टू इन वन सून

विजया काळे
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

आताच्या काळात "सूनबाई' म्हणून कुणी हाक देत नसले, तरी सून ती सूनच. तिला सासुरवाशीण या भूमिकेतूनच बहुधा स्वीकारले जाते. सुनेचे नाते बदलून तिला लेकही मानली गेली तर...! "टू इन वन'ची अपेक्षा पूर्ण होईल की!

आताच्या काळात "सूनबाई' म्हणून कुणी हाक देत नसले, तरी सून ती सूनच. तिला सासुरवाशीण या भूमिकेतूनच बहुधा स्वीकारले जाते. सुनेचे नाते बदलून तिला लेकही मानली गेली तर...! "टू इन वन'ची अपेक्षा पूर्ण होईल की!

सून येते, तेव्हा सासू बहुधा ज्येष्ठ नागरिक झालेली असते. वाढत्या वयातला स्वभाव, वागणे, व्यवहार, सवयी यातल्या शारीरिक- मानसिक त्रुटी असू शकतात. म्हणजे दुसरे बालपण म्हणा ना! त्यात गडबड, धडपड, बडबड, गोंधळलेपण, कंटाळा, भागवा-भागवी अशा नानाविध तऱ्हा येतात. मीही त्याला अपवाद नाही. अशावेळी माझी सून कित्येकदा माझी आई होते, तर कधी सासू. कधी लेक, कधी डॉक्‍टर, कधी वकील... कधी सुगरिणीचा सल्ला देते, तर कधी समुपदेशक होते. अशा अनेक गोष्टी ती एका समयी करीत असते.

घरात धार्मिक कार्यक्रम असले तर विधी, साहित्य, वेळ, सुशोभन यांत कुठे कमतरता तिला आवडत नाही. तर, वयोमानपरत्वे माझी चालवाचालवी असते. पुरण असले तरी शेवयाची खीर लागतेच ना? ती पुरणाची शिजलेली डाळ चाळणीत ओतून चांगली निथळत ठेवा; म्हणजे गूळ घातल्यावर पातळ होणार नाही. माझ्याहून ही अनुभवी की काय? कधी कधी अशावेळी मी तिची थट्टा करते, सासू मी का तू? अन्‌ बाजूला होते.
वाढत्या वयानुसार मोतीबिंदूची शस्त्रक्रिया मलाही चुकली नाही. "ऑपरेशन? अरे देवा!' शब्द ऐकूनच डोळे पाण्याने डबडबले. मी मुलखाची भित्री. डॉक्‍टरांच्या दृष्टीने ते अगदी साधे होते. ""अहो आई, तुम्हाला वाचता यायला हवे ना? डोळ्यांना त्रास होतोय ना? मग याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. आज ना उद्या ते करावेच लागणार. मग उशीर कशाला? तुम्हीच लवकर डोळस व्हाल.'' लहान मुलाला आईने समजवावे तसे अन्‌ लेकीच्या मायेने सून माझा प्रेमळ आधार होते.

वाढत्या वयात आजारपण बहुधा चुकत नाही. त्या वेळी "औषधपाणी- सेवा याबरोबर ती दम भरायलाही मागे नसते. एवढेसं खाऊन अंगात ताकद कशी येईल? तेवढे सूप संपवले पाहिजे. दूध नको तर ओट, नाचणीसत्त्व, लापशी देते ना. नुसत्या एवढ्याशा भात- पोळीने काय व्हायचे? वरण-भाज्या प्रोटिन्स, पौष्टिक आहार नको का पोटात जायला?' इथे ती काळजीवाहू आणि प्रेमळ डॉक्‍टर असते माझी.

एकदा साडीत पाय अडकून पडल्याने हात मोडला होता. शस्त्रक्रिया, प्लॅस्टर सारे सोपस्कार अन्‌ दीड-दोन महिने उजवा कामाचा हात जायबंदी. या "आईसाहेबां'नी साडी बंद करून मला "ड्रेसअप' केले. काविळीसारख्या चेंगट, किचकट आजाराने माझी चांगली तीन-चार महिने छळणूक केली होती. या आजारपणाने मला सुनेच्या हवाली करून टाकले. चिरंजीवांना त्यांच्या व्यवसायात गुंतल्याने मोकळा वेळ कमी. सूनबाईही नोकरी करते, तरी त्यातून वेळ काढून माझ्या घाबरटपणाला लगाम घालायला तीच खंबीर म्हणून साऱ्यावेळी उपचारार्थ तीच धावपळ करते.
घरात काही निमित्ताने पाहुणे-मंडळी, दहा-पाच माणसे यायची असली, की आहे ते सारे ठीकच आहे की, आपलीच माणसे ना? असे कोण परके यायचेय? एवढे दिवसभर राबून घराला अन्‌ स्वतःला इतके काय ते नटवायचे? असा माझा सूर! पण नाही, चार लोक यायचे तर थोडे "डेकोरेशन' नको का? ते लोक यायच्या आत आपणही आवरून सजून राहिलो की प्रसन्न वाटते येणारांना आणि आपल्यालाही.

जेव्हा आम्ही दूर जायचे असू अन्‌ घरात सणवार काही निमित्ताने श्रीखंड- गुलाबजाम- पुरणपोळी असे गोड पक्वान्न झालेले असे. परत जाताना तिचा प्रश्‍न, "चार (पुरण) पोळ्या देऊ का बरोबर?' "अगं, चणाडाळ सोसत नाही आता आणि दुपारी खाऊन झालीय. पुन्हा काहीही गोड कशाला?' "हव्यात का नको? हो की नाही?' तिचा वकिली प्रश्‍न. काही प्रसंगी त्या दोघांच्या नोकरी- व्यवसाय, मुलाचे महाविद्यालय, खूप धावपळ असते त्यांची. तिला त्रास नको या भावनेने माझी प्रस्तावना, "जेवायला यावे की नको? का तुमचेच तू करतेस? ह्यांनाही विचारले नाही,' माझ्या या गुळमुळीत बोलण्याने तिचा आवाज चढतो. "येणार का नाही जेवायला? हो किंवा नाही? मुलाच्याच घरी जेवायला यायचंय ना? परक्‍याचे घर आहे का हे? असे काय तुमच्यासाठी जास्त करावे लागते मला? आणि प्रत्येक गोष्टीत काय बाबांना (सासरे) विचारत बसता? यायचे इकडेच!' तिचा वकिली प्रश्‍न, मुद्दा, सल्ला आणि निर्णयाचा हातोडा यांच्या कानावर आदळतो. अशा प्रसंगी वकिलाबरोबर ती आम्हा उभयतांतला सांकव होते आणि "चर्चा बंद, कृती हवी'चा फलक झळकतो. ती वयाने, अनुभवाने कमी असली तरी तीच अनेकदा आपली गुरू होते. या झाल्या वानगीदाखल काही गोष्टी. अशा अनेक विषयांत, विचारांत, व्यवहारांत "टू-इन-वन' असते सून. माझ्या अनेक विचारांत ती सकारात्मक बदल घडवते!
थॅंक्‍यू सूनबाई!

Web Title: vijaya kale write article in muktapeeth