आनंदाचे डोही

आनंदाचे डोही

आनंद शोधत रामेश्‍वरला जायला नको की काशी गाठायला नको, तो आपल्या आसपास असतो. आपला शेजारी बनूनच आनंद वसतो, फक्त त्याला न्याहाळायला हवे, जिव्हाळ्याने त्याच्याशी बोलायला हवे.

मी सध्या आजी झाल्याच्या आनंदात आहे. माझ्या दोन गोड़ नाती म्हणजे माझे आयुष्य आहे. घरात, तसेच समाजात निरोगी वातावरण मिळणे हे मुलांसाठी खूपच महत्वाचे वाटते. लहानपणापासूनच जर मुलांनी हेवेदावे, भांडणे अनुभवली तर, त्यांची मने निर्मळ, शुद्ध, स्वच्छ कशी राहणार? म्हणूनच घरातील माणसांचे, शेजाऱ्यांचे, मित्र-मैत्रिणींचे एकमेकांशी चांगले नाते असणे आवश्‍यक आहे. घरात पाहुण्यांची ये-जा असणे, पारंपरिक सणसमारंभ साजरे होणे, मोठ्यांचा आदर होणे अशा गोष्टींचा बालमनावर खोल परिणाम होत असतो आणि त्यातूनच मुलांच्या विचारांची जडणघडण होत असते.

आम्ही सिंहगड रस्त्यावर 'श्री वरद' सोसायटीत राहात आहोत. सोसायटी तशी लहानच. अवघी सोळा बैठी घरे. घराभोवती थोडी मोकळी जागा. त्यातच छोटिशी बाग. प्रत्येकाने बागेत आंबा, नारळ, सुपारी लावलेली. दोन बाजूनी लागून घरे आणि मधून कॉलनीचा रस्ता. आत शिरले की मन प्रसन्न होते. दोन्ही बाजूनी पाहात पुढे जावे. .प्रत्येकाच्या बागेत झेंडू, कर्दळ, गुलाब, मोगरा, कुंदा फुललेले. मुख्य दरवाज्यावर कमानी आणि त्यावर जाईच्या, जुईच्या वेली. तिन्ही सांजेला तर विचारूच नका, वाऱ्याच्या झुळकीबरोबर रातराणीच्या मंद सुवासाने आसमंत भरून जातो, मन भरून जाते. अगदी कोकणात असल्यासारखे वाटते.

आमची सोसायटी एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. प्रत्येक घर एकत्र कुटुंब आहे. आजी, आजोबा, मुले, सुना, नातवंडे यांनी घरे गजबजली आहेत. सणासुदीला कॉलनीत खूप मजा येते. प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीपूजनाला, संक्रातीच्या दिवशी, चित्रगौरी, गणपतीत हळदीकुंकू असते. तीस-पस्तीस बायका मुले एकमेकांच्या घरी येतात. खरी मजा तर भोंडल्याच्या दिवशी. त्यादिवशी तर सत्तर-ऐंशी जण खिरापतीला असतात. महत्वाचे म्हणजे सोसायटीतील सर्व माहेरवाशीणी मुली आपल्या मुलांबाळांना घेऊन भोंडल्याला येतात. रात्री जेवणाचा आनंद घेतात. मग बालपणीच्या आठवणी निघतात व मुली सुखावून जातात.

आमच्या समोरच्या बंगल्यात भुर्के काका व काकू राहतात. काकू जवळपास पंच्याऐंशीच्या घरात. माझ्या आई एवढ्या, अजूनही सर्व कामे स्वतः करतात. बागेवर त्यांचे भारी प्रेम. खूप झाडे लावली आहेत. त्यांची निगापण छान राखतात, आंब्याच्या दिवसात कैऱ्या, आंबे, पपई, लिंबे आणून देतात. खूप प्रेम करतात .नवे काही बनविले तरी लगेच वाटीत गरमगरम घेऊन येतात. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिले फराळाचे ताट त्यांच्याकडून येते. काकूंच्या बागेत कुंपणाला लागूनच मोठे तगरीचे झाड आहे. देवाचे झाड जणू! बाराही महिने डवरलेले असते. पहाटे उठून पाहावे तर चांदण्या अलगद उतरल्या आहेत असेच वाटते. कॉलनीतील सर्वांचेच ते हक्काचे झाड आहे. सगळेजण रोज त्या तगरीची टपोरी फुले देवासाठी घेऊन जातात. एखाद्यावेळी फुले काढली नाहीत तर काकू लगेच विचारतात "वहिनी, आज फुले नाही नेलीत?" तीच गोष्ट त्यांच्या प्राजक्ताची. पावसाळ्यात फांदी हलविली की फुलांचा सडा पडतो. फुलांचा मंद दरवळ पसरतो. हे झाडपण सर्वांच्या देवासाठीच हक्काचे. माझ्या घराभोवती अंगणात फरशी आहे. थोडी फुलझाडे मी कुंडीत लावली आहेत. पण भुर्के काकुंची बाग माझीच असल्याप्रमाणे मी हक्काने कर्दळीचे खुंट, विड्याची पाने, कडीपत्ता काकूंच्या बागेतून घेते.

माझे पती डॉक्‍टर आहेत. कोणीही हाक द्यावी आणि त्यांनी धावत जावे. त्यामुळे तोच संस्कार आमच्यावर. आम्हीही कोणत्याही वेळी आसपासच्यांच्या हाकेला धावून जातो. सगळ्याच कॉलनीमध्ये डॉक्‍टरांचा आधार वाटतो. मला वाटते, आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील भोवतालच्या वातावरणाचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो. खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात, चांगल्या संस्कारात माझी मुलगी मालविका मोठी झाली. म्हणूनच आज ती समाजात, संसारात यशस्वी वाटचाल करीत आहे. माहेरची-सासरची सर्व मंडळी तिने जपली आहेत. ती एक जवाबदार, भावनाशील, संवेदनशील, सजग व्यक्ती बनली आहे. याचाच मला नक्कीच आनंद व अभिमान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com