सख्खे सोयरे

सख्खे सोयरे

आपल्या जवळच्या काही व्यक्ती विशिष्ट गोष्टींबाबत आग्रही असतात. आपल्याला त्याची सवय नसते, त्यामुळे आपल्याला त्रास झाल्यासारखे होते. पण नंतर उमगते, त्या व्यक्तीचेच योग्य होते. त्या आग्रहांमुळेच आयुष्य सुरळीत गेले.

आपले मागील आयुष्य तपासून बघण्याएवढे आज माझे वय नक्कीच आहे. मी माझ्या आई-वडिलांच्या छत्राखाली होते, त्यापेक्षा कितीतरी पटीने सासरच्या घरी सासर सान्निध्यात आहे. आपण जवळच्या लोकांना सहज "थॅंक्‍यू' म्हणत नाही. आभार पण मानत नाही; पण आजचा हा लेखन प्रपंच त्यांना "थॅंक्‍स' म्हणण्यासाठी. माझ्या सासूबाई व पती यांना ते श्रेय मी देईन.

घडण्याच्या वयात मी सासरी आले. चांगली-वाईट घडण झाली हे मला माहीत नाही; पण वैचारिक ताकद मात्र हळूहळू निर्माण झाली. सासूबाई उत्तम सुगरण, कलावान होत्या. स्वच्छतेच्या बाबतीत कळसच होता. माझा घरकामाशी काडीचा संबंध नव्हता; पण त्यांना विचारूनच सगळे करायचे, ही माझ्या आईची ताकीदच होती. त्या अतिशय उत्तम शिवणकाम, कशिदाकाम करीत. टाकावूतून टिकाऊ निर्माण करणे, हे मी त्यांच्याकडून शिकले. माझ्या मोठ्या मुलीच्या दर महिन्याच्या वाढदिवसाला त्या फ्रॉक बेतून देत. त्यावर भरतकाम करून तो त्या ठरलेल्या तारखेला शिवण्याचे बंधन होते. त्यांचा वचकच तसा होता. प्रत्येक गोष्ट उत्तमच व्हावी ही अपेक्षा असे. त्याचा पहिली काही वर्षे सवय होईपर्यंत त्रास झाला; पण ते करता आले याचे आता समाधान आहे. किंबहुना त्याचा आपल्या आयुष्यात फायदाच होतो, हे लक्षात आले. आपल्याला काही गोष्टींची सवय नसते, त्यामुळे आपल्याला त्रास झाल्यासारखे होते; पण नंतर उमगते, त्या व्यक्तीचेच योग्य होते. त्या आग्रहांमुळेच आयुष्य सुरळीत गेले.

मुलगा पाच दिवसांच्या शालेय सहलीला जाणार होता. विकत स्वेटर आणण्यापेक्षा त्यांनी स्वतः लोकर आणून मला घर सांभाळून आठ दिवसांत स्वेटर करायला लावला. मला या सर्व प्रकाराचा तेव्हा खूप त्रास व्हायचा; पण तोंडातून शब्द बाहेर काढण्याची सवय नव्हती. पुढे असे वाटू लागले, की आपले काही नुकसान तर नाही झाले. उलट वेळेवर सर्व गोष्टी झाल्या तर सोयच होते. नवे काही शिकता येते. नेहमीच्या कामात कंटाळा येईपर्यंत गुंतत नाही. कामे झटपट आवरण्याची सवय लागते. संसार सुटला तरी त्यांनी आपल्या तीनही मुलांना शिस्तीत ठेवले, शिकवले. जगात वागण्याचा वस्तुपाठ दिला. त्या वयाच्या बावीसाव्या वर्षी विभक्त झाल्या. काळ जुना. जग दोन्ही बाजूंनी बोलते; पण मुलांसाठी खंबीर राहिल्या. त्यासाठी त्यांचे कौतुक आणि आभारही.

त्यांचा मुलगा म्हणजे माझे पती यांच्या सान्निध्यात खूप गोष्टी कळल्या. माझ्या पतींचे एक म्हणणे असे की, अंथरूण पाहून पाय पसरा. घरात येणारा पैसा बघून खर्च करा. ते कंजूष नव्हते; पण खर्च आवश्‍यकच आहे का, याचा ते विचार करीत असत. हौसमौज करण्याबाबत ते अरसिक नव्हते; पण विनाकारण खर्चही त्यांना मान्य नव्हता. या त्यांच्या आग्रहामुळेच थोडीफार बचत झाली आणि सुमारे चाळीस वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या आजारपणात त्याचा फायदा आला. आपला आपण खर्च करू शकलो. कोणाकडूनही मदत न घेता. आधीच आजारपण, त्यात डोक्‍यावर कर्ज असे झाले असते तर त्याचा अधिक त्रास झाला असता; पण तसे घडले नाही. तेव्हा कळले की आपल्यापाशी गंगाजळी हवीच. ही सासूबाईनी नकळत त्याना दिलेली शिकवण होती. तीच त्यांनी आम्हाला दिली.

इतर नातेवाइकांकडून पण काही नक्कीच नवे उमजून घेता आले, नवे शिकायला मिळाले; पण आईच्या संस्कारांनी घडलेल्या माझ्या पतींनी मला खूप काही आयुष्य समजावून सांगितले. ज्याला गरज असेल, त्याला मदत करा. खरी गरज ओळखा, शिक्षणासाठी मदत करा. मुलांना मदत कराच, पण मुलींनाही मदत करा. आमच्या तिन्ही मुलांना शिक्षण-संस्कार चांगले मिळावेत याचा जरूर प्रयत्न केला. ते लेबर प्रॅक्‍टिशनर होते. त्यांनी एक पैचा कधी गैरव्यवहार केला नाही. कधी काळा पैसा जमवण्याचे मनातसुद्धा आणले नाही. त्यांचा हाच वसा त्यांची तिन्ही मुले चालवत आहेत. आपण केलेल्या मदतीचा उल्लेखसुद्धा कधी केला नाही. माझ्या मोठ्या आजारपणात कोणतीही मदत न घेता धीराने निभावून नेण्यास कायम मदत केली. त्यांना शिकण्याची आवड होती. मोठ्या वयात त्यांनी "टीच युवर सेल्फ सिरीज'वरून चिनी-जपानी-कानडी भाषांचे प्राथमिक ज्ञान प्राप्त केले. त्यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. मला पण जे संचित आहे ते त्यांच्याचमुळे. आपल्यावर कोणी अन्याय केला, आपला अपमान केला तरी समोरच्याला वाटेल ते न बोलता गप्प बसणे चांगले. आपल्या वागण्यात खोट नसली म्हणजे समोरच्याला कधी तरी ते पटतेच हा नियमच आहे, असे त्यांना वाटत असे. आयुष्याने आपल्याला काय दिले नाही, यापेक्षा काय दिले याचा विचार करावा.

बहुतेक हे मी त्या दोघां माय-लेकांकडून शिकले असे वाटते. हे उमगल्यामुळे मन शांत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com