मुरबाडमध्ये गणरायाच्या आगमनात विघ्ने

मुरलीधर दळवी
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुरबाड (जि. ठाणे) : नगर पंचायतीने दुर्लक्ष केल्याने मुरबाड बाजारपेठेतील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा होऊनही तेथे चालणे मुश्किल झाले आहे. व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करणाऱ्या लोकांना व रस्त्यावर दुकाने लावणाऱ्याना हा रस्ता आंदण दिला आहे असे वाटण्यासारखी येथील परिस्थिती आहे. ठिकठिकाणी बांधकाम साहित्य पडले आहे. गावातील खड्ड्यातील रस्ता कि रस्त्यावर पडलेले खड्डे अशी परिस्थिती आहे. ही सर्व विघ्ने पार करीत गणरायाचे आगमन होणार आहे.

मुरबाड बाजार पेठेतील नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर बांधकाम साहित्य पडल्याने गणपती बाप्पाचे आगमन चिखलातून व रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून होणार आहे. मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत ते बुजवण्यासाठी आणलेला दगडाचा चुरा रस्त्याच्या मधोमध पडलेला असल्याने त्या वरून चालणे मुश्कील झाले आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनाला अडथळे आणण्यासाठी हे सर्व कमी पडते म्हणून की काय सिमेंट काँक्रेटचा रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदाराने शिवाजी चौकात मशिदीजवळील रस्ता खणून ठेवला आहे. तेथे पाणी साठून राहत आहे त्या खड्डयातून गणपती बाप्पा नेताना अपघात होण्याची शक्यता आहे. भरीस भर म्हणून नव्यानेच बांधण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांसमोर व्यापाऱ्यांनी व हातगाडीवाल्यांनी भर रस्त्यात बस्तान मांडल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे

मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी बरेच दिवसापासून रजेवर गेल्याचे सांगण्यात येते. याबाबत मुरबाड नागरपंचायतीचे सहायक कार्यालय अधिक्षक संदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्यावरील अडथळे त्वरित दूर करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.