आत्मिक आनंद

सदानंद भणगे
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

लष्करातून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, सैनिकांना त्या वेळी एकरकमी पैसे मिळायचे. त्यांचा विनियोग कसा करायचा यापासून, ते ही रक्कम कशी घरी न्यायची यापर्यंत अनेक प्रश्‍न असत. त्यामुळेच बॅंकेने त्यांच्यासाठी अल्पमुदत ठेवींची योजना सुरू केली होती...

लष्करातून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, सैनिकांना त्या वेळी एकरकमी पैसे मिळायचे. त्यांचा विनियोग कसा करायचा यापासून, ते ही रक्कम कशी घरी न्यायची यापर्यंत अनेक प्रश्‍न असत. त्यामुळेच बॅंकेने त्यांच्यासाठी अल्पमुदत ठेवींची योजना सुरू केली होती...

स्टेट बॅंकेत नोकरीला असताना निवृत्त लष्करी अधिकारी, सैनिक यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. तेव्हा त्यांच्यासाठी एक खास योजना बॅंकेने तयार केली होती. भारतातील कोणत्याही गावातल्या स्टेट बॅंकेच्या शाखेत त्यांना 90 दिवसांच्या मुदतीची पावती मोडता येत असे. याचा फायदा असा, की त्यांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम बरोबर घेऊन प्रवास करावा लागत नसे. माझ्यासाठी हा पाच दिवसांचा कार्यक्रम असे. नगर येथील दोन लष्करी कार्यालयांत दर महिन्याच्या पाच तारखेपासून देशातील सर्व राज्यांतून त्या महिन्यात निवृत्त होणारे अधिकारी आणि सैनिक येत असत. त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ते निवृत्त होत असत. त्याच दिवशी त्यांच्या गावी जाण्यासाठी निघावे लागे. त्यानंतर एकही दिवस ते तिथे थांबू शकत नसत.

दर महिन्याच्या 25 तारखेला मी त्यांच्या कार्यालयात जाऊन भाषण देत असे. दर महिन्याला सुमारे शे-दोनशे जण तेथे येत असत. एक तर त्यांचे सर्व आयुष्य लष्करी सेवेत गेल्यामुळे त्यांना बॅंकिंग व्यवहारांची फारशी माहिती नसे. त्यांना मिळणारी रक्कम काही लाखांत असल्याने त्याचे काय करायचे, हे त्यांना उमगत नसे. एकरकमी मोठा पैसा हाती आल्याने काही जण मोठमोठी खरेदी करत असत. पण, त्यांच्या हे लक्षात येत नसे, की त्यांना पुन्हा एवढी मोठी रक्कम मिळणार नाही. काही मित्र, नातेवाईक त्यांना पैसे मागत. म्हणून मी त्यांच्यासाठी भाषण देत असतानाच सांगत असे, की एकरकमी मिळणारा पैसा खर्च करू नका. तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी ठेवा. तुमच्या आजारपणासाठी ठेवा. एकदम एवढा पैसा दिसल्यावर तुम्ही मोठ्या खरेदी कराल, लांबलांबचे नातेवाईक ओळख काढून येतील. त्यांना समजलं, की तुमच्याकडे खूप पैसे आहेत, की ते मागणार; तुम्ही नाहीपण म्हणू शकणार नाही. त्यापेक्षा पैसे बॅंकेत ठेवा, व्याज मिळवा. पैशांच्या विनियोगाबाबत तीन महिने साकल्याने विचार करा. कुटुंबातल्या सगळ्यांशी चर्चा करा. मगच हवी तर जमीन घ्या, घर घ्या किंवा पैसे पुन्हा बॅंकेत ठेवा. आता फिक्‍समध्ये इथे ठेवलेली रक्कम तुम्हाला व्याजासकट तीन महिन्यांनी तुमच्या गावात, तुमच्या बॅंकेत मिळेल. ही योजना नव्हती तेव्हा रेल्वेने प्रवास करताना कित्येकांचे सामान चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

ही सैनिक मंडळी राजस्थान, पंजाब, हरियाना वगैरे राज्यांत राहणारी असायची. त्यांना घरी पोचायलाच दोन-तीन दिवस लागत. मी खूप गोष्टी त्यांना समजून सांगायचो. लेखक असल्याचा फायदा मला व्हायचा. मला अनेक व्यक्तिरेखा इथेच मिळाल्या. माझं सांगणं बहुतांश लोकांना पटायचं. मग ते माझ्याशी गप्पा मारायचे, शंका विचारायचे. मी त्यांना युद्धाचे अनुभव विचारायचो. कधी ते विचारायचे, तुमचा फायदा काय? मी सांगायचो, बॅंकेला डिपॉझिट आणि तुमची सेवा करण्याचे भाग्य! एखादा विचारायचा, तुमचा वैयक्तिक फायदा असेल ना? मी म्हणायचो, आत्मिक, मानसिक समाधान! पंजाब, हरियानामधील निवृत्त अधिकारी मला त्यांच्या घराचा पत्ता द्यायचे. कुटुंबीयांचे फोटो दाखवायचे, घरी यायचं निमंत्रण द्यायचे. खूप बरं वाटायचं मला. देशाची सेवा करण्यासाठी अनेक वर्षे घरापासून लांब राहिलेल्या या सैनिकांसाठी आपण काहीतरी करतोय, याचा वेगळाच आनंद मिळायचा.

हे सर्व मी खूप मनापासून करायचो. त्या सर्वांना फॉर्म कसा भरायचा, याच्यापासून ते बॅंकेच्या इतर योजना हेही सांगायचो. बचतीचे महत्त्व पटवून द्यायचो. बरेच जण वैयक्तिक अडचणी सांगायचे. काही जणांचे अनुभव विदारक होते. एकाची बायकोच त्याला त्रास देत होती. कुणाच्या भावाचा त्यांच्या पैशांवर डोळा असायचा. त्यांना मी पैसे सुरक्षित कसे ठेवावे, हे सांगायचो. 30/31 तारखेपर्यंत एवढ्या पावत्या हाताने लिहिणे, पाकिटांत फॉर्म्स भरणे हे काम फार काळजीपूर्वक करावे लागे. एकाच नावाचे दोघे असत, त्यांची गावे वेगळी असत. त्यांची काळजी फार घ्यावी लागे. त्यांना हे सगळे शेवटच्या दिवशी नेऊन द्यावे लागे. कारण, एक तारखेनंतर कुणालाही तिथे राहण्याची परवानगी नसे. त्या काळात सुटी घेणं शक्‍य नसायचं. सुटी आली तरी काम करावं लागायचं, पण मी मोठ्या आनंदाने ते करायचो. तीन वर्षे मी हे करत राहिलो. त्या सैनिकांच्या खूप आठवणी आहेत माझ्या स्मृतिपटलावर कोरलेल्या. भारतातील विविध राज्यांतल्या हजारो जवानांच्या, अधिकाऱ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद मला मिळालेत. खूप मोठे मानसिक, आत्मिक समाधान मला मिळाले, हे नक्की!

Web Title: sadanand bhange write article in muktapeeth