स्पीड पोस्ट

स्पीड पोस्ट

क्षणिक अविचाराने मुले हे जग सोडून जातात. या सुंदर जगावर प्रेम करतानाच अचानक निरोप घेतात. आई-वडील खचतात. त्यातीलच कुणी सावरतो आणि आपल्यासारख्याच इतरांना सावरण्यासाठी स्वमदत गट उभारू पाहतो...

प्रिय जयूस,
जुलैमध्ये आभाळ आले. हा काळा दिवस असेल हे स्वप्नातही नव्हते; पण तो दिवस माझ्या आयुष्यात आला. त्या दिवशी मला सोडून तू दूर निघून गेलास, कधीही परत न येण्यासाठी...

बाळा, तू आत्महत्या केलीस. कोणाला काही न सांगता हे जगच सोडून गेलास. अरे दोन दिवस मी तुझ्या बहिणीकडे राहिले तरी तुला करमायचे नाही. सतत फोन करायचास. तिसऱ्या दिवशी गाडी घेऊन हजर व्हायचास मला घरी नेण्यासाठी. माझी सावली म्हणायचे रे तुला सगळेजण.

नेहमी म्हणायचास, की आई, श्रावणापासून कार्तिक महिन्यापर्यंतचे दिवस ते माझे दिवस. उत्सवाचे, रंगाचे, गंधाचे आणि स्वादाचे. नागपंचमी दिंड, दिव्याच्या अवसेचे दिवे, जिवतीचे पुरण, दर शुक्रवारी ओवाळून घेणे सारे कसे तुझ्या आवडीचे. फुललेली फुले, सोनेरी उन्हे, उत्सवी वातावरण सारे काही त्याच महिन्यात असते असे म्हणायचास. पण हे सगळे एकट्याने कधीच साजरे केले नाहीस. माझ्या शाळेतल्या विशेष मुलांना, तुझ्या आई-वडील नसलेल्या मित्राला आवर्जून बोलवायचास. खूप छान. त्यांनाही खिलवायचे, हा तुझा स्वभाव. गणपतीत तर तुझी गडबड काही विचारू नकोस, मखर शोधण्यात तुम्ही मुले सारी रविवार पेठ पालथी घालायचा. रात्र रात्र जागून मखर तयार व्हायचे. मग मूर्ती शोधण्यात आठ- आठ दिवस लागायचे तुला. मूर्तीचे डोळे मनात भरणारे लागायचे तुला. "श्रीं'ना चांदीचे अलंकार घालायचे, दिव्यांची रोषणाई व्हायची, किती अन्‌ काय सांगू! नैवेद्याचे अनेक प्रकार, दणाणलेल्या आरत्या, दर्शनाला येणाऱ्या तुझ्या असंख्य मित्रांची वर्दळ, मित्रांचे वयही सहा वर्षांपासून साठ वर्षांपर्यंत.

दिवाळीत सजलेला नटलेला लक्ष्मी रोड पाहण्यासाठी सगळ्यांना घेऊन जायचास. माझ्या शाळेतील मुलांना दिवाळी फराळ- फटाके घेऊन यायचास. त्यांच्यात त्यांच्यातलाच एक होऊन रमायचास. विशेष मुलांना एकदा तर क्‍लबमध्ये जेवण दिलेस, त्यांना "हॉटेल मॅनर्स' समजावेत म्हणून. तुझ्या ताईच्या मुली तर तुझा जीव की प्राण. त्यांच्या वाढदिवसाला तुझी बहीण आणि तिच्या नवऱ्याने "आपले घर'मधील अनाथ वसतिगृहात राहणाऱ्या बधिर-मूक छोट्या मुलांना बोलावले होते. ती मुले जादूचे प्रयोग बघण्यात, हातावर टॅटू काढून घेण्यात, खेळण्यात हरवून गेली होती. त्यांना होणाऱ्या आनंदात तूही हरवून गेला होतास.

लहानपणी खूप आजारी होतास तू. तुझ्या समजूतदार सोशीकपणाने मन भरून यायचे. तेव्हापण तू म्हणायचास, "आई माझा कान दुखतोच गं. पण तू जागू नकोस. तुला सकाळी लवकर उठून सगळे करून शाळेत जायचे असते ना!' वडिलांचे अनेक वर्षे चाललेले आजारपण, तुझ्या आजी- आजोबांची, लाडूआजीची दुखणी, सारे काही तुझ्या साथीमुळे मी पार पाडले. माझ्या वाढदिवशी तू, स्नेहा आणि दीपूने किती छान "सरप्राइज' दिले मला. सोनेरी वाळूत छत्री घेऊन आरामात पहुडलेल्या व्यक्तीचा केक करून आणलात. झाडून साऱ्यांना बोलावलेस आणि लगेच जुलैला...?
अजून वाटते, मोबाईलवर "जय' म्हणून कॉल येईल. "आई मी आलोय, लवकर खायला दे, नाहीतर माझा भूकबळी जाईल' असे म्हणत तू येशील.

बाळा माझी दीपू, स्नेहा साऱ्यांना आयुष्यात पुढे जायचे आहे. त्यांना माझे अनेक आशीर्वाद आहेत; पण माझ्या आयुष्यातले सगळे रंग उडाले बाळा. तुझ्या जाण्याची ही काळजात रुतलेली कट्यार घेऊन जगणे अशक्‍य झाले आहे, असे जगणे का देऊन गेलास?
चिठ्ठी न कोई संदेश
जाने वो कौनसा देश
जहॉं तुम चले गये
इस दिल को लगाके ठेस
जाने वो कौनसा देश
जहॉं तुम चले गये

पण बाळा मी आता ठरवलेय, तू गेला नाहीस, तुझे माणसांवरचे प्रेम, मुक्‍या प्राण्यांवरचे प्रेम, वृद्ध व्यक्तींवरचे प्रेम, माझ्या शरीराच्या कणाकणांत पसरलेय. माझ्यासाठी तू माझ्या आत जिवंत आहेस.

मात्र, असे दुःख ज्या पालकांच्या वाट्याला आलेय, त्यांच्यासाठी मला स्व-मदत गट काढायचा आहे. तुम्हाला आम्ही चिरंतन करण्याचा प्रयत्न करू. तुमची आवडनिवड तुमच्याविना आमच्या आयुष्यात झालेली पोकळी भरून काढण्याचा एकमेकांच्या मदतीने प्रयत्न करू. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.

या लेखाचा खटाटोप एवढ्याचसाठी, तुझ्यासारखे पाऊल उचलणाऱ्या इतर मुला-मुलींनी आधी आई- वडिलांचा, आमच्यासारख्यांचा विचार करावा. तुमच्यासाठी तन-मनाने झिजणाऱ्या, तुमच्यासाठी जगणाऱ्या पालकांना निराधार करू नका.
- तुझी आई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com