सातासमुद्रापलीकडील माणुसकी

muktapeeth
muktapeeth

पहिलाच परदेश प्रवास. अनोळखी ठिकाणी फोन बंद. रात्र वाढत चाललेली. हॉस्टेलपर्यंत जायचे कसे? आतून घाबरलेली. तरी धीटाईचा आव. त्या रात्री भेटलेल्या ब्रिटिशांनी सहकार्याचा हात पुढे केला आणि मुक्काम गाठून दिला.

वास्तुरचनाशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी मी पुण्याहून लंडनला निघाले. माझा पहिलाच परदेश प्रवास होता. सलग "फ्लाइट' नसल्यामुळे अबुधाबी येथे सुमारे सात तास थांबून नंतर अबुधाबी ते लंडन असा प्रवास होता. संध्याकाळी सातच्या सुमारास लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरले. इतक्‍या दूर लंडनसारख्या मोठ्या शहरातील सुसज्ज अशा हिथ्रो विमानतळावर उतरल्या क्षणी उत्सुकता, आनंद, भीती, काळजी अशा सर्व भावना एकाचवेळी दाटून आल्या. शिक्षणासाठी जरी लंडनमधील वेस्ट मिनिस्टर युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला होता, तरी राहण्यासाठी वेम्बली पार्क परिसरातील ग्रॅंड फेल्डा होस्टेलमध्ये प्रवेश घेतला होता. अन्य दोन भारतीय मुलींनी त्याच होस्टेलमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्याही त्याच दिवशी पोचणार होत्या. विमानतळावरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते शक्‍यच होत नव्हते. पुण्याला घरी देखील संपर्क होईना. "इमिग्रेशन'च्या रांगेत दोन तास गेले. विद्यापीठाची बस निघून गेली होती. आता रात्रीचे साडेदहा वाजले होते. अजूनही कुणाशीच संपर्क होत नव्हता. त्या वेळी पुण्यात पहाटेचे तीन वाजले असणार. आई-वडिलांचा व त्या मैत्रिणींचा फोन झाला. पण माझा ठावठिकाणा कोणालाच कळत नव्हता. आई खूप अस्वस्थ होऊन देवाचा धावा करीत होती.

मला नेमके काय करावे, कोठे जावे कळत नव्हते. चौकशी केल्यावर विमानतळाच्या टर्मिनल चारवरून टर्मिनल तीनवर जावे लागेल असे कळले. त्यासाठी ट्यूब रेल्वेने जावे लागेल असे समजले. चार बॅगा एकमेकांवर ठेवून मी त्या ढकलत चालू लागले. परक्‍या प्रदेशात एकटेपणाची जाणीव अस्वस्थ करू लागली. वरून धीटपणाचा आव आणलेला, पण आतून घाबरलेली मी भांबावल्यासारखी चालत राहिले. चौकशीसाठी योग्य व्यक्तीला शोधू लागले. तेवढ्यात विमानतळावरील एक अधिकारी दिसताक्षणी त्यांना विचारण्यासाठी सरसावले. त्यांनी अत्यंत अदबीने कोठे जायचे ते विचारले. घाबरू नका, असा दिलासा दिला. माझ्या होस्टेलला जाण्यासाठी आधी ट्रेन करून साऊथ हॉल स्टेशनला जावे लागेल आणि नंतर टॅक्‍सी करून पुढे जावे लागेल अशी माहिती दिली. माझी भांबावलेली अवस्था पाहून त्याने चक्क मला दहा पौंडाचे ट्रेनचे तिकीटदेखील स्वतः खर्च करून काढून दिले. ट्रेनमध्ये बसण्यास मदत केली. त्याच्या ओळखीच्या एक ब्रिटीश बाई त्याच ट्रेनने जाणाऱ्या होत्या. त्यांना मला कंपनी देण्यास सांगितले. त्या बाईंनी मला माझे सामान ट्रेनमध्ये घेण्यास मदत केली. माझ्याशी बोलून मला धीर दिला. मला रडू येऊ लागले.

साऊथ हॉल स्टेशनवर उतरल्यानंतर त्याच बाईंनी एक टॅक्‍सी बुक केली. ती पाच मिनिटानंतर आली. त्यांनी परत बॅगा टॅक्‍सीत ठेवायला मदत केली आणि हसतमुख शुभेच्छा दिल्या. टॅक्‍सी ड्रायव्हर पण बोलका होता. त्याने पण व्यवस्थित माहिती देत योग्य ठिकाणी सोडले. तो पाकिस्तानचा असल्याचे कळले. वेम्बली पार्क स्टेडियमला उतरल्यावर प्रत्यक्ष होस्टेलच्या दिशेने अंदाजे चालत असताना एका अनोळखी ब्रिटीश मुलीने स्वतः होऊन चौकशी केली आणि माझी एक बॅग हातात घेऊन माझ्यासोबत चालत चालत व गप्पा मारत अगदी बऱ्यापैकी अंतरावर असलेल्या होस्टेलपर्यंत आली. इतकेच नव्हे, तर होस्टेलच्या आतपर्यंत काउंटरजवळ माझी बॅग ठेवून तेथील व्यक्तीशी बोलून मला नंतर निरोप देऊन गेली. तिथल्या स्वागत कक्षात माझी भारतीय मैत्रीण वाट पाहत बसलेली दिसली तेव्हा जीव भांड्यात पडला. तिने फोन करून माझ्या घरी पुण्याला कळविले की संयुक्ता पोचली आहे.

आईच्या दृष्टीने तर ही खरोखर दैवी कृपाच झाली होती. कारण पाच-सहा तास मी कोठे आहे हेच कोणाला कळत नव्हते. प्रवासाचा शीण, विमानातील जागरण, अबूधाबी विमानतळावर सात तास ताटकळणे आणि लंडनला उतरल्यावर काहीही माहीत नसताना करावा लागलेला ट्रेनचा आणि टॅक्‍सीचा प्रवास यामुळे मी थकले होते, झोप आली होती. तरी मनावरील दडपण मोकळे झाले आणि त्या सर्व अनामिक अशा ब्रिटीश नागरिकांनी केलेली उत्स्फूर्त मदत व दाखविलेली माणुसकी आठवत मी झोपी गेले.

नंतर या विलोभनीय देखण्या लंडन शहरात दीड वर्षे राहून भरपूर फिरले. युरोपात फिरले. स्कॉटलंड, आइसलंड या ठिकाणीही गेले. सर्वत्र खूप माणसे जोडली. सर्वांनी आनंदाने मदत केली. सहकार्य केले. शिक्षणक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. आई-वडील, भाऊ व मावस बहीण लंडनला आले तेव्हा त्यांना संपूर्ण लंडन दाखविले आणि जेव्हा शिक्षण संपवून पुन्हा भारतात यायला निघाले, तेव्हा परत विमानतळावर रडू आले. आधीचे रडणे आणि आताचे रडणे... किती विलक्षण फरक !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com