दिसतं तसं...

sai write article in SmartSobati
sai write article in SmartSobati

हॅल्लो गाईज...!
‘गाईज’ नको?
ओके देन...
गर्ल्स ॲन्ड बॉईज!...
आता गर्ल्स ॲण्ड बॉईज म्हणायलाही आम्ही सगळेच्या सगळे काय तरुण-शाळकरी वाटतो काय तुला?...
ए, खुसपटं काढणं बंद करा हं... नाहीतर सर्रळ मी तुम्हाला म्हातारे बुवा आणि बाया म्हणीन!

ॲक्‍चुअली, तुम्ही खरोखरच म्हातारे असलात ना, तर्री मला तुम्हाला तस्सं म्हणायचं नाहीय. कारण माझ्या मित्र-मैत्रिणींची शारीरिक वयं कितीही काहीही असली तरी मनाने, विचाराने, उत्साहाने मात्र ‘माय फ्रेंडस्‌ आर ऑलवेज यंग’ असंच वाटतं मला. मग मनानं तरुण असणाऱ्या मित्रांना असं गाईज किंवा गर्ल्स ॲण्ड बॉईज म्हणण्यात काय वाईट आहे रे? गैर तरी काय आहे?...

आणि शिवाय समजा, तुम्ही आता शाळकरी नाहीत, कॉलेजवासीही नाहीत; कामकाजी झाला आहात, सांसारिक-प्रौढ किंवा अगदी निवृत्त-संन्यासाश्रमी वयाचे झाला आहात आणि तुमची मुलं-नातवंडं आता ‘गर्ल्स-बॉईज’ म्हणण्याच्या वयाची झाली आहेत; त्यांना ह्यॅंव करू नको, त्यॅंव काय करतेस, अशा रागावण्याच्या, धाकात ठेवण्याच्या वयात तुम्ही आहात समजा हं, तर म्हणून काय, तुमच्या मनातला मुलगा-मुलगी कायमचे तुम्हाला सोडून गेलेले असतात काय? तुमच्यातलं खट्याळ बालपण, नाठाळ तारुण्य, अगदीच ठार मेलेलं असतं काय?...

बघा, पाऊस येऊ दे-भिजावंसं वाटतं, की नाही बघा. आपल्या आवडीचं रोमँटिक गाणं लागू दे - बायकोची किंवा नवऱ्याची छेड काढाविशी वाटते की नाही, बघा. गल्ली-अंगणात पोरं खेळत असू देत, तुम्हालाही आपले जुने दिवस आठवून त्यांच्यासोबत हुंदडावंसं वाटतं की नाही बघा !... हां, आता लोक काय म्हणतील किंवा या वयात हे शोभेल का? झेपेल का?... असले काहीतरी विचार मनात येऊन तुम्ही ते करत नसाल, मनातल्या ‘फिरसे फुलपाखरू’ होण्याच्या इच्छेला आवर घालत असाल, तर ती बात अलाहिदा; पण आपल्या मनात, अजूनही स्कर्ट-फ्रॉक घालायला आवडणारी एखादी खेळकर मुलगी किंवा मित्रांवर शायनिंग मारायला हळूच बाबांची गाडी पळवून नेणारा डॅम्बिस मुलगा अजूनही जिवंत आहे, याचा साक्षात्कार सतत नसला तरी किमान अधूनमधून का होईना, होत असतो ना तुमचा तुम्हाला?... असतो ना?...
मऽऽऽग मी गर्ल्स ॲण्ड बॉईज म्हटलं तर एवढं रागवायला काय झालं? की मनात गर्ल्स-बॉईज धांगडधिंगा घालत असताना वयामुळं, जबाबदाऱ्यामुळं, लोकांमुळं, स्टेटस्‌ वगैरेमुळं प्रौढत्व-म्हातारपण वागावं लागतंय, या दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्यासारखं किंवा जखमेवरची खपली काढल्यासारखं झालं, म्हणून तडतडायला झालं? हां! तेच ते!! ती म्हण आहे ना, ती बरोबरच आहे! दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं ! होय ना? खरंच ना?...

