गोष्ट तिची प्रत्येकीची! 

Tanmaya panchpor Writes about sexaul haarshment
Tanmaya panchpor Writes about sexaul haarshment

अगं रश्‍मी, आजसुद्धा बोलणार नाहीस का तू? दुसऱ्यांदा भेटतोय आपण. पहिल्या वेळेस मला वाटलं अजिबातच ओळख नाही म्हणून बोलत नसशील. पण अगं, न सांगता मनातलं ओळखता यावं तेही बायकांच्या असं कुठलंही शास्त्र अजून विकसित झालेलं नाहीये. सांग बरं काय झालंय नक्की.' रश्‍मीच्या डोळ्यांतली तेवढ्यापुरती आलेली चमक नाहीशी झाली. डॉ. राधाने पुन्हा एकदा सुरुवातीपासून बोलायला सुरुवात केली. "रश्‍मी, मागच्या सेशनच्या वेळेस राजेश होता. आज तोही नाहीये. कसलं एवढं टेन्शन आहे तुला?' नंतर जवळपास पंधरा-वीस मिनिटे राधा रश्‍मीला बोलतं करायचा प्रयत्न करत होती. पण सगळं व्यर्थ. शेवटी दुसरा सेशनही लवकरच संपवून राधाने तिला जायला सांगितलं. त्या दिवशी जास्त पेशंट्‌स नव्हते त्यामुळे राधाकडे तसा बराच वेळ होता. तिने लगेचच रश्‍मीच्या केसवर विचार करायला सुरुवात केली. पहिल्या वेळेस जेव्हा राजेश आणि रश्‍मी आलेले तेव्हा राजेशने प्रॉब्लेम सांगितला होता,""जवळ आलो की रश्‍मीला घाम फुटतो आणि ती प्रचंड बिथरून जाते. लग्नाला चार महिने होऊन गेले पण अजूनही तिची अवस्था अशीच आहे. We have not yet consummated our marriage. गायनॅकोलोजीस्टकडेसुद्धा जाऊन तिच्या सगळ्या तपासण्यादेखील करून घेतल्या आहेत. शारीरिकदृष्ट्या रश्‍मी अत्यंत सुदृढ आहे. तरी पण हे असं का होत असावं काही कळत नाही.''हे सगळं आठवल्यावर राधाला एकूण परिस्थितीचा जरा अंदाज आला. पुढच्या सेशनला आता डायरेक्‍टच काय ते विचारू असं म्हणत राधाने रश्‍मीची फाईल बंद केली. 

पुढचा आठवडा आला आणि ठरलेल्या वेळेस राजेश-रश्‍मी दवाखान्यात हजर झाले. राजेशची विचारपूस करून राधाने त्याला जायला सांगितलं. आता कन्सल्टिंग रूममध्ये त्या दोघीच होत्या. रश्‍मीकडे बघत राधा म्हणाली,""आज मी तुला एक गोष्ट सांगते. मी सहावीत होते. बाबांची फिरतीची नोकरी होती. दर दोन वर्षांनी आम्हांला एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला लागायचं. अर्थातच एका ठिकाणी ओळख होऊन मैत्री होईपर्यंत आम्हाला ते ठिकाण सोडावं लागायचं. मी सहावीत असताना आम्ही इथे आलो. शाळा नवीन, क्‍लास नवीन. सुदैवाने सगळं घराशेजारी होतं. पहिले दोन-तीन दिवस आई आली सोडायला. मग मला माहित झाल्यावर मी एकटी जायला लागले. क्‍लासच्या समोर एक छोटी गल्ली होती. अंधार झालं की भीती वाटायची तिथून येताना. त्या गल्लीचं तोंड म्हणजे काही लोकांनी मुतारीच करून ठेवलेली. एकेदिवशी क्‍लास संपवून मी घरी येत होते. एकटीच होते. एक माणूस तिथे उभा होता. त्याने त्याचं काम आटपलं आणि प्यांटची चेन बंद न करता माझ्या दिशेने यायला लागला. सुरुवातीला मला समजलंच नाही नक्की काय होतंय ते. पण जेव्हा कळल तेव्हा उलट पावली पळत मी क्‍लासमध्ये गेले. बरंच वेळ तिथे बसून राहिले. नेहमीची वेळ झाली तरी मी घरी पोहोचले नाही म्हणल्यावर बाबा क्‍लासमध्ये आले. त्यांना बघून मला रडायलाच आलं...''राधा बोलता बोलता थांबली. रश्‍मीच्या डोळ्यांतून पाणी येत होतं. हुंदके देत देत रश्‍मी बोलायला लागली. राधाचा अंदाज खरा होता. रश्‍मी ''सेक्‍शुअल अब्युझ''ची शिकार झालेली होती. तिच्या मनातलं ती कुठे बोलूच शकली नव्हती. या सगळ्याची सुरुवात झालेली ती सात वर्षाची असताना. तिच्या रिक्षेवाल्या काकांकडून. तेव्हा जे ती बिथरली ते कायमचीच. मग नंतर बसमधून जाताना छुपे स्पर्श झाले. ट्रेनमधून जाताना, तिचे आई-बाबा सोबत असताना त्यांचं लक्ष नाही हे बघून तिला नको तिथे दाबलं गेलं. आणि त्यामुळं तिला पुरुषस्पर्शाची शिसारी येऊ लागली. हे सगळं ऐकताना राधाला तिच्या अनेक पेशंट्‌सचे चेहरे आठवले. त्यांच्या कहाण्या आठवल्या. रश्‍मीच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत राधाने तिला शांत केलं. त्यांचा तिसरा सेशन संपला होता. 

