थ्री-स्टार्स...!

muktapeeth
muktapeeth

काही गोष्टी मरगळलेल्या मनाला नवी ऊर्जा आणि उभारी देतात. आपल्याला वय विसरून जगायला भाग पाडतात. माझ्या आयुष्यात "थ्री-स्टार्स'ने नवीन उमेद निर्माण केली.

सुटीत आम्ही सहपरिवार मिळून गोव्यास जाऊन आलो. मुलगा-सून, लेक-जावई व दोन छोट्या नाती साऱ्यांनी मिळून गोवा एन्जॉय केला! गोव्याचे भुरळ पाडणारे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी दिवसभर भटकंती सुरू असे. शेवटच्या दिवशी हॉटेलपासून जवळच असणाऱ्या कोलवा बीचवर सकाळी दहाच्या दरम्यान किरकोळ शॉपिंगसाठी गेलो. उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. गाडीतून उतरताच बरोबरचे सगळे समोरच्या दुकानाच्या दिशेला वळले. मी मात्र मुलीला व सुनेला सांगून पार्किंगच्या मागील मोकळ्या जागेत काही छोट्या-मोठ्या टपऱ्या होत्या तिकडे चक्कर मारावी म्हणून निघाले. दोन्ही नाती माझा पिच्छा काही सोडायला तयार नव्हत्या. "ए आजी थांबऽऽ, आम्ही पण तुझ्याबरोबर येणार, आपण सॉलिड धमाल करूयात', असे म्हणत माझ्याबरोबर आल्या. मला बरे वाटले आणि थोडा हुरूपही आला. एक-एक टपरी बघत आम्ही चाललो असताना एका टपरीने मात्र आमचे लक्ष वेधून घेतले. ब्रेक लावावा, तशी आमची पावले जागच्या जागी थबकली. चमकून आम्ही एकमेकींकडे पाहिले आणि चेहऱ्यावर हसू फुटले. छोटी रिसा व तिच्याहून थोडी मोठी सेरा दोघी आत जाण्यासाठी घाई करू लागल्या आणि मी? मी आणि या वयात? बरे दिसेल का ते? अशा मनात आलेल्या निरर्थक प्रश्‍नाला धुडकावून, माझ्या प्रौढपणाची झूल झुगारून देत माझ्या नातींच्याच वयाची व त्यांच्यातीलच एक होऊन त्यांच्यासह टपरीत दाखल झाले.

खरंतर त्या टपरीत खास असे काहीच नव्हते, पण ती आमच्यासाठी खरंच खास होती. एक टेबल खुर्ची, टेबलावर दोन बॉक्‍स व निरनिराळे डिझाईन असलेले चार फोटो असे मोजकेच साहित्य असलेली ती एक साधी टपरी एका जॉन नावाच्या टॅटूवाल्याची होती. गिऱ्हाईक नसल्याने मोबाईलवरील गाणी ऐकण्यात तो दंग होता. अचानक आम्हाला पाहून दचकला. मी त्याला म्हटले, ""आम्हाला टॅटू काढून घ्यायचा आहे. काढतोस का?'' भानावर येत जॉन म्हणाला, ""समझ गया दादीजी! इन दोनों को टॅटू निकालना है क्‍या? अभी निकालता हूँ।'' यावर सेरा जरा फणकारूनच म्हणाली, ""नाही, हमारे साथ दादीजी को भी टॅटू निकालना है।'' तेव्हा गोंधळलेला जॉन मला म्हणाला, ""दादीजी आप? और इस उम्र में टॅटू निकालना चाहती हो? टॅटू और उम्र का क्‍या कनेक्‍शन है?'', ""तुम्हे टॅटू निकलना है या नहीं बोलो,'' मी फटकारले.

तो जॉन...का...वॉन माझ्या डोक्‍यातच गेला. एकतर आज मी माझं वय विसरू पाहात होते आणि हा दादीजी-दादीजी करून माझ्या वयाची जाणीव सतत करून देत होता. नंतर मात्र जरा नरमाईने म्हणाला, ""आप गुस्सा मत होना दादीजी! आप सबको मैं टॅटू निकालता हूँ, पहले अंदर आकर अपनी चॉइस का डिझाइन फायनल करो,'' असे म्हणत त्याने ते टेबलावरचे दोन बॉक्‍स उघडले. आता आम्ही तिघी टॅटू काढून घेण्यासाठी एवढ्या उतावीळ होतो की, तो त्या क्षणाला चारशे रुपये जरी म्हणाला असता तरी मी ते दिले असते. दोघी नाती डिझाइन बघू लागल्या. बऱ्याच वेळानंतर तिघींसाठी थोड्याफार फरकाने एकच डिझाइन फायनल केले. थ्री-स्टार्स...तीन...चांदण्या...एकापेक्षा एक लहान होत गेलेल्या. छोटीच्या हातावर एक स्टार, मोठीच्या हातावर दोन स्टार्स व माझ्या हातावर एकत्रित थ्री-स्टार्स असे विभाजन झाले.

जॉनने जान ओतून ठरल्याप्रमाणे तीन चांदण्यांचा ठसा आमच्या डाव्या हाताच्या मनगटाच्या कडेला अगदी अलगद उमटविला. मोठ्या कौतुकाने मी तो परत परत निरखून पाहिला आणि गंमत वाटली मला! मनात आनंदाचे कारंजे उसळले. नाती तर जाम खूष झाल्या. नेहमी आढे-वेढे घेणाऱ्या आपल्या आजीने आज आपल्या बरोबरीची होऊन आपल्या सोबत आनंदाने टॅटू काढून घेतला म्हणून पार हरखून गेल्या होत्या. माझी अवस्था "आज मैं ऊपर...आसमॉं नीचे...आज मैं आगे...' अशीच काहीशी झाली होती. एकदम हलके वाटत होते. तो छोटासा टॅटू मला मोठा आनंद देऊन गेलाच, पण माझ्या मरगळलेल्या मनास फुंकर घालून माझ्या मनात सकारात्मक ऊर्जा जागवून गेला. मी गहिवरले. खरंच! माझ्या नातींनी मला थ्री-स्टार्सच्या रूपात दिलेला अत्यंत बहुमोल आनंदाचा हा ठेवा होता माझ्यासाठी!! हे इवलेसे थ्री-स्टार्स दोन-चार दिवसांनी जरी दिसेनासे झाले तरी माझ्या काळजात कायम घर करून राहतील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com