जेवणाचा डबा

राजाराम (बापू) मांगलेकर
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

ॲल्युमिनियमचा मोठा गोल डबा असायचा. त्यात दोन वेळचं जेवण भरले जायचे. त्या डब्याला पाठविणार व घेणार यांची नावे असलेली लहान पाटी असायची. तो डबा कोल्हापूर बस स्टॅंडवर येऊन माझा आतेभाऊ घ्यायचा व कालचा रिकामा डबा त्याच गाडीत द्यायचा.

साधारण तीन-चार दशकांपूर्वी माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर (त्यावेळची एस.एस.सी. वगैरे) आपली कौटुंबिक आर्थिक परिस्थिती व बौद्धिक क्षमता यावर पुढील शिक्षणाची दिशा ठरत असे. काहींना बौद्धिक क्षमता असून घरच्या परिस्थितीमुळे आपल्या लहान भावंडांच्या शिक्षणासाठी घरी आर्थिक हातभार लावण्यासाठी नोकरी शोधावी लागत होती.

त्याकरिता आय.टी.आय. किंवा तत्सम कोर्स करून ते नोकरी मिळवत असत. त्या काळी आय.टी.आय. किंवा इतर कॉलेजेस, संस्था या फक्त मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असत. यामुळे कोल्हापूरच्या आसपासच्या ५० ते ६० किलोमीटरच्या अंतरातील असे लोक कोल्हापुरात येऊन शिक्षण घेत होते व नोकरी करीत होते. 

अशा वेळी आर्थिक परिस्थितीमुळे बाहेर जेवण घेणे परवडत नव्हते. त्याकरिता एसटीची एक चांगली सोय होती, पास काढून जेवणाचा डबा पाठविणे. त्या काळी माझे आतेभाऊ श्रीकांत मुटगळ हे आयटीआयचा कोर्स करण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. त्यांना रोज सकाळी निपाणीहून कोल्हापूरला सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या गाडीतून आम्ही डबा पाठवीत होतो.

ॲल्युमिनियमचा मोठा गोल डबा असायचा. त्यात दोन वेळचं जेवण भरले जायचे. त्या डब्याला पाठविणार व घेणार यांची नावे असलेली लहान पाटी असायची. तो डबा कोल्हापूर बस स्टॅंडवर येऊन माझा आतेभाऊ घ्यायचा व कालचा रिकामा डबा त्याच गाडीत द्यायचा. तो आम्ही निपाणीत परत घ्यायचो. त्या काळी बऱ्याच लोकांनी याचा उपयोग करून घेऊन आपले शिक्षण व नोकरी केली आहे. एसटी बस म्हटलं की, या आठवणी आजही तरळून येतात.