लोकगायकाची 'एक्‍झिट'

लोकगायकाची 'एक्‍झिट'

गरिबीचा आणि गाण्याचा वडिलोपार्जित वारसा घेऊन आलेल्या लोकगायकाचा पाटबंधारे खात्यात जीव रमला नाही. आपल्या पहाडी आणि गोड गळ्याने एकाहून एक सरस गाणी मराठी माणसाच्या मनात उतरविणारे लोकगायक संदीपन शिंदे यांना अखेरच्या श्‍वासापर्यंत शब्दांचाच ध्यास होता.

खरे तर संदीपन हे केवळ गायकच नव्हे, तर कवाली, रंगकर्मी, पेटीवादक, वग नाटककार, वक्ते आणि विनोदवीरही होते. कलाक्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. सोलापूरमध्ये पाटबंधारे खात्यात नोकरी करणाऱ्या या माणसाचे मन सरकारच्या टेबलखुर्चीत कधीच रमले नाही. शिंदे घराण्याने जोपासलेल्या कलेचीच ते आराधना करीत राहिले. नोकरीवर कमी आणि गायन- वादनाच्या फडातच ते शब्दाचे मळे फुलवीत राहिले, त्यामुळेच की काय त्यांचे प्रत्येक गाणे लोकांच्या पसंतीला उतरत असे. हातात पेन आणि कागद हे त्यांचे जीवन बनले. अखेरचा श्‍वास घेईपर्यंत ते पेनची मागणी करीत राहिले. लोककलेसाठी आयुष्य वेचलेल्या या कलंदर माणसाला तसा व्यवहार कधी कळला नाही. आपल्या मुलांचा कधी गांभीर्याने विचार केला नाही. भल्या भल्या माणसांशी मैत्रीचा घठ्ठ धागा विणलेला असतानाही स्वत:साठी त्यानी कधी शब्द टाकला नाही. शेकडो कार्यक्रम आणि प्रसिद्धीच्या झगमगाटात राहून "जो देगा उसका भी भला, न देगा उसकाही भला' हे तत्त्वज्ञान घेऊनच ते जगले.

आम्ही मूळचे इंदापूरजवळील कळाशीचे. अठराविश्वे दारिद्र असलेल्या कुटुंबात संदीपन यांच्यासह आम्हा भावंडांचा जन्म झाला. आम्ही चौघे आणि तीन भगिनी असे आमचे कुटुंब. अतिशय खडतर आयुष्य जगतच आम्ही भावंडानी उत्तम शिक्षण घेतले. आमचे आजोबा एकतारी भजन गात. पुढे त्यांचा हा वारसा वडील ज्ञानदेव शिंदे यांनीही चालविला. ते ही गाणी गात. माझे वडील बंधू सीताराम हे हार्मोनिअम, तर संदीपन हे तबला वाजवत. पुढे ते गाणेही शिकले आणि कायमचेच ते त्यांना चिकटले. माझी आई लक्ष्मीबाईने काबाडकष्ट करून आम्हाला शिकविले. दारिद्य्राच्या खाईत लोटलेल्या कुटुंबाला बाहेर काढावे, असे तिला नेहमी वाटत असे. पण संदीपनला गाणे इतके प्रिय होते की आई काय म्हणते हे त्यांच्या लक्षातच येत नसे. गरिबी आणि गाणं हाच वडिलोपार्जित वारसा घेऊन त्यांची जगण्याची धडपड सुरू होती.

गावात तमाशाचा तंबू पडला की त्याची तहानभूक हरपून जात असे, एके दिवशी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा तमाशा आला असता, संदीपन हे तंबूबाहेर बसून तास न्‌ तास वगनाट्य लिहिण्यात खर्ची करीत असे. अखेर त्यांची तपश्‍चर्या फळाला आली. त्यांनी वगनाट्य पूर्ण केले आणि लिहिलेले वगनाट्य थेट विठाबाईंच्या हातावर ठेवले. ते विठाबाईना इतके आवडले, की अनेक तमाशात संदीपन यांचे वगनाट्य चालले. गायन-वादनाचा छंद त्याने जोपासावा असे आम्हाला वाटत असे. यामध्ये करिअर होणार नाही. म्हणून त्याला अनेकदा परावृत्त करण्याचा प्रयत्नही माझे बंधू भीमराव यांनी करून पाहिला, पण काहीही उपयोग झाला नाही.

संदीपन यांच्या जडणघडणीत लोकशाहीर वामनदादा कर्डक आणि गायक प्रल्हाद शिंदे यांचा मोठा वाटा होता. या दोघानांही ते गुरुस्थानी मानत. त्यांनी राहुल शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विजय सरतापे, शकुंतला जाधव यांच्याबरोबर शेकडो मैफली रंगविल्या. नाटकांतही काम केले. अनेक पुरस्कार, गौरव चिन्हे, पदके, सन्मान पत्रे त्यांना मिळाली. जे समाजाने दिले ते उदार अंतःकरणाने ते समाजाच्याच झोळीत टाकत राहिले. विशेषत: अंध आणि अपंगाना होता होईल तितकी मदत करत राहिले. मात्र समाजाने दिलेल्या मानधनात कुटुंबाला कधी सहभागी करून घेतले नाही. "घागर नळाला लाव, पानी गळाया लागलं', "निळी करू दिल्ली", "पोरगं भीमाचं', "जयभीम कशाला म्हणता', "रामजीचा लाला झुंजार', "हान टोला, जय भीम बोला' आदीं त्यांची अनेक गाणी लोकमुखी रंगत राहिली.

लेखन आणि गायनाने केवळ मनोरंजन न करता सलग तीस - चाळीस वर्षे ते अंधश्रद्धा, जातीभेद, सामाजिक सलोख्यावर विचार मांडत राहिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी संदीपन आपल्या गाण्याच्या माध्यमातून प्रयत्न करीत राहिले.

दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने त्यांना विळखा घातला. सोलापूर ते पुणे हा प्रवास करीत ते त्या आजाराशी लढत राहिले. पण कर्करोगाचा ते सामना करू शकले नाहीत. इतका जीवघेणा आजार होऊनही त्यांचा हसतमुख चेहरा कधी कोमजलेला पाहिला नाही. आजार अधिकच बळावल्यानंतर शब्द मुखातून बाहेर पडत नसताना आम्हा भावंडाकडे ते पेन आणि कागदाची मागणी शेवटपर्यंत करीत होते. लेखणीचा ध्यास घेतच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com