तीळ-गूळ घ्या अन्‌ ...

विमल लेंभे
शनिवार, 13 जानेवारी 2018

तीळ आणि गूळ. स्नेह आणि मधुरता. नाती आणि संवाद वाढवणाऱ्या या दोन गोष्टी. काळानुसार सणाची मजा बदलली. पण "तिळगूळ घ्या अन्‌ गोड बोला' हे सूत्र कायमच राहिले. सध्याच्या स्पर्धेत तर नेहमीच जिभेवर तीळ-गूळ हवा.

तीळ आणि गूळ. स्नेह आणि मधुरता. नाती आणि संवाद वाढवणाऱ्या या दोन गोष्टी. काळानुसार सणाची मजा बदलली. पण "तिळगूळ घ्या अन्‌ गोड बोला' हे सूत्र कायमच राहिले. सध्याच्या स्पर्धेत तर नेहमीच जिभेवर तीळ-गूळ हवा.

"आपल्या स्वप्नाची पहिलीच संक्रांत ना! मग तयारी कधी करायची? हलव्याचे दागिने आणायला हवेत ना!'' मी सूनबाईला विचारले. अन्‌ झटक्‍यात तिने हा प्रश्‍न सोडविला. ती हसतच म्हणाली, ""अहो, दागिने कशाला आणायचे? फोटो स्टुडिओत आता सर्व तयार असते. तिथले दागिने घालायचे अन्‌ फोटो काढायचा. नाहीतरी नंतर हे दागिने पडूनच राहायचे ना?'' ""बरं बाई, तू म्हणशील तसेच करूया हं!'' इती मी. ""शिवाय तिच्या सासूबाई येतीलच ना सण घेऊन! मला वन्संनी चांदीची वाटी दिली होती ना... तीच मी हलवा भरून त्यांना देईन!'' सूनबाईचे हे ऐकून मी गप्प झाले. मला माझ्या मुलीचा, सुनेचा मी केलेला संक्रांतसण आठवला.

मी स्वतः हलव्याच्या बांगड्या, हार, अंगठी हे दागिने तयार केले. मंगळसूत्र, कंबरपट्टा वगैरे दागिने तुळशीबागेतून आणले. मी आमच्या छोट्या बागेत तिचा फोटोदेखील काढला. तिच्यासाठी काळी जरीची लालचुटूक काठाची साडीही आणली होती.
या संक्रांतीच्या सणावरून मला माझ्या बालपणीची संक्रांत आठवली. जरीचा लाल रेशमी परकर पोलका, पायात छुमछुम वाजणाऱ्या तोरड्या, गळ्यात आईची खऱ्या सोन्याची एकदाणी, डोक्‍यात सोन्याचे गुलाबाचे फूल घालून हलव्याचा डबा घेऊन आम्ही मैत्रिणींकडे जात असू. ओळखीच्या सर्व ठिकाणी हलवा वाटत असू. आम्हालाही भरपूर हलवा-तिळगूळ मिळायचा. तो खात खात "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' म्हणून घसा बसण्याची वेळही आली व गोड गोड खाऊन तोंडही आले. तरी आमची धमाल चालूच असायची! माझी आई घरी तिळाच्या सुबक वड्या, हलवा करायची. तिचा तो पांढरा शुभ्र, टपोरा, काटेदार हलवा बघून तोंडाला पाणी सुटे. घरी संक्रांतीचे हळदीकुंकू असे त्या दिवशी तर खूपच मजा यायची! घरी आलेल्या भगिनींना आई काही ना काही वस्तू भेट द्यायची. चमचे, पातेल्या, पेले, डबे वगैरे भांडी भेट देई. कधी कधी रसरशीत ताज्या भाज्या, मेथी-पालकाच्या जुड्याही वाटायची. याला "लुटणे' म्हणत. आई या वस्तू वाटायची, मग याला लुटणे का म्हणतात, हा प्रश्‍न मला त्या बालवयात पडायचा.

शेजारी पाजारी सगळीकडे हा कार्यक्रम असायचा. प्रत्येकजण आपल्या सोईने दिवस ठरवत. एकूण काय महिना खूप मजेत जायचा. आईची कमाई आम्ही कौतुकाने न्याहाळायचो. एका व्यक्तीची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो, ती व्यक्ती म्हणजे आमचे पोस्टमन काका! रोज कुणा ना कुणा नातेवाइकांचा, मित्रमैत्रिणींचा आम्हाला छोट्या सुबक एक इंच लांबी-रुंदीच्या रेशमाच्या, जरीच्या कापडाच्या रंगीबेरंगी कापडाच्या पिशव्यातून हलवा येई. तो खाताना खूप मजा यायची. मी या छोट्या पिशव्या साठवून ठेवी. खूप छान वाटायचे. आम्ही पण परगावच्या नातेवाइकांना हलवा पाठवत असू. त्या छोट्या पिशव्या मी तयार करी. माझी शिवणकला कामी यायची! गेले, ते सुंदर दिन गेले!

आता पूर्वीसारखे हळदीकुंकू समारंभ होत नाहीत. सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभ होतात. आता नातेवाईक फोनवरून खुशाली विचारतात. शुभेच्छा देतात. पण आता सणांची मजा, तो उत्साह, ती गडबड राहिली नाही. याबद्दल मनाला कुठेतरी खंत वाटते. आदल्या दिवशी भोगी असते. बाजरीच्या भाकरी, तीळ लावलेल्या, त्यावर लोण्याचा गोळा, गाजर, वालाच्या शेंगा, वांगी यांची मिसळीची भाजी, मऊ मऊ मुगाची खिचणी. वा! क्‍या बात है! जेवणाचे ताट बघताच खूप समाधान वाटे. संक्रांतीला गुळाच्या पोळ्या! हे सण रोज का येत नाही असे मनात वाटून जाते.
या संक्रांतीची एका कथा आहे. पूर्वीच्या काळी शंकासुर व किंकरासुर हे दोन महाबलाढ्य, महाभयंकर राक्षस होऊन गेले. ते लोकांना खूप छळत. त्यांनी देवांचाही पराभव केले. तेव्हा सर्व देव आदिशक्तीला शरण गेले. आदिशक्तीने या राक्षसांशी युद्ध करून त्यांना ठार केले व लोकांची त्रासातून मुक्तता केली. तेव्हापासून हा सण साजरा करतात. या दिवशी स्त्रिया एकमेकींना वाण देतात. सुगडात तिळगूळ, हरभऱ्याचे धाटे, उसाचे तुकडे, गव्हाच्या ओंब्या असे पदार्थ त्यात घालून याचे वाण देतात.

आता आसपास शंकासुर वाढले. अनेक शंकांनी मनात आसुरी नाच सुरू केलेला असतो. पण त्या सगळ्यांना जरब बसविणारी आदिशक्ती दिसत नाही. आपापसांतील संवाद वाढला तर शंकासुराचे दमन होईल. समोरच्याशी हसून गोड बोलले की संवाद खुलतो. तीळ-गूळ यांच्यामध्ये आवश्‍यक तो "मधुर-स्नेह' असतो. संवाद वाढविणारा स्नेह. नाती मधुर करणारा गूळ. हाच तीळगूळ द्यावा-घ्यावा.

Web Title: vimal lembhe write article in muktapeeth