काश्‍मीरच्या वळणवाटा

muktapeeth
muktapeeth

काळ्या कुट्ट अंधारातून गाड्या सरसर निघाल्या होत्या. गाड्यांचे दिवे पुढचा रस्ता प्रकाशमान करीत होता. मागे अंधार पसरत जाऊन पुन्हा सारं गुडूप व्हायचं. काहीतरी गूढ भरून राहिल्यासारखं वाटत होतं.

नुकतेच आम्ही "हडपसर ट्रेकर्स'चे काही सदस्य "काश्‍मीर ग्रेट लेक्‍स' हा ट्रेक करून परतलो. जे पाहिलं, अनुभवलं ते केवळ शब्दातीत. काश्‍मीरचं वर्णन नंदनवन म्हणून करतात, ते यथायोग्यच आहे, असं मला वाटतं.

असं म्हणतात की, एकदा का तुम्ही हिमालयात गेला की, तो सतत तुम्हाला साद घालत असतो. त्याचं वेडच लागतं, निदान माझ्या बाबतीत तरी तसं झालंय खरं. या वेडामुळेच काश्‍मीरचा ट्रेक करायचा असं मनानं घेतलं होतं. हा विषय हौशी साथीदारांच्या कानावर घातला व लगोलग आमचा एक ग्रुपच तयार झाला. जायचं पक्कं झालं, विमानाची तिकिटं व बाकी सर्व तयारी झाली आणि काश्‍मिरात गडबड सुरू झाली. जसजसा जायचा दिवस जवळ येत होता, काश्‍मिरात काहीतरी अप्रिय घटना घडतच होत्या. संचारबंदी, दगडफेक, हिंसक मोर्चे अशा निराशाजनक वार्ता प्रसार माध्यमातून येत होत्या. परिणामी मित्र व परिवारांतून "ट्रेक रद्द करा' असा रेटा वाढत होता. परिस्थितीचा आढावा घेत मनाचा हिय्या करून एकदाचे सर्वजण ठरल्यानुसार एका पहाटे विमानात बसलो. विमान वेळेत निघाले. वेळेत श्रीनगरच्या आकाशात पोचले. श्रीनगर विमानतळ परिसरात घिरट्या घालू लागले. खालची परिस्थिती मन खट्टू करणारी होती. रस्ते ओस पडलेले, माणसांची वर्दळ नजरेस पडत नव्हती. सारं काही ओकं बोकं... स्मशान शांतता. एकदाचे विमानतळाबाहेर पडलो. शहरात जाताना थोडी वाहनं धावताना दिसत होती, तेवढाच आधार वाटला. एकदाचे हॉटेलवर पोचलो. त्या ठिकाणी जेवणाची सोय नव्हती. आसपास काही जेवणाची व्यवस्था होईल या आशेनं शोध घेत होतो. दुपारची वेळ, भूक लागलेली, उन्हाचे चटके सोसत एक हॉटेल गाठलं. कसंबसं जेवण उरकलं व आमच्या हॉटेलवर परतलो. थोडा आराम केला. सायंकाळी शेजारीच असलेल्या एका टपरीवजा दुकानातून काही सामान घेऊन सहकाऱ्यांनी मसालेभात केला. फारच छान स्वाद होता त्याचा.
त्याच रात्री हॉटेल सोडून सोनमर्गला जायचे होते. संचारबंदी व दगडफेकींच्या भीतीने सर्व प्रवास रात्री करावा लागणार होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आम्हाला घेऊन जाणाऱ्या जीप आल्या. आम्ही सोनमर्गकडे रवाना झालो. काळ्या कुट्ट अंधारातून गाड्या सरसर निघाल्या होत्या. गाड्यांचे दिवे पुढचा रस्ता प्रकाशमान करीत होता. मागे अंधार पसरत जाऊन पुन्हा सारं गुडूप व्हायचं. गाड्यांच्या आवाजाची लय कानात भरून राहिली होती. अधूनमधून पाटाचं पाणी सळसळत जावं, तसा आवाज साथ करायचा. काळोखात पाणी दिसत नव्हतं. नुसताच आवाज. काहीतरी गूढ भरून राहिल्यासारखं वाटत होतं. तीन तास प्रवास सुरू होता गूढ काळोख्या गुहेतून जावं तसा. सकाळी सहा वाजता एका हॉटेलच्या स्वागत कक्षात थोडी जागा आराम करण्यास दिली गेली. अमरनाथ यात्रा व लेह लडाखला जाणारी बरीचशी मराठी मंडळी तेथे भेटली. एकमेकांचे क्षेम कुशल, भीती, कुतूहल यांची देवाणघेवाण झाली. दुपारी इकडे तिकडे भटकून झाले. सायंकाळी जवळच असलेल्या शीतकारी या बेस कॅम्पवर पोचलो. आणि दुसऱ्याच दिवशी सुरू झाला तो आठवड्याभरचा अनोख्या दुनियेचा एक स्वच्छंद, धुंद करणारा मखमली प्रवास.

रस्त्यावर जवानांची गस्त दिसायची. रस्त्याकडेच्या सफरचंदाच्या बागांतूनही जवान दिसत होते. ठिकठिकाणी लष्करी छावण्या. या छावण्यांवर जवानांनी केलेलं स्वागत, बोचऱ्या हवेत दिलेला वाफाळता चहा, आमचा सहकारी दिनेशनं म्हटलेलं "ए मेरे वतन के लोगो' हे देशभक्तीपर गीत, त्याला जवानांनी दिलेली दाद, शिवछत्रपतींचा केलेला जयघोष हे सगळं अजून मनात जागं आहे.

समर्थ रामदास स्वामींच्या "धबाबा तोय आदळे' याची आठवण करून देणारे धबधबे, खळाळत वाहणारे ओहोळ, नजरपार पसरलेली हिरवीगार पठारं, त्यावर यथेच्छ चरणारे मेंढरांचे कळप, हिरव्या मखमलीवर पांढरी नक्षी कोरल्यासारखी, मेंढपाळांची (बकरवाल) छोटी टुमदार घरं, आमच्याकडे आशेनं पाहणारी त्यांची लहान लहान मुलं, ठिकठिकाणी गालीचासारखी पसरलेली रानफुलं, मनात धडकी भरवणारे तरीही मोहक असे कातळकडे, आकाशाशी स्पर्धा करणारे पर्वत, घनदाट वृक्षराजी, खोलच खोल दऱ्या, थकवणारे मोठमोठे शिळामार्ग, शीतल वाऱ्याच्या मंद झुळूका, तर कधी घोंगावणारा बोचरा वारा, याच्या जोडीला अकस्मात झोडपणारा वरुण राजा, सोनेरी पहाट, कधीकधी तप्त करणारी दुपार, रात्री होणारं निरभ्र आकाश दर्शन, चंद्र, तारे, जणू काही हाकेच्या अंतरावर. अशा अनेक रूपांनी, नानाविध छटांनी हिमालय आपल्याला चकित, मोहित करून सोडतो. मानवाच्या नगण्यतेची पदोपदी प्रकर्षाने जाणीव होते, आपण आणखीनच विनम्र होतो आपल्याही नकळत आणि त्याला शरण जातो. डोळ्याच्या कडा अलगद ओलावतात. धन्य झालो, याच साठी केला होता अट्टहास, हा भाव मनात अलगद फेर धरू लागतो. आणि माघारी परतण्याची वेळ झालेली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com