पारावरच्या गप्पा

पारावरच्या गप्पा

‘पार’ म्हणजे काय, हे आता नव्यानं सांगायला नको. जिथं घरातल्या राजकारणापासून ते थेट देशातल्या राजकारणाच्या गप्पा रंगतात तो कट्टा म्हणजे पार. या गप्पा अगदी अगळपगळ असतात. पूर्वी याच पारावर गावाचा न्यायनिवाडा होत होता. अनेकांना याच पारांवरून न्यायही मिळाला होता आणि हेच पार कधी कधी सभेचे व्यासपीठही झाले होते. गावातल्या याच पारांनी आजवर अनेक दिग्गजांची भाषणंही ऐकली आहेत.
हे पार कसे, कधी, कोणी आणि कशासाठी बांधले, याचा अंदाज नव्या पिढीला तितकासा नाही; पण खरंच असे जुन्या घडणीचे पार पाहिले की हे प्रश्‍न डोक्‍यात वळवळतात. पाराच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या वयाचा अंदाजही करता येत नाही. गावात कोणास विचारले तर म्हणतात, ‘आमांस कळतं तरं ह्यो पार अन्‌ हे झाड हाय तसंच हाय.’ म्हणजे ते झाड आणि तो झाडाभोवतीचा पार अद्यापही म्हातारे झालेले नाहीत. हे पार गावातल्या मंदिराच्या आवारात किंवा साधारण गावाच्या मध्यभागी असतात आणि शक्‍यतो पिंपळाच्या किंवा लिंबाच्या झाडाभोवती हे पार पाहावयास मिळतात. हे पार मोठ्या फाडीच्या दगडांनी बांधलेले असतात. त्याची उंची साधारण एका माणसाच्या उंचीइतकी असते. पारावर चढण्यासाठी पायऱ्याही असतात. पाराची कल्पना ज्या अनामिक कलाकाराच्या डोक्‍यात सर्वात प्रथम आली त्याच्या बुद्धिकौशल्याची दाद तर द्यायलाय हवी, कारण हे पार म्हणजे फक्त न्यायनिवाड्याची जागा किंवा व्यासपीठ नव्हते, तर त्यामागे आरोग्याचाही विचार होता. पिंपळ आणि कडुलिंब हे दोन्ही वृक्ष आरोग्याच्या दृष्टीने फारच हितकारक आहेत.

दिवस मावळू लागला, की गावातील लोकांचे पाय पाराकडे पडायला सुरवात होते. दिवसभर उन्हातान्हातून, रानावनातून हिंडून दमलेले पाय पारावर येऊन विसावतात. पूर्वीच्या काळी घरात टीव्ही नव्हते, त्यामुळे जेवणवेळेपर्यंत लोक पारावर बसून गप्पा मारत. आज घरोघरी टीव्ही आल्यामुळे पारावरच्या गप्पा थोड्याफार कमी झाल्या असल्या तरी पूर्ण बंदही झालेल्या नाहीत. कोणी तरी एखादा पाराच्या कडेवर पाय सोडून निवांत बसलेला असतो. दुसरा एखादा मंदिरात जाण्यासाठी किंवा काही कामानिमित्त आलेला असतो. ‘काय म्हादू, एकटाच हाईस आज?’ असं म्हणत तोही त्याच्याजवळ जातो. ‘व्हय दाजी, कट्टाळा आलाय बगा. तांबडामाळ भांगलून सपिवलाच आज.’ हा दाजी म्हणजे गावातल्या कुण्या एकाचा घरजावई म्हणून तो साऱ्या गावाचा दाजीच. ‘ते न्हवं दाजी, तुमी दोन दिस कुठं दिसला न्हाईसा?’ ‘मी व्हय, मी गेलतो गावाकडं,’ असं म्हणत दाजीही पारावर बसतात. ‘आरं, माझ्या थोरल्या भावाच्या लेकाला पान लागलं नव्हं.’ ‘आरं कुणालारं पान लागलं?’ असं म्हणत आता तिसरा गावकरीही त्यांच्या गप्पांत सामील होतो. इथं पान लागणे म्हणजे साप चावणे. आता बघता बघता पार माणसांनी फुलून जातो. ‘आरं, शिवंवरच्या मास्तराच्या घरातबी काल लांबडं आलतं म्हण.ं’ मध्येच कोणी तरी म्हणालं. आता विषयाला धुमारे फुटू लागतात. यावर जमलेली मंडळी आपापली मत मांडतात. ‘आरं त्याला म्हणावं, पारगावातनं वाळू मतरून आन अन्‌ इस्कट घरात.’ मंतरलेली वाळू घरात टाकल्याने घरात सापांचे येणे कमी होते, असा त्यांचा समज. ‘दिसलं जनावर की घ्यायची काटी अन्‌ काढायचं कुडपून’ हा आणखी एका जाणकारानं दिलेला सल्ला. ‘आरं खुळ्या, एवढं सोपं ऱ्हायलं न्हाई ते, कायदा लई कडक झालाया.’ हेही एका जाणकाराचं ऐकीव मत. ‘म्हंजी?’ न समजलेल्या म्हादूचा प्रश्‍न. ‘म्हंजी? आरं मुंगी मारायची सत्ता न्हाई माणसाला अन्‌ ह्यो सांगतोय कुडपायला.’ इथं प्रत्येकाचे विचार वेगळे आणि ते मांडण्याची रीतही वेगळी. कुणी एखादा त्यातील एक शब्द पकडून विषयही बदलतो. ‘सत्ता? आरं आता सारी सत्ता मुदी सायबाच्या हातात हाय बग. आता रोज एक नवीन कायदा येतोय.’ ‘व्हय मर्दा, आता पाश्‍शे आणि हाजाराची नोटबी चालंना झालीय बग.’ ‘काय दाजी, गटळं-बिटळं न्हाई न्हव?’ मध्येच कोणी तरी उपहासात्मक बोलले. ‘हं, इथं इक खायला पैका न्हाई, अन्‌ गटळं कशाचं साटवू.’ इतक्‍यात दाजीचा मुलगा आला. ‘आण्णा, आईनं जेवाय बलिवलंय’. झालं संपली मिटिंग. संपल्या गप्पा. ‘आलो रं’ म्हणत दाजी उठले. पाठोपाठ एकएक उठून चालू लागलीत. आता पार एकाकी झाला. उद्याची वाट पाहत तोही झोपी गेला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com