रायनबाळाचा लळा

रायनबाळाचा लळा

रायनबाळ लळा लावून गेला. अवघ्या सात वर्षांत घरातल्या सगळ्यांमधला एक होऊन राहिलेला. शिस्तबद्ध वर्तनाने जिंकणारा. लहानांची काळजी घेणारा आणि मोठ्यांकडून लाड करवून घेणारा. देवघरात शांत बसणारा. खोड्या काढणारा. किती सांगावं त्याच्याबद्दल?

रायन आमच्या कुटुंबात सात वर्षांपूर्वी आला, तेव्हा केवळ बेचाळीस दिवसांचा होता. दोन्ही हातांच्या ओंजळीत मावेल असा. आल्या दिवसांपासून आम्हा सगळ्यांना हवाहवासा. आम्हाला त्याचे लाड करायला आवडत होते आणि त्याला लाड करून घ्यायला. घरी आम्ही त्याला त्याच्या बाथरूमची जागा दाखवली. दोन-तीनदा फक्त तिथे जायला शिकवले आणि आश्‍चर्य म्हणजे ती शिस्त त्याने सात वर्षे पाळली. सात वर्षांत घरात कुठे घाण नाही, की कुठल्याही वस्तूंची पाडापाड नाही. कुणाचा विश्‍वास बसणार नाही, पण जेवणाची ताटं समोर मांडलेली असतानादेखील तो त्याच्याजवळ कधी गेला नाही. अतिशय शिस्तबद्ध वर्तन.

हळूहळू रायन मोठा होत होता. माझ्या पत्नीचा रायनच्या "आई'चा रोल सुरू झाला होता. त्याचं खाणं-पिणं, त्याला जीना चढायला, उतरायला शिकवणं आणि त्याची अंघोळ या गोष्टी ती प्रेमानं करत होती. रायनलासुद्धा तिच्याकडून हे सर्व करून घेताना आवडत होतं. माझी पत्नी त्याच्यासाठी खूप ग्रेट. तिचं तो सगळंच ऐकायचा. तिनं तिच्या हातानं त्याला भरवलं, की त्याला खूप आवडायचं. कित्येकदा तिनं भरवावं म्हणून हट्ट धरायचा. या प्रत्येक वेळचे त्याचे आवाज वेगवेगळे असायचे. म्हणजे नाराजीचा वेगळा, मागणी करण्याचा वेगळा, प्रेम करायचा वेगळा, मस्ती करायची असेल त्या वेळचा वेगळा, खोड्या काढतानाचा वेगळा. ते आवाज ओळखून प्रतिसाद देण्यातही मजा होती. खरं तर सगळेच पाळीव प्राणी, विशेषतः कुत्र्यांना नॉनव्हेज दिले जाते. रायनला आम्ही दिलं असतं तर त्यालाही आवडलं असतं. पण आम्ही सर्व "शाकाहारी' असल्यामुळे आमच्या रायनची खाद्यजत्रा सेरेलॅकपासून सुरू होऊन चपाती/ दूध/ दही/ ताक येथपर्यंत येऊन थांबली. पण तरीही त्याची तक्रार नव्हती. एकच एक चवीचे अन्न - सात वर्षे त्यानं आनंदानं खाल्लं.

माझा मोठा मुलगा आशीष व रायनचं चांगलंच जमायचं. आशीष अभ्यासाला बसला तर रायन त्याच्या मांडीवर. झोपायलासुद्धा ते दोघे एकाच बेडवर. एकच उशी आणि एकच ब्लॅंकेट. त्याचा चेहरा, नाक, कान चाटायचा. त्याची प्रेम करण्याची रीत वेगळीच. आशीष शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यावर रायन काहीसा एकटा पडला होता. अर्थात "स्काइप' सुरू झाल्यावर आमच्या सर्वांच्या पुढे तोच येऊन बसायचा. आमचा शुभम लहान होता. त्यामुळे शुभमची जबाबदारी आपल्यावर आहे, असंच रायन समजायचा. रायन रात्री शुभमच्याच बेडरूममध्ये झोपायचा. शुभमच्या रूमचा दरवाजा आतून बंद असला, तर तो आपल्या पंजाने दरवाजा थोडा घासायचा. दरवाजा नाही उघडला तर दरवाजावर दोन्ही पाय टेकवून कडी वाजवण्याची कलादेखील त्याला अवगत होती.

आशिषची मैत्रीण पूजा जशी अधूनमधून घरी यायला लागली, रायन तिच्यावरही प्रेम करू लागला. मध्यंतरी पूजा घरी होती. त्या काळात रोज तिच्याच हातून त्याला खायला हवं असायचं. तिचा अभ्यास, थिसीस, नोकरी असे अनेक ताण तिच्यावर होते. मधूनच खूप विचार करायची. दोन आसवं डोळ्यांतून आली तर ती टिपायला रायन तिच्याजवळ असायचा. तिच्या मांडीवर बसून, तर कधी तिच्या खांद्यावर आपले दोन्ही पाय ठेवून तिला धीर द्यायचा.

आशीष अमेरिकेत गेल्यानंतर आम्ही इकडे तिघंच. त्यातही मी आणि शुभम कामानिमित्त बाहेर. दिवसभर रायन व त्याची आई हेच एकमेकांना आधार. आता रायन गेल्यानंतर ती खरोखरच एकटी पडली. मी रायनवर कधी कधी रागवायचो, चिडायचो. मग तो नाराज व्हायचा. माझ्यावर रुसायचा. मग मी स्वतःच त्याच्याजवळ जाऊन त्याला "शॉली-शॉली' म्हणायचो. त्यानंतर मात्र पुन्हा प्रेम करायचा, तसा त्याला जबरदस्त ऍटिट्यूड होता. माझ्याशी भांडल्यावर तर तो मला खूप छळायचा. कधी माझी चप्पल हॉलमधून तोंडात उचलून बाल्कनीत लपवून ठेवायचा. मी सकाळी देवपूजेला बसताना देवापुढील आसनांवर माझ्या अगोदर स्वतःच जाऊन बसायचा. एक ना अनेक खोड्या. मी पेपर वाचायला घेतला, की तो मुद्दाम पेपरवर उभा राहायचा. देवाचं मात्र प्रचंड वेड. संध्याकाळी ती जेव्हा प्रार्थनेसाठी जायची तेव्हा तो तिच्या शेजारी बसायचा. त्याला देवाच्या खोलीत तासन्‌तास बसायला खूप आवडायचे.

रायन गेला तेव्हा रात्रभर मी त्याच्याशेजारी बसून होतो. तो शांतपणे झोपला होता. घोरण्याचा आवाजही नव्हता. रायननं जाण्याची वेळही अशी निवडली, की आम्ही दोघंच घरी होतो. रायन त्याच्या मम्मीजवळ गेला. तिच्या मांडीवर डोके ठेवले. मानेला एक जोरात झटका दिला व काही कळायच्या आतच त्यानं आमचा निरोप घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com