बांधकाम खर्चात २२१ लाखांची वाढ

ठाणे
ठाणे

ठाणे - कल्याणच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय व कार्यशाळा इमारत बांधकामासाठी २००८ ला ३७०.६८ लाखांची मंजुरी मिळाली; मात्र बांधकाम सुरू होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी उलटल्यामुळे या खर्चात तब्बल २२१ लाखांची वाढ झाल्याचे उघड झाले आहे. 

या इमारतीच्या बांधकामाला २०१३ मध्ये सुरुवात  झाल्याने इमारतीचा खर्च वाढून ३७०.६८ लाखांवरून ५९२.०८ लाखांवर गेला आहे. राज्य सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने या खर्चाला नुकतीच मान्यता दिली.

या इमारतीत पर्यावरणपूरक विद्युत व्यवस्था उभी करून आर्थिक बचत करण्याची अट घालण्यात आल्याने रखडलेले आयटीआय अधिक महागले आहे. विशेष म्हणजे ९० टक्के बांधकाम पूर्ण होऊनही हे आयटीआय अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, ते अद्याप सुरूही झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कल्याण शहरात १९९५ ला लाल चौकी येथील एका भाड्याच्या जागेत आयटीआय केंद्राची सुरुवात झाली. पुढे खर्च परवडत नसल्याने हे केंद्र उल्हासनगरला हलवण्यात आले.

त्यानंतर कल्याण आयटीआयसाठी प्रशस्त जागेसह त्यावर प्रशासकीय व कार्यशाळा यांच्यासह प्रशिक्षकांच्या निवासाची व्यवस्था अशा केंद्राच्या उभारणीचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

कल्याणमधील उंबर्डे गावाजवळ तब्बल आठ हजार चौरस मीटर जागेवर तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आयटीआय प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे निश्‍चित केले होते. २००७-०८ ला त्यावेळच्या दरसूचीनुसार या केंद्राच्या खर्चासाठी सुमारे ३७०.६८ लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती.

अनेक अडथळे आणि विघ्न आल्यानंतर अखेर २०१३ ला या केंद्राच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. इमारतीच्या व्याप्तीतील वाढ आणि त्यानंतर पाच वर्षांच्या काळात वाढलेली दरसूची यामुळे केंद्राच्या खर्चात सुमारे २२१ लाखांपर्यंत वाढ झाली आहे.

या वाढीव खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी विचाराधीन होता. मुख्य सचिवांच्या बैठकीत या खर्चाला सहमती दर्शवल्यानंतर अखेर वाढीव खर्चाला नुकतीच मान्यता देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com