अजब सासऱ्यांची जगावेगळी गोष्ट! (मुक्‍तपीठ)

surekha-jog
surekha-jog

माझे सासरे (कै.) प्र. बा. जोग हे आगळेच व्यक्तिमत्त्व होते. अतिशय कडक, पण तितकेच आतून मऊ. शिस्तप्रिय, स्वाभिमानी, बिनधास्त. त्या काळात शनिवारवाडा गाजवणारे मुलखावेगळा माणूस म्हणून ओळखले जाणारे माजी उपमहापौर प्र. बा. जोग पुण्यामधील नामांकित वकील होते. त्यांच्या घराच्या दारासमोरच्या लिहिलेल्या पुणेरी पाट्या व त्यांची उत्स्फूर्त भाषणे खूप गाजत होती. त्या वेळी मी नुकतीच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून जोगांच्या घरी सून म्हणून आले, ते दादांमुळेच. साधारण पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ. माझे नियोजित पती पी. जोग क्‍लासेसचे संचालक डॉ. सुहास जोग यांच्याशी माझी नीट ओळख नव्हती. मी सून म्हणून घरी यावी यासाठी दादांनी इतके मोठे पाऊल उचलले. मला सुहासनी पसंत करावे, यासाठी दादांनी माझ्या नावाने एक भावनेने ओथंबलेले प्रेमपत्र डॉ. सुहास यांना लिहिले. या प्रेमपत्राने ते अतिशय भारावून गेले. लगेच त्यांनी मला होकार दिला. या प्रकाराची मला यत्किंचितही कल्पना नव्हती.  दादांना वाटले, की लग्न झाले म्हणजे आता प्रेमपत्राचा विषय काही निघायचा नाही. 

लग्न होऊन फार तर महिना झाला असेल. आमची मोठी फॅमिली एकत्र गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात सुहासनी विषय काढला. लाडात येऊन म्हणाले, ‘‘तू लिहिलेल्या प्रेमपत्रामुळे मी तुझ्या प्रेमातच पडलो बरं का?’’ मला खरे तर कळलेच नाही पहिल्यांदा; पण दादांनी केलेल्या खुणेवर मी मान डोलावली. माझे निर्णय घेण्याचे धाडस माझ्यात नव्हते. त्या वेळी माझ्या आईचे शब्द आठवले. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली, तरी सत्याची बाजू सोडायची नाही. दुर्दैवाने माझी आई लहानपणीच गेली होती. एकीकडे सुहासना फसवायचे नव्हते. त्यांच्याशी खोटं बोलायचे नव्हते. दुसरीकडे दादांना अजिबात दुखवायचे नव्हते. माझ्यासमोर धर्मसंकट उभे राहिले. शेवटी मी स्पष्टपणे सांगण्याचे धाडस केलं, ‘ते प्रेमपत्र मी लिहिलेले नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे.’ मी मनात म्हटले, ‘‘दादा, मला माफ करा.’’ त्यांनी माझ्या मनातील भाषा ओळखली. ते म्हणाले, ‘‘तुझे मला कौतुक वाटते. माझ्या परीक्षेत तू पास झालीस. खरे बोलणारी, स्पष्ट वागणारीच सून मला हवी होती.’’ 

आता अतिशय हुषार असणाऱ्या सुहासजींसमोर माझी क्षमता सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. त्यांना जिंकण्यासाठी पुन्हा एका परीक्षेत पास व्हावे लागले. आयुष्यात अनेक चढउतार आले, त्यातून मला चांगल्या गोष्टी शिकता आल्या. आम्हा तिन्ही सुनांवर दादांचे तितकेच प्रेम होते. प्रत्येकांच्या आवडीनिवडीवर लक्ष असायचे. त्यांच्याकडे एक लॅंडमास्तर मोटार होती. त्यांनी ती विकली. त्यांचे त्यांना दहा हजार रुपये मिळाले. ती रक्कम त्यांनी आपल्या मुलांना, सुनांना, अगदी घरचे काम करणारे ताई-मावशी-काकू यांनासुद्धा वाटून टाकली. स्वतःकडे एकही पैसा न ठेवता सर्वांना वाटण्यातच त्यांना आनंद असायचा. इतके ते मोठ्या मनाचे होते. त्यांना फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या ‘वैशाली’चा डोसा व दहीवडा खूप आवडायचा. कधी लहर आली की आम्हा सर्वांना घेऊन, क्‍लासमधील क्‍लार्क, वॉचमन अशा भली मोठी पन्नास लोकांच्या फौजेसह ‘वैशाली’मध्ये दादा जायचे; मग खुल्लम खुल्ला गप्पा. सर्वांबरोबर मनसोक्त आनंद लुटायचा. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आजही दिसतो आहे. माझ्या सासूबाईंच्या आयुष्यात अनेक गमतीजमती घडल्या. एकदा काय झाले, दादा काही कामासाठी कॅम्पमध्ये जाणार होते. तेव्हा आईना हवे होते त्यांच्या साडीवरचे मॅचिंग ब्लाऊज पीस. कामाच्या गडबडीत दादांनी मॅचिंगसाठी साडी नेली नव्हती. त्यामुळे दादांना कोणत्या रंगाचे ब्लाऊजपीस घ्यायचे हे ठरविता येईना. त्यांनी काय करावे? अख्खे दुकानच घरी आणले. ब्लाऊज पीसचे तागेच्या तागे. एवढ्या ब्लाऊज पीसचे करायचे काय? सर्वांना वाटूनसुद्धा ते ब्लाऊज पीस एवढे उरले की,... त्यानंतर आईनी त्यांना ब्लाऊज पीस कधी आणायला सांगितले नाही. घरामध्ये दादांचाच हुकूम चालायचा. घरामध्ये पहिली नात झाली त्यांनी तिचे नाव ‘किमया’ ठेवले. दुसरा नातू झाला त्याचे नाव ‘अजब’ ठेवले. तिसरा नातू झाला त्याचे नाव ‘चमत्कार’ ठेवले. माझे मिस्टर म्हणाले, ही काय अशी नावे असतात का? त्यावर दादा म्हणाले, तुम्ही काय नावे ठेवायची ती ठेवा. मी त्यांना याच नावानी हाक मारणार. ‘किमयाचा अजब चमत्कार’ या नावाचे वाक्‍य आयुष्यामध्ये घडले खरे. 

ज्या प्रेमपत्रामुळे माझ्या आयुष्यात गोंधळ झाला, ते पत्र घरच्या लोकांनी वाचले होते. ते पत्र मी अजून वाचलेच नाही. कारण ते मला सापडतच नाही. आज माझे पती डॉ. सुहास व सासरे दादा नसले तरी त्यांच्या गोड आठवणी घेऊन मी जगत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com