दौंडचं दान

विजय मो. जोशी
बुधवार, 22 मार्च 2017

दौंड एका बाजूला पडल्याची भावना तेथील लोकांत खोलवर रुजली आहे. कोणतीही नवीन गोष्ट तिचे अप्रूप असेपर्यंत त्यांच्या वाट्याला येत नाही, अशी भावना झाली आहे. अपवाद सांस्कृतिक कार्यक्रमांचा....

 

दौंड एका बाजूला पडल्याची भावना तेथील लोकांत खोलवर रुजली आहे. कोणतीही नवीन गोष्ट तिचे अप्रूप असेपर्यंत त्यांच्या वाट्याला येत नाही, अशी भावना झाली आहे. अपवाद सांस्कृतिक कार्यक्रमांचा....

 

एका पंजाबी मित्राच्या घरी नवस होता, की घरात नवीन बाळ जन्माला आले तरी त्यासाठी नवीन काहीही वापरायचे नाही, आडजुने कपडे नसले, तर दुसऱ्यांकडून मागून आणावयाचे, ते घालावयाचे. नव्या कशाचेही स्वागत करायचे नाही, ते आडजुने झाले, की त्याचा वापर करावयाचा! असाच नवस दौंडविषयी कोणीतरी बोलले असले पाहिजे. नवीन काहीही वापरायचे नाही, खूप त्रासाने मिळविलेल्या गोष्टीचे स्वागत करण्यात असणारे मोठे समाधान येथील लोकांना ती वस्तू आडजुनी होईपर्यंत थांबावे लागल्याने घेता येतच नाही.

म्हणजे पाहा, की या शहराला एसटी स्टॅंडच नव्हते. एक पत्र्याची उंच शेड होती. ती माणसांना बसण्यासाठी होती, की बस उभी राहण्यासाठी होती, कुणास ठाऊक! भलेबुरे प्रयत्न करून एकदाचे स्टॅंड झाले, लोक आनंदले; पण नवस आडवा आला आणि इतका आधुनिक सर्व सोयींनी युक्त स्टॅंड आडजुने होण्याची वाट पाहात वर्ष-दीड वर्ष उद्‌घाटनाविना राहिले.

हे छोटे शहर रेल्वेमुळे दोन भागांत विभागले आहे. जुने गावठाण आणि रेल्वे वसाहत, त्यापलीकडे शहराचा होणारा विकसित भाग! या दोघांना जोडणारी एक रेल्वेची सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोरी, जिचा कित्येक वर्षे लोक रेल्वेचा "भुयारी मार्ग' म्हणून उपयोग करत होते. मग लोकांनी एकदा एक पॅसेंजर गाडी रेल्वेरुळावर आडवे पडून बंद पाडली आणि चिडलेल्या जनतेमुळे देशातील अत्यंत आधुनिक तंत्र वापरून एक भुयारी मार्ग तयार झाला. दौंड जंक्‍शन दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांचे प्रवेशद्वार असल्याने एक दिवसही वाहतूक बंद न ठेवता, शक्‍य तितक्‍या लवकर हा भुयारी मार्ग तयार झाला. लोक आनंदले. पुन्हा नवस आडवा आलाच! हा भुयारी मार्ग आडजुना होईपर्यंत बंद ठेवावाच लागला. शेवटी काही तरुणांनीच "नेताजी सुभाष भुयारी मार्ग' असे नामकरण करून वाहतुकीला खुलाही केला.

त्यानंतर दौंड-बारामती रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले. दोन नेत्यांच्या मैत्रीचे प्रतीक ठरणारा ब्रॉडगेज कसलीही अडचण न येता पूर्ण झाला. दौंडला दोन नवीन फलाट तयार झाले. बारामती-दौंड-पुणे शटलसाठी नवा रेकही आला. पुन्हा दोन्ही गोष्टी आडजुन्या होण्यासाठी मार्ग बंदच राहिला. काही काळाने त्या आडजुन्या मार्गाचे आणि शटलच्या रेकचे उद्‌घाटन त्या वेळच्या रेल्वेमंत्र्यांनी केले, तोपर्यंत शहरवासीय त्या फलाटाचा "वॉकिंग प्लाझा' म्हणून वापर करत होते.

