मुंबईतील 11 लाख मतदारांची नावे गायब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नागरिकांची अनास्था कारणीभूत असल्याचा निवडणूक आयुक्तांचा दावा

नागरिकांची अनास्था कारणीभूत असल्याचा निवडणूक आयुक्तांचा दावा
मुंबई - देशातील सर्वांत मोठ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 11 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून नावे गायब असल्याचा फटका मंगळवारी बसला. या संदर्भात निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिला. दुसरीकडे या प्रकाराला मतदारांची अनास्था कारणीभूत असल्याचे राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी "सकाळ'ला सांगितले.

मुंबई महापालिकेसाठी आज मतदान पार पडले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीतून लाखोंच्या संख्येने मतदारांची नावे सापडली नसल्याच्या तक्रारी होत्या. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या 92 लाख मतदारांव्यतिरिक्‍त ही नावे असल्याचे आयोगातून सांगण्यात आले. मुंबईत मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याची शंका राजकीय नेत्यांनी व्यक्‍त केली. 2012 च्या निवडणुकीत समावेश असलेल्या यादीतील तब्बल 11 लाख नावे या वर्षीच्या मतदार यादीतून गायब झाली आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याच्या तक्रारी पक्षांनी केल्या.

मतदार यादीत नाव नसल्याने विशेषतः मालाड, घाटकोपर, वरळी, बोरिवली या ठिकाणच्या मतदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकांनी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीला मतदान केले होते; पण आता नावे यादीतून वगळण्यात आली असल्याच्या मतदारांनी तक्रारी केल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी जाहीर केलेल्या मतदार यादीनुसार मतदान होत आहे. यापूर्वी 16 सप्टेंबर ते 21 ऑक्‍टोबर 2016 च्या दरम्यान विशेष मोहिमेद्वारे निवडणूक आयोगाने मतदारांना आवाहन केले होते. ज्या मतदारांची नावे यादीत नसतील, त्यांनी टाकून घ्यावीत, नाव किंवा पत्त्यात दुरुस्ती असेल, तर तीदेखील करण्याचे आवाहन करण्यात आले होते. वारंवार आवाहन करूनही मतदारांनी अनास्था दाखवली असेल, तर निवडणूक आयोगाचा यात कोणताही दोष नाही.
- जे. एस. सहारिया, राज्य निवडणूक आयुक्‍त

Web Title: 11 lakh voter names missing