त्या सेशननंतर एक आठवडा संपत आला, दुसऱ्या दिवशी राजेश-रश्‍मीची अपॉइन्ट्‌मेन्ट होती आणि राधाला राजेशचा फोन आला. तो सांगत होता. ""मागच्या सेशननंतर रश्‍मीमध्ये बराच बदल झाला आहे.''वीस मिनिटांच्या भेटीत ठरलेलं आणि महिन्यात झालेलं लग्न होतं त्यांचं. त्यामुळे दोघांनाही फारसं मोकळेपणाने बोलता आलं नव्हतं. तो म्हणाला,"काल पहिल्यांदा रश्‍मी माझ्याशी स्वतःहून बोलली. खूप वेळ नाही पण ठीक आहे, सुरुवात तरी छान आहे.'' राधाला बरं वाटलं. आपला पेशंट सुधारत आहे हे पाहिल्यावर ती खुश झाली. सेशनची वेळ झाली आणि रश्‍मी दवाखान्यात आली. आज फारशी प्रस्तावना न करता ती स्वतःच बोलायला लागली,""मॅडम, मागच्या वेळेस मी तुम्हाला जे सांगितलं त्यातल्या जवळपास सगळ्याच गोष्टी आई बाबांना माहित नाहीयेत त्यामुळं राजेशला माहीत असायचा प्रश्नच येत नाही. माझ्याबाबतीत हे असं घडतंय यात माझीच चूक आहे असंच मला कायम वाटत राहिलं त्यामुळे मी कधीच कोणाशीच हे बोलू शकले नाही. आणि त्या दाबाखाली माझी मानसिक स्थिती विचित्र होत गेली. माझं बदललेलं वागणं आईच्या लक्षात आलेलं पण तिने ते फार मनावर घेतलं नाही. एकदा मी सांगायचा प्रयत्न केला तर ती म्हणाली,"प्रत्येक बाईला यातून जावंच लागतं. तू उगाच बाऊ करतेस.'झालं. बोलणंच खुंटलं. मग यथावकाश माझं लग्न झालं. राजेश खूप चांगला मुलगा आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री मी comfortable नाही हे कळल्यावर तो खोलीत सोफ्यावर जाऊन झोपला. पण माझी घालमेल कधी कमी झालीच नाही. तो जवळ आला की त्याच्या चेहऱ्यात मला ते सगळे चेहरे दिसतात ज्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली आहे आणि त्यामुळं......'' रश्‍मीला आता रडणं आवरेना. ती शांत झाल्यावर राधाने तिला काही औषधं दिली. या विचारांतून बाहेर पडण्यासाठी काय काय करता येईल ते सांगितलं. आणि रश्‍मी तेवढ्यापुरती सावरली. 

पुढचा सेशन फक्त राजेश आणि राधामध्ये झाला. राधाने त्याला सगळी कल्पना दिली आणि धीर धरायला सांगितलं. कारण सध्या रश्‍मीला त्याच्या आधाराची खूप गरज होती. असेच अनेक सेशन्स होत गेले. रश्‍मी मात्र म्हणावी तशी प्रगती करत नव्हती. 

असंच अचानक एका सेशनच्या वेळेस राजेश रश्‍मी दोघही आले. राजेशच्या हातात डिवोर्स पेपर्स होते. त्या दोघांनी म्युचुअल कन्सेंटने डिवोर्स फाईल केला होता. जीवापाड प्रयत्न करूनही रश्‍मी त्या विचित्र मानसिकतेतून बाहेर पडू शकत नव्हती. आणि ती राजेशला पत्नी म्हणून सुखही देऊ शकत नव्हती. ही कोंडी फोडायचा एकच पर्याय तिला दिसत होता. तो म्हणजे डिवोर्स. तिने राजेशला तयार केलं. स्वतःमुळे राजेशला दुःख सहन करावं लागू नये या प्रामाणिक हेतूने तिने डिवोर्स पेपर्सवर सही केली. आता ती परत लग्न करणार नव्हती. मात्र राधाशी बोलल्यामुळे तिची अपराधीपणाची भावना कमी झाली होती. आता सेशन सुरु ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. राधाचा रश्‍मी आणि राजेशशी असणारा व्यावसायिक संबंध संपला होता. 

ती दोघं गेल्यावर राधा विचारात पडली. दिसताना जो त्रास क्षणिक दिसतो त्याचे किती दूरगामी परिणाम होत असतात. आणि रश्‍मी ही काही अशी तिची पहिलीच केस नव्हती. प्रत्येक केसमध्ये एक मुद्दा मात्र समान होता. आपल्या मुलाची/मुलीची बदलत जाणारी मनःस्थिती पालकांच्या लक्षात येऊनही त्यावर गांभीर्याने विचार झाला नव्हता."हे असंच असतं.म्हणून त्याकडे दुर्लक्ष झालं होतं. काही पेशंट्‌स सेशन्स, ट्रीटमेंट नंतर सावरले तर काही अजूनच कोशात गेले. असे अजून किती बळी जाणार असा विचार करत अत्यंत विमनस्क अवस्थेत तिने दवाखाना बंद केला. आणि ती घरी गेली. तिच्या दवाखान्यामधल्या ड्रोवरमध्ये आतल्या बाजूला मात्र एक जुना डिवोर्स पेपर तसाच निपचित पडून होता..'' 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com