सर केले तीन गड

सर केले तीन गड

सिंहगडावरून उतरून जायचे. वेल्ह्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या पदरावर राजगड व तोरणा आहेत. हे गडत्रिकुट बारा तासांच्या आत सर करता येईल? एका मावळ्याच्या मनात विचार आला आणि त्याने तसे केलेही!

सह्याद्रीच्या प्रेमात पडलेले भगवान चवळे यांनी लिंगाणा, तेलबैला, वानरलिंगी, नागफणी अशा अनेक कठीण मोहिमा पार केल्या आहेत. सिंहगड, राजगड व तोरणा हे तीन गड एका दिवसात सर करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि नुकताच त्यांनी तो पारही पाडला. त्यांच्या मनात खूप दिवसांपासून इच्छा होती, की हे गडत्रिकुट एका दिवसात करायचेच.

हा ट्रेक म्हणजे अस्सल ट्रेकरचा घाम काढणारा आहे. या ट्रेकला पंधरा-सोळा तास लागतात, असे इतर ट्रेकर्सकडून ऐकले होते. त्यानुसार चवळे यांनी एक आराखडा तयार केला. खरे तर पावसाळ्यात हा ट्रेक फार कोणी करत नाही. कारण वाट बऱ्याच ठिकाणी निसरडी असते. पण मागचे दोन आठवडे पाऊस जरा कमी असल्यामुळे चवळे यांच्या मनात सारखेच त्या मोहिमेविषयी विचार चक्र चालू होते. ही मोहीम बारा तासांत पूर्ण करणे शक्‍य होईल का, यादृष्टीने त्यांचा विचार सुरू होता. पण पावसाळ्यामुळे विंझरवरून गुंजवणेला नदी पार करता येणार नाही, अशी माहिती मिळाली होती. म्हणून या वेळी फक्त एकट्याने रेकी करून यायचे असे त्यांनी ठरवले. पहाटे सव्वाचारला निघायचे ठरवले आणि ठरल्यावेळी सिंहगडच्या दिशेने निघालाही. सकाळी पाच वाजता सिंहगड पायथ्यावरून निघाले. बूट ओले असल्यामुळे कॅनव्हास शूज घातले होते. पण ते घसरत होते. म्हणून मित्राने त्याचे बूट दिले. मित्रांची सतत साथ मिळत असतेच. गड चढून तानाजी मालुसरेंचे दर्शन घेतले. त्या सिंहाचे दर्शन होताच चवळे यांच्या अंगात जणू शंभर घोड्यांचे बळ आल्यासारखे झाले. आणि निश्‍चय झाला, मोहीम पूर्ण करायचीच.

अजून अंधारच होता. पाय झपाझप पडू लागले होते. कल्याण दरवाज्याच्या उजव्या बाजूने ते गड उतरू लागले. आता तांबडे फुटायला लागले होते. सर्वत्र धुके पसरले होते. वाट काही माहिती नव्हती. आणि वाट चुकली नसती तर तो ट्रेक कसला...! सरळ धारेने जाण्याऐवजी ते उजवीकडे कोळीवाडीत उतरले. आपण चुकल्याचे लक्षात येताच वस्तीजवळ जाऊन त्यांनी आवाज दिला, तसा एक तरुण डोळे चोळीतच बाहेर आला. त्या तरुणाने रस्ता सांगितला. उलट्या वाटेने पुन्हा चढून वर जायला सांगितले, यात अर्धा तास वाया गेला. ते पुन्हा वर चढून आले आणि धारेने झपझप निघाले.

वाटेत मध्ये-मध्ये मोर आवाज देऊन स्वागत करत होते. घोड्यावर बसून जणू काही दौडतच चालले होते. समोर येणारे प्रत्येक टेकाड पार करत चवळे पुढे जात होते. काही ठिकाणी छातीपर्यंत गवत वाढलेले होते. तर काही ठिकाणी वाट निसरडी व खूपच अरुंद होती. आता उजाडले होते. खाली गाव दिसत होते. विंजरवाडीत ते पोचले तेव्हा सकाळचे आठ वाजले होते. विंजर ते गुंजवणे दरम्यान नदी पावसाळ्यात पार करता येत नाही. त्यामुळे त्यांनी साखरमार्गे दहा किलोमीटरचा रस्ता धरला. हा प्रवास फारच कंटाळवाणा होता. गुंजवण्याला पोचेपर्यंत दहा वाजले. डांबरी सडकेवरून चालून नको नको झाले होते. गड चढताना उन्हाचा चटका बसत होता. पण दीड तासात राजगडावर पोचले. पद्मावती देवीचे दर्शन घेऊन पोटपूजा केली. थोडा आराम करून संजीवनी माचीवरून तोरणा गडाकडे उतरण्यास सुरवात केली. दुपारी सव्वा वाजता चवळे भुतोंडे खंडीत उतरले होते.

वातावरण फारच आल्हाददायक होते. हवा मस्त सुटलेली होती. वाटेत काही ठिकाणी कारवी वाढलेली होती. पहिल्यांदाच पावसाची भेट झाली. थकल्या, घामेजल्या देहाला पावसाची एक मस्त सर चिंब भिजवून गेली. थकवा निमाला. आता संपूर्ण धार चढून तोरणा गडाच्या पायथ्याला पोचले. लोखंडी शिडीमुळे चढणे सोपे झाले. तोरणा गडावर चवळे पोचले तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. खोकड टाके ओलांडून बालेकिल्ला आणि तेथील मेंगाई देवीच्या मंदिरापर्यंत पोचायला अजून अर्धा तास लागणार होता. खालून वर तरंगत येणाऱ्या धुक्‍यामुळे निसर्गाचे अप्रतिम रूप दृष्टीस पडत होते. मंदिराच्या बाहेरूनच देवीचे दर्शन घेऊन चवळे यांनी गड उतरण्यास सुरवात केली. वाट चांगलीच निसरडी झालेली होती. जपून उतरावे लागत होते. बरोबर साडेचारच्या सुमारास ते वेल्हा गावात पोचले. तब्बल अकरा तास व पंचवीस मिनिटे चवळे त्यांच्या वेगाने चाल करत होते. राजगडावर घेतलेली थोडी विश्रांती सोडली तर ते चालतच होते. सिंहगड उतरताना चुकलेल्या रस्त्यासाठीचा अर्धा तास सोडला, तर त्यांनी अकरा तासांतच गडत्रिकुटाची मोहीम पूर्ण केली होती. सह्याद्रीतील अवघड असा ट्रेक वेळेत पूर्ण केला असे म्हणता येईल. ते एकटे निघाले खरे, पण त्यांना संपूर्ण ट्रेकमध्ये एकटेपणाचा लवलेशही जाणवला नाही, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com