मूल्य...

मूल्य...

हाऽऽऽय!
हाऊ आर यू?...
उकाड्याने हैराण तरी सुट्यांचा गारवा... कधी तरी यार, कामाच्या धबडग्यातून वेळ काढून स्वतःला जाणा-पारखा!
...काय चाल्लंय आपलं? ...काय करायचं होतं आपल्याला? ...कसं करतो आहोत आपण? ...जे चाल्लंय, जे होतंय, त्यानं खरंच सुखी-समाधानी आहोत का आपण? ...काही चुकत तर नाहीय ना आपलं? की सारं आलबेलच आहे? ...की कधी कधी दुःख बरं वाटावं आणि सुखही डाचावं तसं सारं काही आलबेल असल्याचाही त्रास होतोय!... सोचो यार... कभी कभी तो सोचो!

गेल्या आठवड्यात ‘थिंक-आऊट ऑफ बॉक्‍स’ असं म्हटलं तर काही जण म्हणाले, अगं बाई तू म्हणतेस ते खरंच खरं आहे, पण ‘आऊट ऑफ बॉक्‍स’ म्हणजे ‘थोडा हटके’, ‘थोडा वेगळा’ विचार करण्यापूर्वी ‘नुस्ता विचार’ तरी करू देत कोणी कोणी! कारण, अनेक लोक, उठायचं, खायचं, प्यायचं, ठरलेलं काम ठरलेल्या पद्धतीने करायचं, पुन्हा खायचं, प्यायचं, टीव्ही बघणं किंवा फिरणं जे काही असेल ते सरावाने आंधळ्यासारखं करायचं, पुन्हा झोपायचं, उठायचं... अशाच चक्राकार गतीनं आपलं जीवन जगत असतात. आता ज्या असल्या मिळमिळीत आयुष्यात काही थ्रीलच नाही, काही चॅलेंजच नाही, काही नवेपणच नाही, काही विचार नाही, काही ध्यास नाही, ध्येय नाही, त्याला ‘जगणं’ तरी कसं म्हणायचं, नाही का? ते तर, आला दिवस निर्विकारपणे पुढे ‘ढकलणं’च म्हणायला हवं. अशा ‘ढकलगाडीवानांना’ जरा, कसानुसा, साधासुधासा तरी जीवनाचा विचार करू दे आधी, मग ‘आऊट ऑफ बॉक्‍स’बद्दल सांग...
घ्या!! आता काय बोलायचं यावर यार? पॉईंट तो बराबर है, लेकिन किसने अपने जीवन में क्‍या करना है, ये तो वो खुदही तय करेंगा ना?... आता तुम्ही म्हणता की काही काही लोक, काही काही काय, बरेच लोक, विचारच नाहीत करत. पण बरेच लोक, जरा जास्तच विचार करतात. काही जण अजिबात नाही, काही जण फारच, तर काही जण समतल-संतुलित... हे प्रकृतीचंच प्रवृत्तीचित्र आहे ना, त्याला ‘आपण’ बदलू शकतो थोडंच?... अजिबात न करणाऱ्याला दुसऱ्या कोणी कितीही ‘कर’ म्हणून सांगू दे, तो ते करणार नाही आणि खूप करणाऱ्याला, ‘आता बस्स बाबा, थांब’ असं कितीही कोणीही सांगितलं तरी तो थांबणार नाही. संतुलित माणूसच स्वतःचे विचार प्लस दुसऱ्यांचा सल्ला, यांचा सारासार मध्य काढून वागण्यात बदल करू शकतो. बाकी जे काही आहे ते कोणी सांगून बिंगून कधीच होत नाही. माणसाने स्वतःच स्वतः ठरवलं-केलं तरच काही होतं आणि हे होण्यासाठीही माणसाला स्वतःच स्वतःच्या वागण्याबद्दल, स्वतःबद्दल आधी जाणीव व्हायला हवी ! अशी जाणीव होणारीही बरीच माणसं असतात. बघा ना, गेल्याच आठवड्यात किमान पंधराएक जणांनी एकच मेसेज फॉर्वर्ड केला... काही तरी चुकतंय आपलं, खरंच कधी कधी होतं असं म्हणून... मूळ पोस्ट कुणाची-काय, काही ठावठिकाणा-थांगपत्ता नाही. फॉर्वर्ड ॲज रिसिव्हड्‌, या प्रकारातली... पण ज्यानं कोणी स्वतःच्या भावना शब्दबद्ध करता करता अनेकांच्या अशाच भावनांना वाट करून दिलीय, जाग आणून दिलीय, त्याला सलाम करावासा वाटला, ती वाचून. अशी कोणती पोस्ट म्हणता? वाचायचीय का तुम्हालाही? ही घ्या, वाचा...