आय नो यार, होतं अनेकदा. असं दुटप्पी वागणं नक्कीच चांगलं नाही; पण माणसाला अनेकदा दुहेरी मुखवटे घालून वावरावं लागतं, कळतं मला. बऱ्याचदा आपल्यासमोर जे काही घडतं वा घडताना नजरेला जसं दिसतं, ते तस्संच असेल वास्तवात, याचा नेम नसतो. खरी कहाणी काही वेगळीच असू शकते. अंदर की बात कुछ और हो सकती है!
है के नहीं?...
मध्यंतरी ना याच आशयाची एक गोष्ट वाचनात आली होती.
‘दिसतं तसं नसतं’ ही म्हण चांगल्या अर्थाने स्पष्ट करणारी. तुम्हालाही जाणून घ्यायचीय? वाचा तर मग...
तर, एक सर एमएच्या वर्गात एक गोष्ट सांगत असतात...

एका प्रवासी जहाजाचा समुद्रात अपघात होतो. या जहाजावर एक जोडपं पण असतं. वाट काढत जेव्हा ते लाइफ सेव्हर बोटीजवळ येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की त्या बोटीत एकच जागा शिल्लक आहे. त्या क्षणी नवरा बायकोला मागे ढकलतो आणि स्वतः बोटीत जाऊन बसतो. बायको उभी राहते आणि नवऱ्याकडे बघून एक वाक्‍य जोराने ओरडून सांगते.
आता सर थांबतात आणि ते वर्गाला विचारतात...

‘काय वाटतं तुम्हाला, काय म्हणाली असेल ती बाई आपल्या नवऱ्याला त्यावेळी?’
बहुतांश विद्यार्थी म्हणतात,
‘बाई म्हणाली असेल, स्वार्थी माणसा, काय हे केलंस? माझ्या प्रेमाची हीच कदर केलीस काय? मीच आंधळी होते रे...’ वगैरे वगैरे पण याच आशयाचं काही काही.
एक मुलगी मात्र काहीच बोलत नसते. शांतता झाल्यावर ती म्हणते,
‘ती बाई म्हणाली असेल, की आपल्या पिल्लाची काळजी घे!
सर आश्‍चर्यचकित होतात. ते त्या मुलीला विचारतात, ‘बाळा, तुला हे कसं माहीत? ही कथा तू आधी ऐकली आहेस का?’
मान हलवत ती मुलगी म्हणते, ‘नाही; पण माझ्या आईने माझ्या बाबांना हेच सांगितलं होतं, ती कॅन्सरने मरण्याअगोदर!’
सर म्हणतात, ‘बरोबर आहे तुझं उत्तर!’
जहाज बुडतं. बाईचा जीव जातो. तो माणूस घरी परत येतो आणि अक्षरशः तळहाताच्या फोडासारखं जपत आपल्या कन्येला मोठं करतो. काही वर्षांनंतर तो माणूसही मरण पावतो. त्यानंतर काही दिवसांनी वडिलांची खोली आवरत असताना त्या मुलीला आपल्या वडिलांची डायरी मिळते.

डायरी वाचताना कन्येच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागतात. टर्मिनल कॅन्सरनी ग्रस्त असलेल्या पत्नीची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते जहाजावर गेलेले असतात. त्या माणसाने लिहिलेलं असतं, ‘प्रिये, त्या अथांग सागराच्या तळाशी मलाही तुझ्याबरोबर निजधामास जायचं होतं; पण फक्त आपल्या मुलीसाठी मी तुला एकटीला जाऊ दिलं...’

