मी, माझी कविता आणि बाळासाहेब

मी, माझी कविता आणि बाळासाहेब

बाळासाहेब ठाकरे यांचा नुकताच पाचवा स्मृतिदिन झाला. त्या निमित्ताने माझ्या त्यांच्याबद्दलच्या दोन आठवणी मला शेअर कराव्याशा वाटल्या. या आठवणी माझ्या शालेय काळातल्या म्हणजे १९७१-७२ मधल्या आहेत. आम्ही तेव्हा मालाडला गोविंदनगरच्या चाळीत राहत होतो. त्या चाळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाने साजरे व्हायचे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव जोरात असायचे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलांना वाव मिळायचा.  

मी आठवीत होते तेव्हा. नुकतीच कविता लिहायला लागले होते. त्या वाचून दाखवून मी दुसऱ्यांना जेरीसही आणत होते. त्यातच मी शाळेच्या सहलीतून रायगडला जाऊन आले होते. वीरश्रीयुक्त शिवाजी महाराजांवरची लांबच्या लांब कविता आल्या आल्या लिहून काढली होती. मराठीच्या बाईंनी तिचं कौतुक केलं होतं. ती कविता मी आमच्या शेजारच्या चाळीतल्या कर्णिककाकांना वाचून दाखवली

तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘दोन दिवसांनी आपल्याकडे शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे. बाळ ठाकरे प्रमुख पाहुणे आहेत. तिथे तू ही कविता वाच.’’

ठरल्याप्रमाणे मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. मुख्य सभेत मला कविता वाचायची होती. त्यानंतर तिथे डी. शांताराम यांचा ऑर्केस्ट्रा होता. त्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. माझे नाव पुकारले गेले. ‘अब आ रही है, गोविंदनगरकी महान कलाकारा म्माधुरी प्रांज्यपे’. निवेदकाने माझ्या नावाची फिल्मी घोषणा केली. मी स्टेजवर चढले. समोरची गर्दी बघून टेर की फाय झालेली. स्टेजवर कोण बसलंय वगैरे कशाला बघतेय?

कर्णिककाका तेवढे ओळखीचे वाटले. मी सुरू केलं, ‘हे शिवराया वंदन पाया...’ पण लोकांनी जेमतेम दोन ओळी तेवढ्या शांत ऐकून घेतल्या. नंतर जो काय गोंगाट सुरू झाला, की माझं मलाच समजत नव्हतं मी काय वाचतेय! वीररसाची कविता मी भयरस, विनोदरस, करुणरस अशा रसांच्या कॉकटेलमध्ये पुढे पुढे रेमटवत होते. स्टेजखालून माझ्या भावाने ‘उतर आता. बास झालं...’च्या खाणाखुणा सुरू केल्याने मी पार रडायच्या घाईला आले. आता रणांगण सोडून ‘भागो’चे संदेश मेंदू देऊ लागला आणि त्याच क्षणाला माझ्या खांद्याला कोणीतरी धरून मला किंचित बाजूला केलं. त्या व्यक्तीने माईकचा ताबा घेतला. ‘अरे *** शिवजयंतीला आलात ना? लाज नाही वाटत गोंधळ घालायला? खबरदार कोणी बोललात तर! या पोरीची कविता पूर्ण झाल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही!’ असा ढाण्या आवाजात दम दिला. त्याच पट्टीत मलाही ‘तू गं एऽऽ पोरी, शिवाजी महाराजांवरची कविता लिहिलीस. ती अशी मॅं मॅं करीत काय वाचतेस? वाच जोरात. दाखव पाणी मराठी भाषेचं!’ असं मलाही खडसावलं.

जादू झाल्यासारखी समोरची गर्दी चिडीचूप झाली. मी नवीन उत्साहात पहिल्यापासून कविता वाचली. मला स्टेजवरून त्या व्यक्तीकडून सगळ्यांत जास्त टाळ्या मिळाल्या. मी कविता संपवून खाली उतरणार त्या आधी मला त्यांनी जवळ बोलावलं, मला नाव विचारलं. स्वतःच्या शर्टला लावलेलं पेन मला दिलं आणि तेव्हा मला महत्त्व माहीत नसलेली आणखी एक गोष्ट मला दिली. त्यांचं व्हिजिटिंग कार्ड. येस्स. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ते कार्ड होतं... मी नंतर कधीही त्यांना भेटले नाही; पण ते कार्ड कंपासमध्ये जपून ठेवलं होतं. दुसऱ्यांदा ते ठाण्याच्या बेडेकर विद्यामंदिरातल्या आम्हा विद्यार्थ्यांसाठी गडकरी रंगायतनला व्यंगचित्रे कशी काढावीत, याचे मार्गदर्शन करायला आले होते. दिलेल्या वेळेआधीच ते हजर होते. फटाफट कुंचल्याचे फटकारे मारीत त्यांनी राजकीय व्यक्ती फलकावर रेखाटल्या होत्या. सहज संवाद साधत. कुठेही आपल्या मोठेपणाचा आव नव्हता. मी पाहिलेले बाळासाहेब असे होते. अशी माणसे विसरणे शक्‍यच नसते !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com