांचा बर्फांचा थर साचतो. अशा वेळी जवानांना बंकरवजा गुहेचा आश्रय घ्यावा लागतो. त्यांचे जीवन मात्र सर्वस्वी रॉकेलवर अवलंबून असते. त्या गुहेत रॉकेलवर चालणारी शेगडी तिला कांगडी म्हणतात. ती सतत चालू असते. या शेगडीच्या उबेवर कसेबसे हिवाळा काढावा लागतो. हिवाळ्यापूर्वीच सर्व नित्यावश्‍यक खाद्यपदार्थांची बेगमी करावी लागते. पिण्याचे पाणीसुद्धा. बर्फांचे ढीग वितळवून पाणी मिळवावे लागते. आपण शहरी वस्तीत राहतो. आपल्याला कल्पनासुद्धा करता येणार नाही, की कोणत्या दिव्यातून भारतीय लष्कराला जावे लागते. त्यातून शत्रूवर चोवीस तास नजर ठेवून प्रसंगी गोळीबार करावा लागतो. तसेच घुसखोर अतिरेक्‍यांनाही कंठस्नान घालावे लागते.

आम्ही विकसित केलेल्या शस्त्रांच्या सर्व चाचण्या घेतल्या; पण ही आमच्यासाठीही एन्डुरन्स चाचणी होती म्हणा ना...!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com