ड्रिल... मनातलं

swati deshpande write article in muktapeeth
swati deshpande write article in muktapeeth

ड्रिल.. शाळेत असताना कधीतरी केलेले असते. सैनिकी जीवनाचा तो अविभाज्य भाग असतो. पण, खरे तर आपल्या नेहमीच्या आयुष्यातही ड्रिल उपयोगी पडते.

पी डबल ओ, पी डबल ओ एन एऽऽ वी आर द गर्ल्स ऑफ एमईएस... बेटर एव्हरी डेऽऽऽ अशी आरोळी ठोकत नेहरू स्टेडियमवरून निघालेला आमचा चमू शाळेच्या आवारात शिरला अन्‌ आम्हा सर्व जणींच्या आनंदाला एकच उधाण आले... त्या जल्लोषमय वातावरणात कुणी हातातले स्कार्फ हवेत फेकत होते, कुणी उड्या मारत होते, तर कुणी नाचत होते... प्रसंगच तसा होता. आंतरशालेय कॅलेस्थेनिक्‍स स्पर्धेत आमच्या संघाला विजेतेपद मिळाले होते. खरे तर विजयी होण्याची खात्री आम्हाला आधीपासूनच होती. आमच्या मालती गोखलेबाईंनी प्रचंड मेहनत घेऊन आमच्या संघाची तयारी करून घेतली होती. परंतु, ऐन स्पर्धेच्या वेळी अचानक असे काही तरी घडले, की आपला "नंबर' जाणार की काय, अशी आमची अवस्था झाली होती. अन्‌ त्याला कारणीभूत होते अस्मादिक.

झाले असे, की संगीताच्या तालावर आमचे व्यायामप्रकार ठरल्याप्रमाणे विविध रचनांद्वारे सुयोग्य पद्धतीने चालू होते. एका रचना प्रकारात माझी जागा अगदी परीक्षकांच्या थेट समोर होती अन्‌ नेमका त्याच वेळी माझ्या एका पायातला बूट निघून बाजूला पडला. आता आपल्या संघाचे गुण कमी होणार, तेही आपल्यामुळे ही भीती मनात घर करत असतानाच एकीकडे शरीर ठरल्याप्रमाणे व्यायामप्रकार पार पाडत राहिले. परंतु आमचा "परफॉर्मन्स' संपल्यावर मात्र माझा चेहरा पार रडवेला झाला. काही वेळांतच निर्णय जाहीर झाला... अन्‌ अहो आश्‍चर्यम्‌... आमच्या संघाचा "नंबर' हुकला तर नव्हताच, उलट आम्ही विजेतेपद मिळवले होते. प्रसंगावधान राखून न गडबडता व्यायामप्रकार चालू ठेवल्याबद्दल सहभागी मुलींनी मला चक्क डोक्‍यावर घेतले. कॅलेस्थेनिक्‍स स्पर्धांचा हा अनुभव आठवला की आजही अंगावर सुखद शहारा येतो. ज्याला मी आज "कॅलेस्थेनिक्‍स' म्हणते आहे त्याला आम्ही तेव्हा "ड्रिल'च्या स्पर्धा, असे म्हणत असू. अशा रीतीने "ड्रिल' हा शब्द पहिल्यांदा आयुष्यात आला होता वयाच्या दहाव्या वर्षी!

