गर्दी...एक वाहता प्रवाह

गर्दी...एक वाहता प्रवाह

एखाद्या ठिकाणी आपण निर्हेतूक उभे राहायचे. नजर कोरी ठेवून समोरचे दृश्‍य टिपायचे. कानातून आरपार आवाज स्वीकारायचे. अशावेळी वाऱ्याची झुळूक जराही स्पर्श न करता दूर राहील, तर कुणी धसमुसळा धक्का मारून जाईल. तो गर्दीचा प्रवाह असतो कधी शांत, कधी रोंरावता....

स्थळ : महाबळेश्वर ... बाजार.
बाजारातील एका प्रख्यात दुकानाच्या बाहेर उभा होतो. बाकीचे आत गेले होते. दुकान बाजाराच्या मध्यभागी. समोर पोलिस स्टेशन.
संध्याकाळची वेळ. हवेत बोचरा गारवा होता. मी समोरून वाहणारा प्रवाह बघत होतो. तो होता लोकांचा प्रवाह ... गर्दीचा प्रवाह. मला असे निरीक्षण करायला आवडते... काय पाहिले मी?

गर्दीचा रंग
गर्दीला ही एक रंग असतो ... मुखत्वे श्वेत ... मग लाल, निळा, पिवळा, हिरवा असे अनेक रंग मिळून हा प्रवाह पुढे मागे होत असतो. रंगांचे असे अनेक पुंजके समोरून जात होते. काही थबकत होते. काही पुढे तर काही परत मागे जात होते. स्टेशनवर उभे असताना समोरून तुफान वेगाने रेल्वे गेली तर ती कशी अंधुक दिसते तसा काहीसा भास होत होता.

गर्दीचा आवाज
गर्दीलाही एक आवाज असतो ... एक वर्णन न करता येईल असा नाद असतो ... माझ्या कानावर असा अनेक आवाजांचा एकच झालेला गर्दीचा आवाज पडत होता. समोरून जाणाऱ्यांचे बोलणे, एखाद्याचे खोकणे, हसणे, चालण्याचे, कपड्यांची सळसळ , रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांचे तार स्वरातील ओरडणे, समोरील पोलिस स्टेशनच्या बाहेर उभ्या असणाऱ्या जीप सुरू झाल्यावर होणारी घर्घघर , दूरच्या गल्लीतून उठणारी नमाजाची हाक तर समोरील मंदिराच्या घंटेचा स्वर, गाढवाचे रेकणे, गाईचे हंबरणे असे अनेक आवाज कानावर पडत होते, नीट ऐकले तर ते वेगवेगळे आहेत हे लक्षात येत होते. नाहीतर तर अखंड, ज्याला कुठलाच अर्थ नाही असा गोंगाट कानावर आदळत होता.

गर्दीचे हाव आणि भाव
गर्दीतल्या प्रत्येक हालचालीत हावभाव असतात ... हास्य, आनंद, उत्सुकता, नावीन्य, आशा, निराशा, इच्छा, आश्‍चर्य अशा अनेक छटा दिसत होत्या ... हिल स्टेशनला आल्याचा, जरा चेंज, होणारा एखादा विनोद ह्याचा आनंद व त्याचे उमटलेले हास्य, पहिल्यांदाच आलेल्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता, नावीन्य तर बाजारातील वस्तू, त्याच्या किमती बघून चेहऱ्यावर उमटणाऱ्या आशा, निराशा, इच्छा, आश्‍चर्य हे स्पष्टपणे दिसत होते. तर एखादे मुल खेळणे न मिळाल्याने हिरमुसले होऊन पाय ओढत चालताना दिसत होते.

गर्दीची वागणूकनीट बघितले तर त्या गर्दीलाही एक शिस्त किंवा बेशिस्तता असते असे हे दिसते. गर्दीतल्या काहींनी काय घ्यायचे हे आधी ठरवलेलं असते. ती गर्दी त्या-त्या दुकानात जात होती, काही भटकता भटकता आवडीची वस्तू दिसली की त्या ठिकाणी जात होते. काही जण समोर दिसतंय आणि इतर घेत आहेत म्हणून आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी घेत होते.
काही विक्रेते हा घोळका आपल्या इथे येऊन भरपूर खरेदी करेल म्हणून प्रयत्न करताना दिसत होते ...
तर काही विखारी नजरा एका विशिष्ट नजरेने सर्व दिशा न्याहळत होत्या. काही गर्दीतूनही नीट वाट काढत होते, तर काही जण मुद्दाम धक्के मारत चालले होते...

एवढ्यात खरेदी आटपून आमचा चमू बाहेर आला व आम्ही हॉटेलवर परतलो ...

****
रात्री मी एकटाच पाय मोकळे करायला बाहेर पडलो व परत बाजारात आलो.
गारठा जास्तच वाढला होता
सर्वत्र शांतता नांदत होती... एक दोन पानाच्या टपऱ्या चालू होत्या ... दिवे विझले होते

दोन तीन कुत्री अंगाची वेटोळी करून झोपली होती. मंदिरातील देवदेखील झोपले होते ... वाजून वाजून शीणलेली घंटा ग्लान होऊन लटकत होती ...
मुंग्या जशा पटापट वारुळात शिरतात तशी गर्दी आपापल्या स्थळी विसावली होती ... त्या रात्रीकरता तरी प्रवाह थांबला होता ......

****

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com