हादग्याची खिरापत

वृषाली गोटखिंडीकर, कोल्हापूर. मो.- ९६५७७१५०१९
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

म्हणजे पहिल्या दिवशी एक खिरापत, दुसऱ्या दिवशी दोन, अशा खिरापती करीत. या क्रमाने सोळाव्या दिवशी सोळा खिरापती म्हणून जवळजवळ जेवणच व्हायचे. जी मुलगी ही खिरापत ओळखेल तिचे कौतुक होऊन तिला खिरापतीचा वाटा जास्त मिळत असे. एकीच्या घरचा हादगा झाला की, दुसरीच्या घरी जायचे हादगा खेळायला.

आमच्यावेळी मुलगी सात-आठ वर्षांची झाली की हादगा घालावा, अशी चर्चा घरी सुरू व्हायची. पाटाच्या मागच्या कोऱ्या बाजूवर एक हत्ती काढायचा. त्या हत्तीची पूजा करून त्याच्याभोवती सर्व मुलींनी मिळून गोल गोल रिंगण घालत वेगवेगळी गाणी गायची. या गाण्यातून सर्वांत आधी गणेश देवतेला आवाहन करायचे आणि आपल्या संसाराचा खेळ व्यवस्थित मांडला जावा, अशी प्रार्थना करायची. मग वेगवेगळी भारतीय संस्कृती, इतिहास, पुराण यांच्या कथा सांगितल्या जायच्या. हादग्यातली सर्वांत आवडती गोष्ट म्हणजे गाणी गाऊन झाली की ‘खिरापत’ वाटप! खिरापत म्हणजे वेगवेगळे पदार्थ, जे एकमेकींना वाटून खायचे; पण वाटण्याआधी एक कसरत असे, ही खिरापत ‘ओळखायची’ असे. काही काही घरांत आजी-आई इतक्‍या हौशी असत की, त्या हस्तापासून सोळाव्या दिवसापर्यंत खिरापती पण गाण्यांप्रमाणे वाढवत.

म्हणजे पहिल्या दिवशी एक खिरापत, दुसऱ्या दिवशी दोन, अशा खिरापती करीत. या क्रमाने सोळाव्या दिवशी सोळा खिरापती म्हणून जवळजवळ जेवणच व्हायचे. जी मुलगी ही खिरापत ओळखेल तिचे कौतुक होऊन तिला खिरापतीचा वाटा जास्त मिळत असे. एकीच्या घरचा हादगा झाला की, दुसरीच्या घरी जायचे हादगा खेळायला.

आमच्या घरमालक एक आजी होत्या, ज्यांना आम्ही काकी म्हणत असू. त्यांच्या दोन नाती होत्या. त्या त्यांचा हादगा घालत. शिवाय त्यांना सोळापेक्षाही जास्त गाणीही येत असत. त्यामुळे त्यांच्या घरच्या हादग्याला खूप मुली येत असत आणि त्या इतक्‍या विविध खिरापती करीत की, त्या ओळखायलापण मजा येत असे.

आमची शाळा मुलींची असल्याने शाळेत पण हादगा असे. रोज शेवटचे दोन तास ‘ऑफ’ असत, तेव्हा प्रत्येक वर्गाचा वेगळा हादगा खेळला जात असे. त्या वेळी प्रत्येक इयत्तेच्या दोनच तुकड्या असत. त्यामुळे शाळेच्या ग्राऊंडवर हा कार्यक्रम चाले. वर्गात पस्तीस ते चाळीस मुली असत. रोज दोघी-तिघी खिरापत आणत. त्यामुळे दिवसभर तासाकडे आमचे लक्षच नसे. कधी एकदा हादगा खेळतो, असे होत असे! शाळेत एकदा माझ्या मैत्रिणीने कोणाला पटकन ओळखू नये अशी खिरापत हवी म्हणून छोटे छोटे टोमॅटो आणले होते. आपली खिरापत कोणीच ओळखणार नाही याची तिला खात्री होती; पण हादगा खेळायला म्हणून जेव्हा दुसऱ्या मजल्यावरून सर्वजणी पळत पळत निघाल्या, तेव्हा अचानक मुलींचा धक्का लागून तिच्या हातातील डबा पडला आणि सर्व टोमॅटोनी जिन्यावरून खाली उड्या घेतल्या. मग काय, मुलींच्या पायाखाली तुडवले गेल्याने त्यांची नासाडी झाली. मैत्रिणीला इतके वाईट वाटले. खूप रडली बिचारी. 
एकदा खिरापत म्हणून माझ्या आईने तर बटाटा घालून पुऱ्या दिल्या होत्या.

ही खिरापत ओळखली जाणार नाही, असे मलाही वाटत होते. परंतु मस्त लसूण-मिरची-कोथिंबीर घातलेल्या त्या पुऱ्यांचा खमंग वास सुटला होता. वर्ग सुरू झाल्यावर काही वेळात हा वास वर्गभर पसरला. सर्व मुली अस्वस्थ झाल्या होत्या... आणि मग माझे काहीही न ऐकता त्यांनी दुपारच्या सुटीतच त्या पुऱ्यांवर ताव मारला. माझी खिरापत ओळखण्याआधीच सर्वांच्या पोटात गुडूप झाली होती.