ती गेली, तेव्हा...

शोभा अशोक हरोलीकर
मंगळवार, 9 मे 2017

खूप आनंदात होतो. बोमडिलाला पोचलो होतो. सेलापासची खिंड ओलांडायची होती. पण काही अनपेक्षित घडत गेले आणि एका मैत्रिणीला अरुणाचलमधील एका नदीकाठी निरोप द्यावा लागला.

खूप आनंदात होतो. बोमडिलाला पोचलो होतो. सेलापासची खिंड ओलांडायची होती. पण काही अनपेक्षित घडत गेले आणि एका मैत्रिणीला अरुणाचलमधील एका नदीकाठी निरोप द्यावा लागला.

एका पर्यटन कंपनीबरोबर आम्ही ईशान्य भारताच्या दौऱ्यावर निघालो होतो. आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालॅंड आणि मणिपूर या राज्यांचा समावेश होता. आसाम व मेघालय येथील प्रवास संपवून आम्ही अरुणाचलला जाण्यासाठी तेजपूरहून निघालो. घाटातील अरुंद, खडकाळ रस्ते पार करत, काही ठिकाणी डोंगर फोडून रस्तारुंदीची कामं चालू होती, तिथे थांबत संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बोमडिला या गावी पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता सेलापास ही 13500 फुटांवरील खिंड ओलांडून तवांगला जायचे होते. पुढच्या प्रवासाच्या तयारीसाठी आम्ही सर्वजण आपापल्या खोल्यांत गेलो. सामान आवरून अकराच्या दरम्यान निजानीज झाली.
पंधरा-वीस मिनिटं झाली असतील. माझी बालमैत्रीण जया खर्शीकर हिला श्‍वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. ती अस्वस्थ होऊन उठून बसली. तिची मावशी घाईघाईत शेजारच्या खोलीतील डॉ. सुधीर कुलकर्णी यांना उठवायला धावली. कुणालाही जरूर पडेल तर असावीत म्हणून काही औषधे, इंजेक्‍शन्स त्यांनी बरोबर ठेवली होती. अशोक आणि डॉ. सुधीर धावतच जयाच्या खोलीत पोचले. परिस्थिती गंभीर होती. जयाला ऑक्‍सिजनची नितांत गरज होती. तिला श्‍वास घेणं अशक्‍य झाले होते. हॉटेल मालकिणीच्या मदतीने टूर मॅनेजरला हॉस्पिटलमध्ये पाठवले. पण तिथे ऑक्‍सिजन सिलिंडरची सोय नव्हती. तोपर्यंत डॉ. रंजना व सुधीर यांनी जयावर शक्‍य ते उपचार सुरूच ठेवले होते. पण काही क्षणांमध्ये सारे उपचारच थांबले. आम्ही सगळे सुन्न झालो. सदोदित हसरी, आनंदी अशी माझी बालमैत्रीण माझ्या डोळ्यांदेखत निष्प्राण झाली होती.

