जलप्रवास: नितळ, स्वच्छ, सुंदर समुद्र पाहण्याची संधी

शशिकांत सांब
सोमवार, 6 मार्च 2017

जलप्रवासाचं कुतूहल तर होतंच. त्यात लक्षद्वीपची सहल. विशाल सागरातील छोट्या छोट्या बेटांना भेट देत ती संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करणं हा एक वेगळाच आनंद आहे.

जलप्रवासाविषयी कुतूहल होते. क्रूझमध्ये चार दिवस राहण्याची, नितळ, स्वच्छ, सुंदर समुद्र पाहण्याची, हिरवीगार नारळाच्या माडांची बेटे, प्रवाळे पाहण्याची संधी लक्षद्वीप प्रवासात मिळाली.

लक्षद्वीप हा उष्ण कटिबंधातील छत्तीस लहान - लहान बेटांचा समूह. भारतातला हा सर्वांत लहान प्रदेश. पश्‍चिम किनारपट्टीवरील कोची शहरापासून ही बेटे 220 ते 440 किलोमीटर लांबवर पसरलेली आहेच. त्यांचे क्षेत्रफळ फक्त बत्तीस चौरस किलोमीटर आहे. यापैकी फक्त दहा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. बोटीने येणाऱ्या पर्यटकांना तीन बेटे पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. या बेटांवरील लोकसंख्या अंदाजे चौसष्ट हजार आहे. कोची व मेंगलोरपासून लक्षद्वीप टुरिझमच्या बोटीने लक्षद्वीप पाहता येते. तसेच बेंगलोर, चेन्नई, कोची येथून विमानानेही जाता येते.

जहाजाने जाण्यासाठी लक्षद्वीप टुरिझमच्या सेवा उपलब्ध आहेत. जहाज कोची बंदरात उभे होते. बंदरावरून बोटीवर लोखंडी जिना लावलेला, तर अशा मोठ्या जहाजावर गेल्यानंतर प्रत्येकी दोन व्यक्तींना मिळून एक उत्कृष्ट व्यवस्था असलेली खोली दिली. कारपेट, बाथरूम, ए.सी. इत्यादी सर्व व्यवस्था या खोलीला होती. खिडकीच्या काचेतून समुद्र पाहता आला. खोली अतिशय स्वच्छ होती. एवढेच नाही तर जहाजाच्या मुख्य कार्यालयातून सूचना समजण्यासाठी ध्वनिक्षेपक बसविलेले होते.
बोटीचे एकामागून एक पॅसेज आणि पर्यटकांच्या खोल्या पाहून थक्क झालो. खोली नंबर लक्षात नसेल तर पटकन आपली खोली सापडत नाही. जवळच छोटे दुकान होते. आपल्याला चहा-कॉफी मिळू शकते. या जहाजाला सात मजले आहेत. त्यात छोटे रुग्णालय, कॅन्टीन, कार्यालय आहे. कॅन्टीनमध्ये ठराविक वेळी न्याहारी, दुपारचे व संध्याकाळचे शाकाहारी व मांसाहारी जेवण उपलब्ध होते. जहाजाच्या वेगवेगळ्या मजल्यावरून समुद्र पाहता आला. शेवटच्या मजल्यावर एखाद्या पटांगणाएवढी जागा उपलब्ध होती.

जहाजामध्ये लक्षद्वीप बेटावरचे रहिवासीही होते. मात्र, संपूर्ण प्रवासात पर्यटक व स्थानिक प्रवासी यांचा एकमेकांना त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या मजल्यावर व्यवस्था केलेली होती. जलप्रवासात वेगवेगळ्या पातळीवर असलेल्या डेकवर, पर्यटक निवांतपणे जलप्रवासाचा आनंद घेत होते.

कोचीवरून साधारणपणे संध्याकाळी पाच वाजता आमची बोट कलपनि बेटाकडे निघाली. अंतर 287 किलोमीटर. डेकवर उभे होतो. पाणी कापत जाणारी बोट आणि विशाल समुद्र यांच्या साथीने आमचा प्रवास सुरू झाला आणि केव्हा सकाळ झाली ते कळले नाही. बेट जवळ आले. माडांच्या बागा आणि स्वच्छ समुद्र खुणावू लागला. प्रत्येक बेटावर नारळाचे पाणी देऊन स्वागत केले जाते. काही छोट्या बेटांवर गेलो. तेथे वस्ती नाही. त्या बेटांची रचनाही अशी आहे की तिथवर लाटा येत नाहीत. त्यामुळे लगुन म्हणजे कमी खोलीचे तलाव तयार होतात. या नैसर्गिक तलावात आपण बनाना बोटी चालवू शकतो.

दुसऱ्या दिवशी मिनीकॉय बेटावर पोचलो. तेथील दीपस्तंभ पाहण्यासारखा आहे. अनेक साहसी खेळ तेथे उपलब्ध आहेत. तिसऱ्या दिवशी कावरट्टी या लक्षद्वीपच्या प्रशासकीय कामाचे मुख्य ठिकाण असलेल्या बेटावर गेलो. छोट्या होड्यांमधून समुद्रतळ पाहत हिंडलो. या होड्यांचा तळ काचांचा होता. त्यातून समुद्रखालची दुनिया पाहायला मिळत होती. फिशटॅंकमध्ये असतात असे रंगीत मासे तर कधी मोठे मासे तर कधी प्रवाळाचे दर्शन होते. एक गोष्ट समजली की, या बेटांवर कुत्री व साप नाहीत. या बेटावरून पुन्हा कोचीला परत निघालो. सूर्यास्त झाला. जहाजाच्या डेकवर एक भावपूर्ण वातावरण तयार झाले. सागर आणि सूर्य हे दोघे सृष्टीचक्राचे मुख्य शिलेदार आहेत. उपनिषदातील एक सूत्र आठवले-

।।ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्ते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।

ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण झाले आहे. तसेच पूर्णात पूर्ण मिळविले किंवा कमी केले तरी शिल्लक पूर्ण राहते. सागराच्या पाण्याची वाफ सूर्यामुळेच होते. त्या वाफेतूनच पाऊस पडतो आणि सृष्टीचे चक्र चालते म्हणजेच सागर आणि सूर्य हे पूर्ण आहेत आणि या पूर्णातून पूर्ण जन्माला येऊन दोघेही पूर्णच राहतात.

एकदा सागरातील एका थेंबाला सागर व्हावयाचे होते. त्याला सांगितले की तू सागरात विलीन हो. तो सागरात विलीन झाला आणि सागर बनला. गुरू नानकांचा "निरंकारी' शब्दसुद्धा याच अर्थाचा आहे. रात्रीचा समय आता सरला होता आणि हा समुद्राचा खजिना पाहून आम्ही पुन्हा कोचीला परतलो ते लक्षद्वीपच्या आठवणी मनात घेऊनच.