हाथ की सफाई

सतीश तांबे
शनिवार, 16 डिसेंबर 2017

"खिसेकापूंपासून सावध राहा' असा इशारा बस थांब्यांवर, रेल्वे स्टेशनवर वाचलेला असतो. पण खिसेकापूंचा अनुभव आलेला नसतो. ऐकून काही गोष्टी माहीत असतात, पण त्यांची "हाथ की सफाई' पाहिलेली नसते.

"खिसेकापूंपासून सावध राहा' असा इशारा बस थांब्यांवर, रेल्वे स्टेशनवर वाचलेला असतो. पण खिसेकापूंचा अनुभव आलेला नसतो. ऐकून काही गोष्टी माहीत असतात, पण त्यांची "हाथ की सफाई' पाहिलेली नसते.

लोकल प्रवासातील खिसेकापूंचे अनेक अनुभव गाठीशी आहेत. जोगेश्‍वरीत आसपास राहणाऱ्या काही खिसेकापूंबरोबर गप्पाटप्पादेखील झाल्या आहेत. गुरू-शिष्य परंपरा हे सूत्र असलेल्या "विश्रांती' नावाच्या एका दिवाळी अंकाचे संपादन करताना प्रशांत रुपवते या मित्राकडून एक लेखदेखील लिहून घेतला होता. खिसेकापूंची "हाथ की सफाई' एक कौशल्य म्हणून इंटरेस्टिंग असते. मात्र तुलनेमध्ये बसच्या प्रवासातील खिसे कापण्याचा अनुभव नव्हता. रेल्वेचा अनुभव होता तोदेखील अर्थातच पुरुषांच्या डब्यातील! महिलांच्या डब्यातील पाकीटमारीचा अनुभव नक्कीच वेगळा असणार. पण परवाच्या रविवारी बस आणि महिला पाकीटमार असा "टू इन वन' अनुभव आला.
रविवारी मेगा ब्लॉक असल्यामुळे दादरला जाण्यासाठी वाशी हायवेहून एका एसी बसने जाण्याची वेळ आली. सर्व सीट्‌स भरलेल्या असल्याने सीट्‌सच्या पहिल्या रांगेच्या मागे असलेल्या ठोकळ्यावर चपळाईने जागा पटकावली. बसमध्ये गर्दी वाढतच होती. मानखुर्दच्या स्टॉपवर कडेवर मुले घेऊन पाच जणी बसमध्ये शिरल्या. ठसठशीत व्यक्तिमत्त्वाच्या. साड्या नेसलेल्या. नाकात चमक्‍या. डोईवर गजरे. कपाळावर ठसठशीत कुंकू आणि कडेवर दीड-दोन वर्षांची मुले. अगदी सुखवस्तू म्हणता नाही येणार, पण खात्यापित्या घरच्या वाटणाऱ्या होत्या. माझ्या समोरच्या जागेत गर्दी करून, वाट अडवून उभ्या राहिल्या. त्यांचे खेटून उभे राहणे नकोसे झाल्याने मी त्यांना पुढे जाण्यासंबंधी सुचवले. पण त्या जागच्या हलायला तयार नव्हत्या. मला प्रश्‍न असाही पडला होता की, या एसी बसमध्ये साधी बस समजून चुकून तर चढलेल्या नाहीत ना?

माझी-त्यांची बोलचाल ऐकून माझ्या समोरच्या सीटवरचे वयस्क प्रवासी म्हणाले, ""पाकीट सांभाळा...''
माझी ताबडतोब ट्यूब पेटली. लोकलमध्ये खिसेकापू चढले की, ते अशीच गर्दी करतात, हे आठवले. मी तत्काळ सावध झालो. तसा मी खिसेकापूंच्याच सूचनेनुसार पाकीट सोबत बाळगतच नाही.

पैसे विखुरलेलेच ठेवतो. त्यामुळे खिसा कापायची भीती कमी राहते. तरीही मोबाईल काढायची शक्‍यता राहतेच. नंतर मी त्या बायकांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून होतो. त्यांच्यातील एका बाईने तिच्या कडेवरच्या मुलाला माझ्या समोरच्या ठोकळ्यावर बसलेल्या व्यक्तीच्या शेजारी उभे केले. आणि काही मिनिटांतच त्या मुलाने समोरच्या व्यक्तीचा हात हातात धरून हॅंडलसारखा आधार मिळवला. कंडक्‍टर आल्यावर त्यांनी तिकिटे काढली- चेंबूर नाका. मध्ये प्रवासी या बायकांच्या गर्दीतून वाट काढत-चढत उतरत होतेच. एकूण गोंधळ घातला होता या पंचकन्यांनी. एवढ्यात चेंबूर नाका यायच्या अगोदरच लगबगीने या लेकुरवाळ्या उतरून गेल्या. मग मला सावध केलेल्या व्यक्तीने त्या बायकांचे कारनामे सांगायला सुरवात केली. ते ऐकून आसपासच्यांनी पाकिटे तपासली. मुलाचा हात धरून बसलेल्या समोरच्या व्यक्तीने त्याच्या खांद्यावरच्या छोटेखानी बॅगमधील पाकीट तपासले. तर बॅगची झिप उघडून आत असलेली गुलाबी बडी नोट उडवलेली होती! गृहस्थ चाट पडले. म्हणाले, ""त्या लहान मुलाने माझा हात शोधून शोधून पकडला आणि त्यावर घट्ट पकड घेतली...याचे मला जरा आश्‍चर्यच वाटले!''

लहानगे प्रशिक्षित होते तर...नंतर बसमध्ये हाच विषय होता. पुढच्या स्टॉपला एक तरुण चढला. त्याने त्या बायकांचे वर्णन केले आणि तो म्हणाला, ""त्या बायका या रूटवर खूप चोऱ्या करतात. लॅपटॉप- बॅगदेखील पळवतात आणि चुकून कुणाला संशय आलाच तर आधीच स्त्रीदाक्षिण्य आणि त्यात या लेकुरवाळ्या!''

दुसऱ्या एकाने त्याचा अनुभव ऐकवला. रत्नागिरीला एका माणसाने फोन करायला मोबाईल मागितला. तितक्‍यात गाडी आली म्हणून उभा राहिलो तर, मोबाईल घेतलेला माणूस गायब. आणखी एकजण सांगत होता, की शिवडीला लोकलमध्ये तीन-चार जणांचा एक गट चढला. त्यापैकी एकाच्या हातात वर्तमानपत्रात गुंडाळलेली काच होती. ती नेमकी माझ्या डोळ्यांसमोर धरलेली, म्हणजे मला पलीकडचा माणूस दिसू नये. थोड्या वेळाने माझ्या हातातल्या ब्रीफकेसला हालचाल जाणवली म्हणून मी खाली बघितले, तर एक माणूस गुडघ्यावर बसून ती उघडून बघत होता. मी आरडाओरडा करायला सुरवात करणार इतक्‍यात दुसऱ्याने माझ्या पोटाला चाकू लावला. माझा आवाज बंद. काय चाललेय हे कळूनही आजूबाजूची सगळी गर्दी गप्प. मी त्या गर्दीतून बाहेर पडून थोडा लांब जाऊन उभा राहिलो आणि बॅग चेक केली, तर त्या गर्दीतून एक माणूस पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला, "चेक करनेकी जरुरत नही. हम लोग सिर्फ पैसा निकालते है. तू साले ब्याग लेके घुमता है लेकिन चायका भी पैसा नही है तेरे ब्याग में.'
तर हे असे आहे, सावधान!

Web Title: satish tambe write article in muktapeeth