गोष्ट गावाची

suchita wadekar write article in muktapeeth
suchita wadekar write article in muktapeeth

गाव सुटले; पण गावाच्या आठवणी सुटत नाहीत. त्या बिलगून असतात मनाच्या अस्तराला. थोडा निवांतपणा असला की अस्तर हलते आणि आठवणी चमकू लागतात.

माझे बालपण वाई तालुक्‍यातील ओझर्डे गावात गेले. गाव तसे छोटेसे. त्या काळी पाच हजार लोकवस्तीचे असेल. तेथील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यामुळे सर्वांचा दिवस लवकर उगवायचा. सकाळी अकरा वाजले, की गावात शुकशुकाट पसरायचा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत. संध्याकाळी पाचनंतर पुन्हा लगभग सुरू व्हायची ते रात्री आठ वाजेपर्यंत. रात्री आठनंतर पुन्हा सगळीकडे सामसूम. त्याकाळी आजच्यासारखे टीव्ही गावात कोणाकडेही नव्हते. गावात फक्त ग्रामपंचायतीमध्ये दूरचित्रवाणी संच होता आणि तो सर्वांसाठी खुला असायचा. त्या वेळी त्यावर "दूरदर्शन'चे कार्यक्रम लागायचे; बातम्या, चित्रहार, छायागीत, शनिवारी, रविवारी संध्याकाळी सिनेमा असायचा. हे कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पटांगणात तोबा गर्दी व्हायची. तेव्हा गावातील लोकांना ते एकच करमणुकीचे साधन होते; तसा गावात अधूनमधून चित्रपट दाखवला जायचा पडद्यावर गावातील पद्मावती मंदिरात गावच्या विकासकामांच्या मदतनिधीसाठी. तिकीट असायचे तीन ते पाच रुपये. अधूनमधून नाटकदेखील असायचे. गावातील काही हौशी कलावंतदेखील भाग घ्यायचे नाटकात. मी चौथीत होते, त्यावेळी "गुड बाय डॉक्‍टर' हे नाटक पाहिले होते. त्यात माझ्या काकांनी मुनीमजींची भूमिका केली होती. तेव्हापासून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक काकांना "मुनीमजी' नावानेच हाक मारत असत.

गावात गणपती उत्सवही मोठ्या हौसेने साजरा केला जायचा. दोन मंडळे होती गावात. एक "माळी आळी' आणि दुसरे "साळी आळी'. दोन्हीकडे छान छान देखावे असायचे (पौराणिक, हलते). या दहा दिवसांत दोन्ही मंडळांकडून चित्रपट मोफत दाखवले जायचे पडद्यावर. रात्री नऊनंतर रस्त्यावर पडदा बांधला जायचा आणि पडद्याच्या दोन्ही बाजूला बसून गावातील मुले, महिला, कुटुंबातील इतर लोक सिनेमा पाहायचे. मजा असायची दहा दिवस.

श्रावणात शेवटच्या सोमवारी सोनेश्वर (महादेवाचे मंदिर) येथे यात्रा भरायची. या दिवशी शाळेला सुटी असायची. गावापासून दूर सुमारे पाच किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर निसर्गाच्या सान्निध्यात हे मंदिर आहे. रंगपंचमीच्या दिवशी इथूनच बावधनच्या बगाडाला प्रारंभ होतो. गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोक इथे मिठाईची तसेच खेळण्याची दुकाने थाटायची. भरपूर गर्दी व्हायची. गावातील पद्मावतीदेवी मंदिरात हरिनाम सप्ताहदेखील व्हायचा. या सप्ताहात "ज्ञानेश्वरी'चे पारायण केले जायचे. गावातील बऱ्याच महिला, पुरुष, या पारायणात "ज्ञानेश्‍वरी'चे वाचन करायचे. रोज पहाटे काकड आरती व्हायची, त्यानंतर "ज्ञानेश्वरी'चे वाचन सुरू व्हायचे. संध्याकाळी पाच वाजता प्रवचन असायचे आणि सात वाजता हरिपाठ असायचा सात दिवस. या हरिपाठासाठी गावातील सर्व लहान मुले-मुली हजर असायची. तसेच रोज रात्री वेगवेगळ्या बुवांचे कीर्तन व्हायचे. माझी आजी रोज कीर्तनाला जायची. कधी कधी मीही तिच्याबरोबर जायचे. काल्याचे कीर्तन तर तिचा जीव की प्राण असायचा. शेवटच्या दिवशी गोपाल काल्याचे कीर्तन व्हायचे अन्‌ सप्ताहाची सांगता व्हायची. संध्याकाळी देवीची पालखी निघायची, गावात सगळ्या घरांच्या दारासमोर सडा रांगोळी केली जायची आणि रात्री सर्वांना महाप्रसाद असायचा.
रंगपंचमीला गावात सोंगांचा कार्यक्रम असायचा, गावातील हौशी पुरुष यात भाग घ्यायचे. बैलगाडी, ट्रॅक्‍टरवर जिवंत देखावे उभे केले जायचे आणि त्यांची मिरवणूक पहाटे चार वाजल्यापासून सुरू व्हायची ते दिवस उजाडेपर्यंत. यात गावातील तरुण, सुंदर मुलांना स्त्री भूमिका दिली जायची. रात्रभर त्यांचा मेकअप, गाड्याची सजावट, टेंभे, लायटिंगचे काम सुरू असायचे. इथेदेखील दोन पार्ट्या बर का गणपतीप्रमाणे. गावातील मंदिरासमोर दोन्ही पार्ट्यांची भेट व्हायची.

रामनवमीला "राम जन्मोत्सव' आणि हनुमान जयंतीला "हनुमान जन्मोत्सव' साजरा केला जायचा. हनुमान जयंतीनंतर चार दिवसांनी चतुर्थी-पंचमीला गावदेवी पद्मावती देवीची यात्रा भरायची, म्हणजे अजूनही भरते. चतुर्थीला ताजी यात्रा आणि पंचमीला शिळी यात्रा. पौर्णिमेपासून गावात देवीच्या सवाष्ण घातल्या जायच्या घरोघरी. ताज्या यात्रेला पुरणपोळीचा नैवेद्य असायचा देवीला आणि संध्याकाळी देवीची पालखी निघायची गावातून. घरासमोर पालखी आली की घरोघरी स्त्रिया पालखीची पूजा, आरती करायच्या मग पालखी पुढे जायची. दुसऱ्या दिवशी शिळ्या यात्रेला घरोघरी मटण केलं जायचे. आजूबाजूच्या गावातील लोकांना तसेच पाहुण्यांना बोलावले जायचे जेवायला. यादिवशी गावात तमाशा असायचा लोकांच्या मनोरंजनासाठी आणि संध्याकाळी कुस्तीच्या फडाने सांगता व्हायची यात्रेची.

तर असं हे माझं छोटंसं गाव. ज्याच्या अंगाखांद्यावर मी खेळले, बागडले, लहानाची मोठी झाले, त्या गावाविषयी वाटणारी कृतज्ञता आज शब्दांतून व्यक्त झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com