दौंडात सांस्कृतिक कार्यक्रमांविषयी अशीच स्थिती आहे. अगदी सुरवातीच्या काळात नागरिकांना रेल्वे व पाटबंधारे विभाग येथील गणपती उत्सवानिमित्त पुणे-मुंबईच्या कलाकारांद्वारे करमणुकीचे आणि संगीताचे कार्यक्रम पाहायला मिळायचे. वृत्तपत्रामध्ये ज्या कलाकारांविषयी माहिती वाचनात येत असे, त्यातील बरेच कलाकार दौंडच्या विविध मंचांवर पाहायला मिळत असत! एक खरे की, त्यामुळे शहरात काही सांस्कृतिक घडामोडी घडत असत. काही काळ या उपक्रमात आमच्या कुटुंबाचा मोठा सहभाग असायचा. लीला वर्तक, नटवर्य फाटक, छोटा गंधर्व, राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे आमच्या बंगल्यातच उतरले होते. नंतरच्या काळात राज काझी, डॉ. रवींद्र साठे, बसवराज बिराजदार, विकास देशपांडे या तरुणांनी कार्यक्रमांची धुरा हाती घेतली आणि रचना ग्रुप उदयाला आला. दिवाळी पहाट, नवरात्र जागर व्याख्यानमाला याद्वारे गावात चांगले कलाकार येऊ लागले. शेवटी प्रकट मुलाखतीचा कार्यक्रमही होत असे. निळू फुले, नाना पाटेकर यांच्या मुलाखती गाजल्या होत्या.

एक मजेशीर तितकाच अंतर्मुख करणारा प्रसंग. त्या वर्षीचे विष्णुदास भावे सुवर्णपदक विठाबाई मांग या बोर्डावर नाचणाऱ्या कलावंतीणीला जाहीर झाले होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांचा दौंड मुक्कामी तमाशा होणार होता. कुटुंबातील सर्वांच्या इच्छेने विठाबाई मांग यांचा सत्कार करण्याचे ठरले. घरात देण्या-घेण्यासाठीच्या साड्या पुण्याहून आणलेल्या असतच. साडी-चोळी, अंबाड्यावर चांदीचे फूल द्यायचे ठरले. दौंडमध्ये गणेश हॉल म्हणून एक पत्र्याची शेड होती, त्यात हे सांस्कृतिक कार्यक्रम चालत. विठाबाईंचा कार्यक्रम ठरवणारे परिचयाचे होते. विठाबाईंचा घरगुती स्वरूपाचा सत्कार करण्याची इच्छा असल्याचे त्यांना सांगितले.

त्यांनी आत नेऊन विठाबाईंची ओळख करून दिली. आमचा बंगला गावात येणाऱ्या कलाकारांचे आश्रयस्थान असल्याचे त्यांनी सांगताच, उठून साडी ठीक करत, भला मोठा केसांचा आंबाडा बांधत "चला की, साहेब' म्हणत विठाबाई माझ्याबरोबर निघाल्याही. त्यांच्याशी घरच्यांच्या थोड्या गप्पा झाल्या. घरच्या महिलांनी खणा-नारळाने त्यांचा सत्कार केला. थोडा वेळ त्या शांत बसल्या होत्या, त्यांच्या मनात काही तरी विचार येत असावेत, असे वाटले. त्या जायला उठल्या. माझ्याकडे वळून म्हणाल्या, ""भाऊ, तुम्ही लई हुशार. आज माझा सत्कारही केलात आणि अमावस्येचे "दान'ही दिले.'' खरे तर ध्यानीमनी नसताना विठाबाईंचा पहिला सत्कार करण्याचे दान दौंडने मला दिले होते.