होतं असं कधी कधी.........
खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो आपण...
बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली...
इच्छा असूनही कॉल उचलू शकत नाही आपण...
संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते...
परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे...
टाळतो आपण कॉल करायचा....
त्याचा दोन दिवसांनंतर मेसेज येतो...
‘तुझ्या ऑफिसबाहेर होतो...
भेटलो असतो...’
जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच...
स्वतःला खोटं खोटं समजावत...!
कडक उन्हात सिग्नलला बाईक उभी असते आपली...
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं भीक मागत असतं...
माया, कणव दाटून येते मनात आपल्या...
‘कसं आपल्या आई-वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत?’
पाकिटात हात जातो...
शंभराची नोट लागते हाती...
व्यवहार जागा घेतो ममतेची...
समोरचा म्हातारा ओळखतो... बोलतो...
‘दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा...’
तो सुटका करतो आपली पेचातून...
आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून...
दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले...
आज कामवाली येणार की नाही याची धाकधूक असते...
तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी...
दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात...
ती येते...
काम आटोपते...
तिच्या मुलांना राहिलेली बासुंदी द्यावी का, या संभ्रमात असताना ती एक डब्बा देते हातात आपल्या...
चिवडा-लाडू असतो त्यात...
‘तुम्ही दर वेळा देता... आज माझ्याकडून तुम्हाला...’
‘कोण श्रीमंत कोण गरीब’, हा विचार सोडत नाही पिच्छा आपला...
डाराडूर झोपेत असतो उन्हाळ्याचे गच्चीवर...
आई उठवते उन्हं अंगावर आल्यावर...
अंगात ताप असतो तिच्या...
आपण सुटीला आलोय घरी म्हणून उसनं बळ आणते अंगात ती...
मेसच्या खाण्याने आबाळ होत असेल म्हणून चार दिवस होईल तेवढे जिन्नस पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात आपल्यासोबत...
दिवस उलटतात...
वडिलांचा एके रात्री फोन येतो...
‘काम झालं असेल तर आईला एक फोन कर... आज तिचा वाढदिवस होता...’
कोडगेपणा म्हणजे हाच तो काय...!
चडफडत facebook च्या virtual मित्रांना केलेले birthday विश आठवतात...
लाजत तिला फोन करतो...
‘आमचा कसला रे या वयात वाढदिवस? तू जेवलास ना?? तब्येतीला जप बाबा...’
ती बोलते...
कानात गरम तेल ओतल्याचा भास होतो...
अश्रूंचा मुक्त वावर होतो डोळ्यांतून...
काही तरी दुरावलंय आपल्यापासून इतकंच जाणवत राहतं...
खरंच,
होतं असं कधी कधी....!!!


खरंच होतं ना असं काही काही, आपल्याही बाबतीत?... पण का होतं तसं?... नाही कळत. कधी-कधी आपल्याच वागण्याचं कोडं उलगडत नाही आपल्याला. एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या वेळी एखाद्या प्रसंगी आपण नेमके तस्सेच का वागतो, खरंच कधी कधी कळत नाही आपल्याला... आणखी थोडा गंभीर विचार करायचा तर तशा अनेक गोष्टी कळत नाहीत आपल्याला. जसं की, कोण आहोत नेमके आपण, काय मिळवायचंय आपल्याला, कोण हवंय आपल्याला? कोणाला टाळायचंय आपल्याला? काय आवडतं आपल्याला?... नाही कळत अनेकदा... कदाचित म्हणूनच... विचार करून असं डोकं भंजाळून घेण्यापेक्षा विचार न करणंच बरं, असं समजावत असतील का अनेक जण आपल्या-आपल्या मनाला?
बट फ्रेंडस्‌, फारसा त्रास न करून घेणाऱ्यांइतकीच वेगवेगळ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्रास करून घेणाऱ्यांची, निरुद्देश जगण्यापेक्षा आपली जिज्ञासा, कुतूहल शमविण्यासाठी, झटणाऱ्यांचीही संख्या आहे आणि असते, बरं का?
येत्या आठवड्यात बुद्ध पौर्णिमा आहे ना? त्यानिमित्तानं यासंदर्भात भगवान बुद्धांनाच त्यांच्या एका शिष्यानं विचारलेली गोष्ट सांगते इथं. सांगू ना?... तुम्ही ‘नको’ म्हणालात तरी मी सांगणारच म्हणा...

