दिलदार दादा

muktapeeth
muktapeeth

दस्तऐवज लिहिणे हा व्यावसायिक कौशल्याचा भाग असला, तरी ती एक कलाही असू शकते हे त्र्यंबक सखाराम दिघे यांनी दाखवून दिले. म्हणूनच पुण्यातील कितीतरी महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्याकडून लिहिले गेले.

मंडईजवळील श्रीरामेश्‍वराच्या देवळासमोरील दुमजली घर... त्यात पक्षकारांनी तुडुंब भरलेला हॉल आणि सतत कामात व्यस्त असलेले आमचे दादा म्हणजेच त्र्यंबक सखाराम दिघे... हे दृश्‍य आम्ही लहानपणापासून बघत आलो. जिना चढून आलो, की दारातच चपलांचा एवढा मोठा ढीग असायचा, की तो ओलांडूनच घरात जावे लागत असे.

दस्तऐवजासारखे महत्त्वाचे लेखन त्यांनी खूप लहान वयात म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केले होते. एका रात्री धोतराच्या सोग्याने डोळे पुसत एक दस्तऐवज पुरा करीत असलेल्या आपल्या वडिलांना त्यांनी पाहिले. वडिलांचे कष्ट त्यांना दिसले आणि मनाशी निर्णय घेतला, की शिक्षणाच्या मागे न लागता वडिलांना संसाराचा गाडा ओढण्यासाठी त्यांच्या व्यवसायात मदत करायची. त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरूही केले, पण दुर्दैवाने काही दिवसांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि लहान वयातच दादांवर मोठ्या कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यानंतर दादा आपली आई, एक लहान बहीण व चार भाऊ यांच्यासह रामेश्‍वर चौकात राहावयास आले. अर्थाजनास नुकतीच सुरवात झाली असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे अंत्यविधी करण्यासाठी खिशात एकही पैसा नाही. पैसे असलेल्या पेटीची किल्ली आईच्या गळ्यात होती. अशा अवस्थेत असतानाच, दादांचा एक पक्षकार राहिलेले बिल देण्यासाठी आला आणि त्यामुळे त्या पैशातून दादांना त्यांच्या आईचे अंत्यविधी करता आले.

अशा अडीअडचणींतून व्यवसायाला सुरवात झाली होती. त्यांचे धाकटे बंधू रामचंद्र दुसऱ्या गावी नोकरी करीत होते. ते पुण्याला परतले व दोघांनी मिळून दस्तऐवज लिहिण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय चालू केला. तेव्हापासून ही राम-लक्ष्मणाची जोडी दिघे यांचे कुटुंब सांभाळू लागली. कालांतराने त्यांचे दस्तऐवज मामलेदार कचेरीत खूपच प्रसिद्धीस येऊ लागले. पुण्यामध्ये व पुण्याबाहेर सुद्धा त्यांचे नाव अनेकांच्या मुखी येऊ लागले. त्याकाळी हस्तऐवज हाताने लिहिले जात असत. टंकलेखनाचे तंत्रज्ञान नंतर आले. नोटिंग, ड्राफ्टिंगमध्ये त्यांच्यासारखे कौशल्य असणारे लोक त्या काळी बोटांवर मोजण्याइतके होते. मुद्देसूद लेखन, सहज शैली, सुवाच्च अक्षर, उत्कृष्ट संभाषण कला व सचोटीने व्यवहार करण्याची वृत्ती यामुळे पक्षकारांचा दादांवरील विश्‍वास अधिकच दृढ होत गेला. मणीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, बी. जी. शिर्के, मोहन धारिया, प्राचार्य शिवाजीराव भोसले, बाबूराव सणस अशा नामवंत व्यक्ती, तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी, डॉक्‍टर, कित्येक मंत्री यांचे व्यवहार दादांच्या हातून झाले.

आम्हाला अजूनही आठवते आहे, ते म्हणजे पानशेतचे धरण फुटून पुण्यात आलेला पूर. त्याच्या दुसऱ्या दिवशी खडकवासला धरण फुटल्याच्या अफवेने हादरवून सोडले होते. सोने-नाणे-संपत्ती घेऊन लोक पर्वतीच्या दिशेने धावत होते. पण दादांचा जीव अडकला होता तो त्यांच्याकडे असलेल्या असंख्य लोकांच्या लाखो-करोडोंच्या व्यवहारांच्या कागदपत्रांत. तीच त्यांची संपत्ती होती. परंतु देवाच्या कृपेने ती अफवा निघाली व मोठे संकट दूर झाले.

त्यांनी सांसारिक जबाबदाऱ्या निभावल्या. त्यातच दोघा भावांच्या अपघाती मृत्यूचे आघातही सोसले. खडतर परिस्थितीशी सामना करताना त्यांनी दिघे घराण्याला लाभलेले श्रीरामाच्या उपासनेचे व्रतही अविरतपणे चालू ठेवले होते. कुलस्वामिनी श्रीजननी देवीच्या सेवेतही स्वतःला वाहून घेतले होते. देवीच्या नवीन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा त्यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली यथार्थपणे पार पडला.
दादांच्या स्वभावातील करारीपणा व धडाडी पाहून आम्हाला त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा वाटे, पण त्यांच्या करारीपणाखाली लपलेले त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा यांचाही वेळोवेळी प्रत्यय येत असे. त्यामुळेच त्यांच्या आम्ही मुली असल्याचा आम्हाला अभिमान वाटत असे. त्यांची अगत्यशील वृत्ती व निरपेक्ष भावनने दुसऱ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळे आमच्या घरात नातेवाईकांचा, पै-पाहुण्यांचा सतत राबता असे, त्यामुळे आमचे घर नेहमी भरलेले गोकुळच वाटे. नातवंडांच्या दंगामस्तीला न कंटाळता त्यांच्यावरही प्रेमाचा वर्षाव करणारे दादा आठवले, की वाटते, कडक शिस्तीखाली मायेचा ओलावा जपणारे असे आजोबा प्रत्येकाला मिळावेत !
असे हे आमचे प्रेमळ व दिलदार दादा आता नुसत्या आठवणीतच राहिले आहेत. दस्तऐवज लिहिणे हा व्यावसायिक कौशल्याचा भाग असला, तरी ती एक कलाही असू शकते हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच अखेरपर्यंत कितीतरी महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्याकडून लिहिले गेले. वयाच्या 74 व्या वर्षी कामात व्यस्त असतानाच टंकलेखकाला मजकूर सांगत असताना ठसका लागून त्यांना देवाज्ञा झाली. त्यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या आठवणी मनात उसळून आल्या, इतकेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com