पाऊस मनातला!

विद्या भुतकर
मंगळवार, 20 जून 2017

तिला आईशी झालेले बोलणे आठवले. ""गाडी घीन्यापरीस तुजं गळ्यातलं तरी सोडवायचं हुतं. नसते थेर ते.'' पण तिला आज गहाण पडलेल्या मण्यापेक्षा मोठे काहीतरी मिळाले होते. ती त्याच्याकडे कौतुकाने पाहात होती आणि मनात पाऊस.

तिला आईशी झालेले बोलणे आठवले. ""गाडी घीन्यापरीस तुजं गळ्यातलं तरी सोडवायचं हुतं. नसते थेर ते.'' पण तिला आज गहाण पडलेल्या मण्यापेक्षा मोठे काहीतरी मिळाले होते. ती त्याच्याकडे कौतुकाने पाहात होती आणि मनात पाऊस.

अजितची खूप इच्छा होती, की साधी का होईना, स्वतःची गाडी हवी. लोकांच्या भारी भारी गाड्या त्याने चालवलेल्या. गेल्या पंधरा दिवसांत त्याने एक जुनी गाडी बघून ठेवली होती. या वेळी हिंमत करून ती घेतलीच. घरचे नाराज होतेच. घराची डागडुजी करायचे सोडून गाडीत कशाला पैसा घालायचा, हे त्यांना कळत नव्हते; पण त्याच्या हट्टापुढे कोण बोलणार! काल गाडी घरी आली आणि आज त्याने सांगितले होतें, की मी गाडी घेऊन जाणार आहे फिरायला. आई म्हणाली, ""अरे, देवीला तरी जाऊन ये. पहिलीच गाडी हाय. हिला बी घेऊन जा.'' त्याचा नाईलाज झाला. देवीला जायचे तर नाही कसे म्हणणार!

अलका बाहेर आली, तोवर त्याची गाडी साफ करून झालेली. आतून-बाहेरून. त्याने आपल्या आवडत्या गाण्यांच्या सीडी आधीच घेऊन ठेवल्या होत्या. तिच्या हातातली भली मोठी पिशवी पाहून तो म्हणाला, "अवो महिनाभर चाल्लाय्सा का गावाला?' ती घाईघाईने गाडीत बसली आणि गाडीचे दार जरा जोरात ओढले. त्याचा रागाचा एक कटाक्ष तिच्यावर पडला. "जरा दमानं!' असे म्हणत त्याने गाडी बाहेर काढली. गाणे गुणगुणताना त्याचा मूड बदलला. आपली गाडी, आपले गाणे, आपला हवा तो रस्ता...? त्याच्या एकदम लक्षात आले, """देवीलाच कशाला जायला हवे?'' त्याने गाडी साताऱ्याच्या दिशेने वळवली. त्याच्या डोक्‍यात एक कल्पना आली होती. आता गाडीचा स्पीड वाढला आपोआप. अलकाची गाडीत बसायची पहिलीच वेळ असल्याने थोडी अवघडून बसली होती. हायवेला लागल्यावर मात्र अलकाने विचारले, ""का हो, नवीन रस्ता हाये का देवीला जायचा?''

""नायी. एक गंमत हाय. सांगतो तुला नंतर. पन आता चार-पाच तास लागतील. उगा घाई करू नका. आणि नीट पसरून बसा की. मालकीण बाई हाय तुमी गाडीच्या.'' तशी ती लाजली आणि थोडी विसावलीही. त्याने गाणी बदलली आणि एकदम मूडमध्ये येऊन सांगू लागला, ""हिकडं हायवेवरून आतल्या रस्त्याला गेलं, की एक भारी भुर्जीचं दुकान हाय. एकदा जाऊ आपन.'' तिने मान हलवली. कधी असे बाहेर पडायची वेळच आली नव्हती, त्यामुळे आपण स्वप्नात तर नाही ना, याची खात्री करून घेत होती. आपला नवरा गाडी चालवताना एक वेगळाच व्यक्ती बनतो हे ती अनुभवत होती. मध्ये मध्ये अजित बोलतच होता. ""आपण ना एकदा कोकनात जाऊया. आई बा ला पन घिऊन. एकदम भारी समुद्र हाय. बघतच बसावं वाटतं.'' तिने मान हलवली. ""पन रस्ता लई बिकट. एकदा असाच घाटातून जात होतो तर एकदम समोरून ट्रक आला. वाटलं आजची बारी शेवटचीच. तुझी आठवन झाली हुती.'' तिच्या काळजात एकदम धस्स झाले; पण आज छान वाटत होते, त्याचे अनुभव ऐकताना. त्यालाही सांगायला. आज पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या शेजारच्या सीटवर आपले माणूस बसले होते.
दोनेक तासांनी तिने मागच्या सीटवरून पिशवी पुढे घेतली. त्यातले दोन पेरू काढून त्याला तिखट मीठ लावून एकेक फोड त्याला खायला देऊ लागली. तोही पुढे बघत बघत खाऊ लागला.

"आपण ना एकदा बाह्येर फिरायला जाऊ. बाह्येर म्हंजे गुजरात, केरळ आसं.'' तिने पेरू खाता खाता मान हलवली. गाडी पुण्याकडे येऊ लागली तसे वातावरण ढगाळ झाले. रिमझिम पाऊस सुरू झाला तशी त्याने गाणीही बदलली. तीही गाडीच्या काचांवर पडणारे पावसाचे थेंब आणि बाहेर दिसणारी हिरवाई बघत राहिली.
गाडी थांबल्यावर अलकाला जाग आली. ते दोघेही गाडीतून बाहेर पडले. एका टपरीजवळ गाडी थांबली होती. त्याने दोन वडा-पाव आणि चहा सांगितले आणि टपरीच्या मागे टाकलेल्या बाकड्याकडे तिला घेऊन गेला. म्हणाला, ""बस आनी बघ फक्त.'' सह्याद्री दूरवर पसरला होता. दऱ्यात धुके साठले होते. लांब कुठेतरी उंच धबधबे दिसत होते. तिच्या अंगाला चिकटून जाणाऱ्या ढगांनी हात, चेहरा ओलसर झाले होते. तो चहा आणि वडा-पाव घेऊन आला. ""घे. भारी असतोय इथला चा आणि वडा पन. मी मागं एकदा आलो होतो असंच लोकास्नी घेऊन तवा थांबवली होती गाडी. त्या येळेलाच ठरीवलं, गाडी घेतली कधी तर तुला घेऊन नक्की यीन हितं. कसं वाटतंय?'' ती त्याच्या पूर्ण झालेल्या स्वप्नाकडे, त्याच्या खुललेल्या चेहऱ्याकडे आणि सह्याद्रीकडे बघत होती फक्त. पाऊस भरून आला होता मनात आणि डोळ्यांत.