तर, स्वतःच्या जीवनाविषयी अनेक संभ्रम असणारा एक तरुण एकदा बुद्धांकडे आला आणि म्हणाला, भगवन्‌, मानवी जीवनाचं मूल्य काय आहे?
बुद्धांनी त्याला एक चमकदार खडा दिला आणि म्हणाले, ‘जा, या खड्याचं मोल जाणून घेऊन ये, मग मी तुला जीवनाच्या मूल्याबद्दल सांगेन. परंतु हा खडा विकायचा नाही, हे मात्र ध्यानात ठेव!’
तो तरुण तो खडा घेऊन बाजारात गेला, एक फळविक्रेत्याकडे. त्याने त्याला विचारलं, ‘याची किंमत काय करशील?’
फळवाल्याने खड्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘१२ आंबे घेऊन जा, हा खडा मला देऊन जा.’

पुढे एका भाजीवाल्याने त्या खड्यासाठी त्याला पोतंभर बटाटे देऊ केले. मग तो सोनाराकडे गेला. त्याने त्याचं मोल ५ लाख केलं. तरुण निघून जाऊ लागताच कोटी-दोन कोटी देतो; पण तो खडा मला विकत दे, असं तो सोनार त्याला गयावया करू लागला; पण तरुणाला तो विकायचा नव्हताच. शेवटी तो एका जवाहिराकडे गेला. त्याला तो खडा दाखवला. तो खडा पाहताच जोहरी क्षणभर स्तंभित झाला. मग भानावर येत त्यानं आपल्या मेजावर एक लाल वस्त्र अंथरलं. त्यावर तो खडा ठेवला. त्याला हात जोडून त्याने प्रदक्षिणा घातली, खाली वाकून डोकं ठेवून त्याने त्याला नमस्कार केला. मग त्या तरुणाकडे वळून तो म्हणाला की, ‘हे तर एक अमूल्य असं दुर्मिळतम माणिक रत्न आहे. त्याचं मोल करता येत नाही, इतकं अमूल्य!’ असं म्हणून त्याने पुन्हा त्या रत्नाला नमस्कार केला. तो तरुण चक्रावला.
विचारांच्या आंदोलनातच तो बुद्धांकडे परतला. घडलेली सारी हकिकत त्याने बुद्धांना सांगितली. आणि म्हणाला, आता सांगा भगवन्‌, मानवी जीवनाचं मूल्य काय आहे?
भगवान बुद्ध स्मितहास्य करत त्या तरुणाला म्हणाले, ‘फळविक्रेत्याने १२ आंब्यांएवढी, भाजीवाल्याने पोतंभर बटाट्यांएवढी, सोनाराने २ कोटींएवढी तर जवाहिराने ‘अमूल्य’ अशी या खड्याची किंमत केलेली तू अनुभवलीस. मानवी मूल्याचंही तसंच आहे. तू हिरा असशील, पण समोरचा माणूस तुझी किंमत त्याच्या त्याच्या स्वतःच्या ऐपतीप्रमाणं, त्याच्या स्वतःच्या कुवतीप्रमाणं, त्याच्या स्वतःच्या ज्ञान-बुद्धी किंवा अनुभवाप्रमाणं करील. वास्तवात ती त्याहूनही वेगळी असू शकते. अर्थात, हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम स्वतः हिरा नाही तर दुसरा माणूसच करत असतो; पण माणसाला स्वतःला घडवण्याचं काम मात्र माणूस स्वतःच करू शकतो आणि हे वैशिष्ट्य निसर्गाने केवळ आणि केवळ माणसालाच दिलेलं आहे. तेव्हा, स्वतःचं मोल स्वतःच जाण आणि ते वाढवण्यासाठी स्वतःला पैलूही स्वतःच पाड!!’
फ्रेंडस्‌, भगवान गौतम बुद्धांची ही गोष्ट वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या प्रांतांत, वेगवेगळ्या प्रतीकांनी सांगितली जाते, पण मथितार्थ मात्र हाच... स्वतःला जाणा, स्वतःला घडवा! आयुष्य, अज्ञानातल्या सुखापेक्षाही जाणिवांच्या आणि जाणिवांनी दिलेल्या कर्तव्यकर्मांच्या आचरणातून मिळालेल्या समाधानात घालवा.
तथास्तु!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com