आधार तर हवाच!

muktapeeth
muktapeeth

"एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' हे सुभाषित माहीत आहेच. वाड्यातून सोसायट्यांमध्ये आलो तरी ते सूत्र कायम आहे; पण आधाराबरोबरचा विश्‍वासही टिकवायला हवा.

ऊन आता चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे पूर्वीच्या वाडे-चाळीतील अंगणातल्या "वाळवणां'ची आठवण झाली. एकत्र कुटुंब असेल तर कुटुंबातील साऱ्या जणी किंवा वाडे-चाळीतल्या साऱ्या जणी मिळून अंगणात वर्षभराच्या वाळवणाची कामे करत असत. त्याचप्रमाणे घरातील झाडलोट, धुणे, भांडी, एखादे वेळी स्वयंपाक करायलासुद्धा मावशी ताई यायच्याच. आता अंगण गेले... अन्‌ बंदिस्त इमारती आल्या. बरीच कुटुंबे विभक्त झाली. आज बराचसा महिला वर्ग नोकरी, व्यवसाय, समाजकार्याच्या निमित्ताने बाहेर असतो. त्यांना "वाळवण' करायला वेळही नसतो; पण अशा नोकरदार महिलांचे प्रश्‍न सोडवायला कितीतरी महिला बचत गटांनी तयार वाळवणे विक्रीसाठी उपलब्ध केली. ही नोकरदार महिला उंबरठा ओलांडते त्याच वेळी तिच्या घराची स्वच्छता करायला, कपडे- भांडी धुवायला, स्वयंपाक करायला, वेळप्रसंगी हिच्या मुलामुलींनासुद्धा सांभाळायला मावशी - ताई वर्ग येतोच. दोघींनाही पैशांची गरज असतेच; पण या नोकरदार महिला वर्ग आणि मदतनीस वर्ग एकमेकांना आधार देऊन एकमेकींवर विश्‍वास ठेवून एकमेकींच्या मदतीला येत आहेत. म्हणजे कितीतरी पूर्वीपासून त्या एकमेकींच्या कळत नकळत उपयोगी पडत आहेत. एकमेकींची सोय बघितली आहे. आजही तेच चित्र आहे. फक्त आपण हा आधार अन्‌ विश्‍वास विसरलो आहोत का? ज्या महिलेवर अन्याय, अत्याचार होत आहे, मग त्यासाठी "जात'मध्ये नको, ही माझ्या ओळखीची नाही. मी कशाला मदतीला जाऊ? शिवाय माझ्या घरातल्यांना पण हे आवडणार नाही... असा विचार न करता मदतीला धाऊन गेलेच पाहिजे... हे धाडस दाखवायलाच हवे.... नाहीतर भय इथले संपणारच नाही!

आज व्हॉट्‌सऍपचा उपयोग "गॉसिपिंग'साठी न करता ज्या महिलेवर अन्याय होत असेल तिच्या मदतीला, तिला आधार द्यायला धावून जाऊया... असे मेसेज गेले पाहिजेत. पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी सर्व महिलांना आवाहन केले आहे... ते असे आहे... "आपल्याला एखाद्या व्यक्तीमुळे किंवा गटामुळे असुरक्षित वाटत असेल तर महिलांनी पोलिसांची मदत घ्यावीच. अन्याय सहन केला तर त्रास देणाऱ्यांची हिंमत वाढेल. म्हणूनच धाडसी व्हा.'.. असे त्यांनी सांगितले आहे.

दुष्ट प्रवृत्तींना शांत करणे हे देवीचे शील आहे. ती जशी उग्र आहे, तशीच ती शीतलही आहे. दुर्गम नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी ती दुर्गा झाली. हाच देवीचा अवतार आता प्रत्येक स्त्रीने अवलंबिला पाहिजे; तरच महिषासुराला मारण्यासाठी ब्रह्मा विष्णु महेश या देवतांची शक्ती एकत्र येऊन महिषासुरमर्दिनी अवतरली. द्रौपदीच्या वस्त्रहरणप्रसंगी द्रौपदीने आर्त स्वराने श्रीकृष्णाचा धावा केला आणि श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून आले. त्याचप्रमाणे आजही चांगल्या वृत्तीच्या व्यक्ती मदतीला धावून येतीलच. तरीपण सर्व महिलांनी एकमेकींसाठी मदतीला धावून गेलेच पाहिजे. नाहीतर वाईट वृत्ती फोफावतच राहील. प्रत्येक स्त्रीचे पाऊल म्हणजे लक्ष्मीची पावले आहेत, तीच सरस्वती अन्‌ दुर्गा आहे. तीच माहेरवाशीण आणि सासूरवाशिणीच्या रूपाने गौरी आहे. म्हणूनच या साऱ्या स्त्री रूपांनी एकत्र येऊन हे महिषासुरमर्दिनींनो आता भय इथले संपवून टाका.

मुलगा काय किंवा मुलगी काय... त्यांची जन्मदात्री तूच आहेस. मग तुझ्या मुलाला ब्रह्मा विष्णु महेश श्रीकृष्ण श्रीराम यांसारख्या देवतांचा आदर्श शिकव. आज भारतमातेच्या रक्षणासाठी जवान लढत आहेत. त्यांच्याच साथीला आता महिलाही (दुर्गा) सीमेवर लढू लागल्या आहेत. आज महिला पोलिसही अंतर्गत सुरक्षेसाठी सज्ज आहेत. त्या सर्व महिला पुरुषांच्या बरोबरीने दोन हात करायला सिद्ध आहेत. आज "उंबरठा' ओलांडून ती पुरुषाच्या बरोबरीने स्वतःचे कौशल्य पणाला लावून देशाची सेवा किंवा नोकरी, व्यवसाय समाजकार्य करत आहे. मग या गोष्टीचे स्वागत करायचे की स्वतःचा अहंकार दुखावला गेला म्हणून तिच्यावर अन्याय करायचा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच सर्व चांगल्या वृत्तीच्या व्यक्तींनी एकत्र येऊन भय इथले संपवलेच पाहिजे...

निमित्त वाळवणाचे होते... पण त्यातला "मदतीचा' चांगला विचार आपण विसरलो आहोत का? नाहीतर पुढच्या पिढीला वाडे- चाळीतले अंगण, त्यावर घातलेली वाळवणे, अंगणात खेळलेले खेळ, त्याचप्रमाणे नातलग, मित्र-मैत्रिणींकडे राहायला जाणे हे सर्व खरे होते. ही फक्त सांगण्याचीच गोष्ट राहील. आता वाडे- चाळी, अंगण पुन्हा येण्याची शक्‍यता नाही.. पण एकमेकांकडे चार दिवस राहायला जाणे हे तरी व्हावे.. ते संपू नये. त्यासाठीच एकमेकांना आधार तर द्यायचाच; पण विश्‍वासही हवा. कारण, आज आपल्या मुलींना कोणाकडे राहायला पाठवावे की नाही, हा विश्‍वासच संपला आहे असे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com