सीमोल्लंघनातील थरार

सीमोल्लंघनातील थरार

सह्याद्रिच्या दऱ्या खोऱ्यात फिरताना युरोपमधील एल्ब्रुसचे स्वप्न पडले. युरोपातील उंच शिखरावर तिरंगा आणि आई-वडिलांचे छायाचित्र घेऊन उभा होतो, त्यावेळी धन्य वाटले.

पुणे विमानतळावर मला प्रो-लीग कबड्डीमधील माझा सर्वांत आवडता खेळाडू संदीप नरवाल भेटला. माझ्या माऊंट एल्ब्रुस मोहिमेबद्दल त्याला समजले, तेव्हा तो क्षणभर आश्‍चर्यचकीत झाला. लगेच त्याने माझ्याबरोबर सेल्फी घेतली. युरोपच्या उंच पर्वतावर तिरंगा फडकविणार हे ऐकून पुणेरी पलटनचा कर्णधार
दीपक हुड्डा हा खूप खूष झाला. या दोघांनी दिलेल्या शुभेच्छा हुरूप वाढवणाऱ्या होत्या.

मॉस्कोहून मिनिरल व्हडी असा विमानप्रवासच होता. तेथून गाडीने चार तासांचा प्रवास करून एल्ब्रुस गावातील हॉटेलवर मुक्कामाला पोहोचलो. रस्त्यात दुतर्फा सूर्यफुलाची विस्तीर्ण शेती, उंच डोंगररांगा. मधून मधून झड घालणारी पाऊससर. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पिकव्हॅलीमधील ट्रेकला सुरवात केली. साधारणतः सात ते आठ किलोमीटरचा ट्रेक झाल्यानंतर आम्हाला एल्ब्रुस पर्वताचे दर्शन झाले. एल्ब्रुसचे आक्राळविक्राळ, बर्फाच्छादित रूप पाहून डोळ्याचे पारणे फिटले. त्या व्हॅलीमध्ये असंख्य प्रकारची फळे, फुले, फुलपाखरे होती. त्यांची छायाचित्रे घेत आम्ही त्या गिरीभ्रमंतीचा मनमुराद आनंद घेतला. अतिशय खड्या चढणीचा हा ट्रेक होता. साधारणतः 370 मीटर उंचीवर चढून गेल्यानंतर जॉर्जियाची हद्द होती. चौथ्या दिवशीपासून कसोटी सुरू झाली. सकाळी लवकर उठून अडतीसशे मीटरवरच्या एल्ब्रुस बेस कॅम्पकडे निघालो. चेअर लिफ्टच्या साहाय्याने आम्ही इथपर्यंत पोहोचलो. हवेतील गारवा अंगाला झोंबू लागला. काही काळ ढगात लपलेला एल्ब्रुस ठळकपणे दिसू लागला. आम्ही तंबूत पोहोचलो. दुपारी जेवण करून थोडावेळ आराम केला. संध्याकाळी एल्ब्रुसच्या दिशेने सरावासाठी ट्रेक सुरू केला. पायात प्लास्टीक बूट आणि क्रॅम्पोन होते. बेचाळीसशे मीटरपर्यंत जाऊन खाली आलो. पाचव्या दिवशी सकाळी नऊ वाजता पुढे कूच करण्याचा संदेश मिळाला. साडेचार हजार मीटरपर्यंत गेलो. पायातील बूट, क्रॅम्पोन, जॅकेट आणि सॅक यांच्या वजनामुळे पाय उचलणे अतिशय कठीण जात होते. अतिउंचीमुळे श्‍वासोच्छवासासही त्रास जाणवत होता. धावत-पळत सह्याद्रीचे डोंगर सर करणारा मी इथे मात्र दमून गेलो होतो. खूपच दमल्यासारखे वाटत होते. पाऊल पुढे टाकले तरी पाय घसरत होते.

सहाव्या दिवशी दिवसभर आम्ही आराम केला. कारण त्या रात्री आम्हाला मुख्य चढाईला सुरवात करायची होती. आपला स्वातंत्र्यदिन युरोपातील सर्वांत उंच पर्वतावर झेंडा फडकावून साजरा करण्याचा आमचा मानस होता. परंतु, दुपारीच गाईड व्हीक्‍टरने निरोप दिला, की हवामान खराब असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही. सर्वत्र हिमवृष्टी होत होती. पुढे जाणे धोक्‍याचे होते. म्हणून तेथेच झेंडावंदन केले. त्या दिवशी रात्री एक नंतर आम्ही पुढच्या वाटचालीला सुरवात केली. दिवसभर आराम केल्यामुळे थकवा जाणवत नव्हता. निघालो, तर संतोष कोरडेला उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्याला माघारी पाठवावे लागले. साधारणतः पाच हजार मीटर उंची गाठल्यावर आमच्या ग्रुपमधील पासष्टी ओलांडलेल्या यादव पती-पत्नींनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. वारा अतिशय वेगात वाहात होता. सगळीकडे काळोख पसरला होता. आकाशात टपोर चांदणे दिसत होते. सर्वत्र गूढ शांतता पसरली होती. वाऱ्याबरोबर बर्फाचे कण तोंडावर आपटत होते. थंडी इतकी प्रचंड होती, की हाडे गोठतील की काय अशी भीती वाटत होती. तापमान उणे वीसच्या दरम्यान. वारा ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने. सर्वांचा चालण्याचा वेग मंदावलेला. बर्फाच्या पांढऱ्या पसरलेल्या चादरीवर बॅटरीचा प्रकाश ठळकपणे उठून दिसत होता. साडेतीन ते चारच्या दरम्यान थोडासा अनुत्साह जाणवू लागला. काळोखात चालताना मनात खूप भीती वाटत होती. अचानक सूर्याची किरणे त्या पांढऱ्याशुभ्र चादरीवर पडली आणि आकाशाचा वेगळाच रंग नजरेत दिसू लागला. त्यावेळी जीवात जीव आला. पावले मोजत मोजत चालणे सुरूच होते.

सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास समीट पॉईंट नजरेस पडला आणि हायसे वाटले. परंतु, तोपर्यंत अंगातील त्राण पार निघून गेले होते. मग आईने मायेने व बायकोने प्रेमाने केलेले सुंटवडा लाडू आठवले. पाच मिनिटे तेथे बसून चार लाडू खाल्ले, पाणी प्यायलो आणि मग हत्तीचे बळ अंगात संचारले. न थांबता ताडकन समीट पॉईंट गाठला. तेथून दिसणारा तो निसर्ग अद्‌भुत होता. थकवा कुठल्याकुठे निघून गेला होता. अंगात रोमांच संचारला होता. मग सॅकमधून आईवडिलांचे छायाचित्र बाहेर काढले. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. माझी व्यावसायिक असो वा सामाजिक प्रगती असो, एकूणच जडणघडण ज्यांच्यामुळे झाली, त्या दोघांचे छायाचित्र मी युरोपातील सर्वोच्च शिखरावर झळकावले याचा मला खूप आनंद झाला. मुलांनी तयार केलेले तिरंगी "भ्रमणवेध' हे पोस्टर झळकावले. आई-वडील, पत्नी, बहिणी यांची प्रेरणा माझ्या सोबत होतीच.
तेथे साधारणतः आठ-दहा मिनिटे थांबून परतीच्या प्रवासाला निघालो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com