संवाद निबोलक्‍यांशी

रजनी बोपर्डीकर
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

दहा-बारा वर्षांत ती मुले आणि शिक्षक यांचे कौटुंबिक नाते तयार झालेले असायचे. त्या मुलांना खूप "बोलायचे' असे. ती बडबड "पाहण्यात' वेगळे समाधान मिळत असे.

दहा-बारा वर्षांत ती मुले आणि शिक्षक यांचे कौटुंबिक नाते तयार झालेले असायचे. त्या मुलांना खूप "बोलायचे' असे. ती बडबड "पाहण्यात' वेगळे समाधान मिळत असे.

दोन तपांहून अधिक काळ मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होते. तेव्हा मुलांसमवेत आलेले सुखद अनुभव सांगावेसे वाटतात. शिशुवर्गापासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविले. प्रत्येक वर्गात आठ-दहाच विद्यार्थी असल्याने त्यांची पूर्ण माहिती असायची. शिशुवर्गात दाखल असतानाचे त्यांचे घाबरलेले, भांबावलेले चेहरे आठवतात. पालकांचेपण साशंक, काळजीयुक्त चेहरे दिसतात; पण पुढील काही दिवसांतच त्यांना शाळेविषयी वाटणारी ओढ, गोडी पाहून आम्हा शिक्षकांना निश्‍चित वाटू लागते. मुलांची प्रगती, पालकांचा विश्‍वास हीच आमच्या कामाची पावती होती.
ही मुले जेव्हा आठवी, नववी, दहावीत असताना त्यांच्यात आलेला धीटपणा, बिनधास्तपणा, कर्णबधिरत्वाची खंत न बाळगता वावरताना बघून आनंद वाटायचा. आम्ही सर्व शिक्षक त्या परिवर्तनाचे साक्षीदार होतो. त्यातूनच त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर, प्रेम, आधार व मैत्रीचे नाते कधी जुळायचे ते समजायचेही नाही. लहानसान गोष्टीही कधी एकदा शिक्षकांना सांगू असे त्यांना व्हायचे. पालकांची परिस्थिती काही यापेक्षा वेगळी नव्हती. आम्हा प्रत्येक शिक्षकाची वेगळीच ओळख त्यांनी खुणांनी ठरविली. कोणाचा चष्मा, कोणाचे लांब केस, कोणाचे मोठे कानातले, कोणाचे लिपस्टिक लावणे या खुणांनीच ते आमच्याविषयी बोलत. त्यांची ती बडबड "पाहणे' खूप आनंदाचा भाग असायचा.

दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पेढे घेऊन आले की, त्यांचा शिशुवर्ग ते दहावीपर्यंतचा शालेय प्रवासाचा चित्रपट झर्रकन डोळ्यांसमोर यायचा. त्यांच्या पंखात आलेले बळ, वागताना आलेला आत्मविश्‍वास पाहून कृतार्थता वाटायची. पालकांनाही धन्य धन्य वाटायचे. तेव्हा आम्ही फक्त शिक्षक न राहता त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा असायचो. तो आनंद वेगळेच समाधान देऊन जायचा.

दरवर्षी एक लांबची सहल व एक वर्षा सहल असायची. हैदराबाद ते श्रीशैल्यम प्रवासात बससमोर वाघ आल्यावर ड्रायव्हरने बस थांबविली. सर्वांनी भीतीने एकमेकांचे हात धरले; पण चेहऱ्यावर कुतूहलही होते. निसर्गातला जिवंत वाघ मुले प्रथमच पाहात होती. नंतरच्या प्रवासात गाडीभर वाघाच्या हालचाली व डरकाळ्या चालूच होत्या.
कामानिमित्त अंबरनाथला गेले होते. मला पाहताच शैलेश कुंपणावरून उडी मारून आला. त्याला खूप आनंद झाला होता. नेहमीच्या शैलीने तो भराभर "बोलत' होता. किती सांगू अन्‌ किती नको असे त्याला झाले होते. आमचा "शब्देवीण संवादु'बरोबरच्या लोकांना काही समजत नव्हता; पण आम्ही दोघे "बोलत' होतो. त्याला शाळा सोडून बरीच वर्षे झाली होती; परंतु पाच मिनिटांत त्याने तो दुरावा कमी केला. त्याचा मधल्या काळातील जीवनप्रवास तो सांगत होता. खूप राहिलेले त्या पाच मिनिटांत आम्ही बोलून घेतले जणू. मुलांचे व शिक्षकांचे वाढदिवस म्हणजे उत्साहाला उधाण. कधी फुलांचा वर्षाव, कधी फळ्यावर केकचे सुंदर चित्र, मेणबत्तीची मोहक चित्रे, दरवर्षी वेगळेपणा असायचा. आता घरी माझा वाढदिवस साजरा होताना ही उणीव भासते. जागतिक कर्णबधिर दिन आम्हा सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा दिवस असायचा. सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हा दिवस साजरा करण्यात सहभाग असायचा. कोणाचे नाच, नाटक, पेंटिंग, रांगोळी, क्राफ्ट व आठवतात. अमित राणे, प्राची नगरकर, नंदिनी फाटक. अमित, प्राचीचे ड्रॉइंग सुरेख; तर नाच करताना मोहक दिसणारी नंदिनी अजून डोळ्यांसमोर दिसते. ते प्रसंग अजूनही सुखावून जातात.

दहावीच्या चित्रकलेच्या परीक्षेत भोजन करणारे शेतकऱ्याचे कुटुंब काढा असा प्रश्‍न होता; पण "भोजन' या शब्दाचा अर्थ न कळल्याने मुले एकमेकांकडे बघतच राहिली. परीक्षकांनाही प्रश्‍न पडला. त्या माझ्याकडे आल्या, मी प्रश्‍न बघून त्यांना भोजनाची खूण करताच पुढच्या दोन तासांत कागदाच्या चौकटीत चित्रे काढली गेली. काय तो शेतकऱ्याच्या पागोट्याचा डौल, त्याच्या कारभारणीची ओठापर्यंत आलेली नथ. परीक्षक व मी दोघेही खूष झालो. कारण शंभर शब्दांचे काम त्या एका-एका चित्राने केले होते.

रस्तासुरक्षा सप्ताहात एक स्पर्धा असायची. त्यासाठी त्यांना पंचवीस-तीस विद्यार्थ्यांचे "पथक' हवे असायचे. पथक तर तयार झाले; पण त्यांना आज्ञा कशा द्यायच्या? त्यांना समजणार कशा? विश्‍वनाथ पुढे सरसावला. हात उंच करून हाताच्या खुणेवर त्यांने सर्व "ऑर्डर्स' बसवल्या. हेच पथक पुढील दोन-तीन वर्षे पहिल्या क्रमांकाची ढाल घेऊन येऊ लागले. शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला गेले.
आज-काल तर माझे विद्यार्थी मोबाईलद्वारे एसएमएस, स्माईली यांचा उपयोग करून सहज संवाद साधू लागले आहेत. शाळेतून निवृत्त झाले तरी एक प्रकारचे समाधान-तृप्तता आहे. असे एक ना अनेक अनुभव आहेत. प्रत्येक अनुभवाचा रंग वेगळा, गंध वेगळा, रुची वेगळी आहे.

Web Title: rajani bopardikar write article in muktapeeth