पुढे हवाई दल अधिकाऱ्याशी विवाह झाल्यानंतर "ड्रिल' हा शब्द सतत कानावर पडत राहिला. हवाई दलातले आयुष्य हे तसे सततच्या बदलीचे, तरीही प्रचंड रोमहर्षक. परंतु एकटीने बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडण्याची कसरत आम्हा बायकांना करावी लागत असे. एकीकडे वडिलांचे विमान टेकऑफ झाले, की घरी मुलांनी काही ना काही उपद्‌व्याप करावेत किंवा आजारपण काढावे हे तर नेहमीचेच असे. कधी कानात मणीबिणी घालून आईच्या नाकात दम आणतील, तर कधी तापाने फणफणून आईच्या तोंडचे पाणी पळवतील. लहान मुलेच ती. तर, मुद्दा आहे ड्रिलचा. ड्रिल ह्या शब्दाचा एक अर्थ म्हणजे विविध सूचना संचाची उजळणी. एकटीने अवघड प्रसंगांना तोंड देताना ऐनवेळी काय समोर येऊन उभे ठाकेल, हे सांगणे कठीण असे. पण, मग हळूहळू लक्षात येऊ लागले, की एखाद्या विशिष्ट परिस्थितीत काय काय करावे याचे ड्रिल मनात तयार असेल, तर काम सुलभ होऊन जाते. शेजारी-पाजारी असायचे, वरिष्ठ अधिकारी असायचे. एका हाकेसरशी दहा कुटुंबे मदतीला उभी राहतील, याची खात्री असायची. तरीही होता होईतो आपण स्वतः गडबडून न जाता प्रसंगाला तोंड द्यायचे याचे नकळत शिक्षणही मिळत असे.

अन्‌ मग मनातले ड्रिल आकार घेऊ लागले. वेळप्रसंगी कुणाला फोन करावा लागला, तर ते क्रमांक कुठे लिहून ठेवायचे, यापेक्षा प्रथम कुणाशी संपर्क साधावा, हे मनातल्या मनात घोकून ठेवले जायचे. त्यातून सततच्या बदल्यांमुळे नावांची यादीसुद्धा बदलावी लागायची. आमची घरे सहसा जंगलात, निसर्गाच्या सान्निध्यात असत. त्यामुळे साप-किरडू, कोल्हे-हत्ती यांच्याशी जवळीक आलीच. अशा कुठल्या कारणामुळे घरातून चटकन्‌ बाहेर पडावे लागले, तर काय-काय करायचे, हेही नकळत मनात आकार घेत राहायचे. हे बघून-बघून मुलांचीही मनोधारणा बहुधा तयार होत असावी.
"मनातले ड्रिल' आता इतके सवयीचे झाले आहे, की पतीच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यातही आम्हाला त्याचा फायदा होतो आहे. सैनिकी सेवेत कार्यरत असताना आम्हाला जे सरकारी घर मिळायचे ते सहसा तळमजला व वरचा मजला, अशा धाटणीचे असत किंवा ऐसपैस बंगले असत. त्यामुळे बहुमजली इमारतीत राहण्याचा फारसा अनुभव नव्हता. परंतु, आता दिल्लीत निवासी क्षेत्रात बहुमजली इमारतीत आहोत. या भागात भूकंपाचे झटके बसणे हे काही फारसे नवीन नाही. गेल्या चार वर्षांत जवळ जवळ सात ते आठ हादरे इथल्या मंडळींनी पचवले आहेत. नेपाळ असो वा अफगाणिस्तान ... तेथील हादरे दिल्लीपर्यंत पोचतातच. मग अशा वेळीही मनातले ड्रिल कामी येते. त्यात परिस्थितीनुसार काही नव्या सूचनांची भर घालावी लागते इतकेच. त्यामुळे आता भूकंपाचे झटके बसत आहेत असे जाणवले, की प्रथम घरातल्या एखाद्या स्थिर पंख्याला निरखायचे, तो हलतोय असे दिसले, तर "झटका' आहे, हे निश्‍चित होतेच. मग भराभरा महत्त्वाच्या कागदपत्रांची थैली, क्रेडिट कार्ड वगैरे भरून ठेवलेली बॅग, मोबाईल फोन वगैरे घेऊन कुलूप लावून घराबाहेर पडायचे. डोके शांत ठेवून, लिफ्टमधून न जाता, पायऱ्या उतरून तळमजल्यावर जायचे हे सगळे जणू प्रतिक्षिप्त क्रियेसारखे घडत राहते. फोनमधल्या विविध "ऍप्स'मुळे भूकंपाची तीव्रता जाणून घेता येते. कुटुंबीयांशी संपर्क साधला जातो. बरेचदा हे "झटके' मी घरात एकटी असतानाच अनुभवास आले आहेत. त्यामुळे मनाने पक्का निष्कर्ष काढला आहे, आयुष्यात अनुभव कसे येतात, ते आपल्या हातात नसते, पण आपल्या मनातले ड्रिल मात्र तयार हवे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com