कथा संपते आणि वर्गात निरव शांतता पसरते. कथेचा मथितार्थ विद्यार्थ्यांना समजलेला असतो...
आपण सगळे वर वर बघून सर्व गोष्टींना जज करतो; पण आपण समोरच्याच्या भावना, त्याच्या अडचणी समजून घेत नाही... ज्या घ्यायला हव्यात!
फ्रेंडस्‌,  
आपणही अगदी साधीशी, आपल्या रोजच्या जीवनातली, सहज आसपास दिसणारी उदाहरणंही आठवू शकतो...  
काही मित्रांचा हात खिशात बिल देण्यासाठी सर्वांत आधी जातो, कारण त्याला मैत्रीची कदर असते. ना की त्याच्याकडे अमाप पैसा असतो.
काही व्यक्ती सर्वांत आधी पुढे येऊन कामाला लागतात. कारण त्यांना जबाबदारीची ओळख असते.
भांडणानंतर प्रथम माफी मागणारा नेहमीच चुकीचा असेल, असं नाही. कदाचित त्याला तुमची खूप कदर असते.
तुम्हाला मदत करणारे तुमचं काही देणं लागत नसतात; पण ते तुमच्यात सच्चा दोस्त शोधत असतात.  
तुम्हाला मेसेज पाठवणारे वेडे नसतात. त्यांना तुमची गरज असते! हो ना?...
खरंय ना हे?
अरे या मेसेजवरूनही एक खूप दिवसांपासून सांगायचं होतं ते आठवलं... म्हणजे हे मेसेजीस, या मेसेजिंग सिस्टिम्स, हा सोशल मीडिया... योग्य कारणांसाठी, खऱ्या गरजेइतकाच वापर केला तर माध्यमं म्हणून नक्कीच ‘ग्रेट’ आहेत ते... वादच नाही; पण... पण त्यांच्या आहारी जाऊन आपण आपलं संवादाचं नैसर्गिक अंगच विसरलोय का? आपण ते हरवत चाललोय का? व्हर्च्युअल गोष्टींच्या प्रेमात पडल्यानं आपलं वास्तवाशी नातंच तुटत चाललंय का?... असं एक राहून राहून वाटावं, असं काही काही आजूबाजूला घडताना दिसतं.

 परवा एकजण सहजच बोलता बोलता खूप मोठं वास्तव सांगून गेला... म्हणाला,
पूर्वी पातेल्याच्या तळाशी लागलेला थोडासा करपलेला पदार्थ खाताना मजा यायची... वाटायचं, जसा काही तो पदार्थ आपल्यासाठीच भांड्याला घट्ट चिकटून बसलाय... नात्यांमध्येसुद्धा असाच घट्टपणा असायचा. कुणी शब्दांत बोललं नाही तरी आपसूक जाणवायचा... आता माणसं बोलतात खूप; पण आपल्यात असूनही आपल्यात नसल्यासारखी वाटतात... कारण माणसंसुद्धा भांड्यासारखी ‘निर्लेप’ झालीहेत... काहीही चिकटू न देणारी!

फ्रेंडस्‌, हे असंच चालू राहिलं, तर एक दिवस असा येईल, की आपण एकमेकांपासून दूर जाऊ. आपल्या आमोरा-समोरच्या निखळ गप्पा मिस्स करू. एकत्र बघितलेली स्वप्नं कदाचित पूर्ण झाली असतील; पण दोस्त सोबत नसतील... दिवस, महिने, वर्षे जातील, त्वचेवर सुरकुत्या येतील, केस पांढरे झालेले असतील, चालायला काठी लागेल... मैत्रीचा कलायडस्कोप आपण फोटोत बघत असताना कदाचित आपली नातवंडं आपल्याला बिलगून विचारतील... ‘हे सगळे कोण आहेत?’
डोळ्यांत पाणी न आणू देता आणि दाटलेल्या सुरात आपण म्हणू,
‘बाळांनो, ही ती सगळी मंडळी आहेत, ज्यांच्यासोबत मी माझ्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ घालवला!’

पण, असं नको ना व्हायला?... मित्र असोत, की आप्त-स्नेही... आपली माणसं आपल्यापासून नकोत ना दूर जायला?... त्यांच्याशिवाय काय अर्थ आहे आपल्या कुठल्याच वैभवाला?...

अर्थात, त्यासाठीही ती आणखी एक म्हण लक्षात हवी घ्यायला... सावली हवी असेल तर आधी स्वतः झाड व्हावं लागतं आणि मैत्री हवी असेल तर आधी मित्र व्हावं लागतं. कुणाला ‘आपली माणसं’ म्हणायचं असेल तर त्यांचं अंतरंग जाणून घेऊन आधी त्यांना आपलंसं करावं लागतं, आपलेपणाने वागवावं लागतं.
केवळ संदेशांचा
पाऊस न पाडता,
सहवासाचं सिंचन
करावं लागतं.

माय फ्रेंडस्‌ आर डुईंग, ऑर,
विल ट्राय टू डू दॅट... शुअरली... आय नो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com