पुढची परीक्षा आमच्यासाठी आणखीनच कठीण होती. यापुढील व्यवस्था?
पुण्यापासून दोन-अडीच हजार किलोमीटरवरील अनोळखी प्रदेशात आम्ही होतो. ना कुणाची ओळख ना पाळख, ना भाषा माहीत, ना रीतिरिवाज माहितीचे. लगेच जयाच्या भावांना पुण्यात फोन करून सर्व घटना सांगितली. जयाचे अंत्यसंस्कार आम्ही बोमडिला येथेच करावेत असं ठरले. पण आता मृतदेह सकाळपर्यंत ठेवून घ्यायला हॉटेल मालकीण तयार नव्हती. तिच्या व्यवसायावर याचा परिणाम होण्याची तिला भीती होती. तिच्या दृष्टीने ते बरोबरच असेल. शेवटी तिच्याच वाहनातून मृतदेह घेऊन सुधीर, टूर मॅनेजर व इतर मदतनीस रुग्णालयात गेले. अतिशय दयनीय अशा अवस्थेतील रुग्णालयात डॉक्‍टर नव्हते. शवागारात मृतदेह ठेवून मंडळी पहाटे तीन-साडेतीनला हॉटेलवर परतली. जयाच्या भावजयीचे भाचेजावई नुकतेच अरुणाचलमध्ये बदली होऊन रुजू झाले होते. त्यामुळे लष्कराच्या मद्रास रेजिमेंटचा एक हवालदार मदतीसाठी सकाळी हॉटेलवर येण्याचे ठरले. त्याच वेळी मला आठवलं की, पुण्यातील आमचे शेजारी अविनाश मुळ्ये यांची मुलगी चिन्मयी आणि जावई केदार जोशी हे "सेवाभारती' या संघटनेतर्फे अरुणाचलमध्ये काही काळ काम करून आले होते. त्यांच्या तिथे ओळखी होत्या. त्यांची काही मदत होऊ शकेल असे मनात आले. उजाडताच श्री. मुळ्येंना फोन केला. केदारने अरुणाचलमधील कार्यकर्त्यांना फोन करून मदत करण्याची विनंती केली. लगेचच तीन कार्यकर्ते हॉटेलवर पोचले.

सकाळी साडेसात वाजता हॉटेलबाहेर पडलेले सुधीर आणि अशोक या मंडळींच्या मदतीने पोलिस स्टेशनमध्ये नोंद, हॉस्पिटलमधील पोस्टमार्टेम सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, अंत्यविधीचा परवाना मिळवण्यासाठी धावाधाव करत होते. दुपारी एकच्या सुमारास मृतदेह ताब्यात मिळाला. बोमडिला येथे सर्व बौद्धधर्मीय लोकच असल्यामुळे तिथे हिंदू स्मशानभूमी नव्हती. सेवाभारतीच्या लोकांनी बरीच खटपट करून एक वाहन मिळविले. हॉटेलपासून पस्तीस किलोमीटरवर डोग्रा रेजिमेंटच्या नदीकाठावरील जुजबी तयार केलेल्या स्मशानभूमीवर गेलो. डोग्रा रेजिमेंटच्या जवानांनी चिता रचून ठेवली होती. आदरपूर्वक जयाचा मृतदेह चितेवर ठेवला गेला. शेवटचा नमस्कार करून अग्नी दिला गेला. कोण कुठले आम्ही, पर्यटनासाठी पुण्याहून तिथे जातो आणि कोण कुठली जया, तिथे पूर्णपणे अनोळखी लोकांकडून तिच्यावर अग्निसंस्कार होतात. भारतीय सेनेतील जवान आणि सेवाभारतीचे लोक आमचे धन्यवाद नम्रपणे नाकारतात आणि उलट म्हणतात, की "ये हमारा कर्तव्य है, ये हमारा सौभाग्य है की ईश्‍वर ने हमे ये पुण्यकर्म करनेका मौका दिया'. याला कसले ऋणानुबंध म्हणायचे?

सेवाभारतीचे दोन-तीन कार्यकर्ते सतत आमच्या संपर्कात होते. त्यांचे साडेतीन हजार कार्यकर्ते तेथे गरीब, अशिक्षित लोकांसाठी अनेक आघाड्यांवर अनेक वर्षांपासून काम करतात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही यथाशक्ती तिथे सेवाभारतीला देणग्या दिल्या.

या राज्यामध्ये अनेक पर्यटन कंपन्या सहली नेतात. अशा उंचीवरील किंवा कुठेही कुणालाही वैद्यकीय मदत लागू शकते. काही अत्यावश्‍यक औषधे, इंजेक्‍शन्स आणि ऑक्‍सिजन सिलिंडर्स कंपन्यांनी बरोबर ठेवणे अत्यंत आवश्‍यक आहे, असे वाटते. स्थानिक डॉक्‍टरांशी सततचा संपर्क ठेवून त्यांची सेवाही बांधून घेतली पाहिजे, असेही सुचवावेसे वाटते.