मुंबईत मेट्रोचे 25 कोटी प्रवासी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

मुंबई - वर्सोवा ते घाटकोपरदरम्यानच्या पहिल्या मेट्रोने 25 कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. मेट्रोच्या उद्‌घाटनापासून केवळ 957 दिवसांत हा टप्पा पार करणारी मुंबई मेट्रो वन कंपनी देशातील पहिली ठरली आहे. 

मुंबई - वर्सोवा ते घाटकोपरदरम्यानच्या पहिल्या मेट्रोने 25 कोटी प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. मेट्रोच्या उद्‌घाटनापासून केवळ 957 दिवसांत हा टप्पा पार करणारी मुंबई मेट्रो वन कंपनी देशातील पहिली ठरली आहे. 

पूर्व व पश्‍चिम उपनगरांना जोडणारी मुंबईतील पहिली मेट्रो जून 2014 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. केवळ 11 स्थानके असलेली ही मेट्रो वेगवान प्रवासामुळे मुंबईकरांच्या पसंतीस उतरली. केवळ दोन वर्षे सात महिन्यांत मेट्रोमध्ये एकूण प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा आकडा 25 कोटींपर्यंत पोचला आहे. देशभरातील इतर मेट्रोच्या तुलनेत हा आकडा कमी कालावधीत गाठण्यात आला, असा दावा कंपनीने केला आहे. दिल्ली मेट्रोला प्रवाशांचा हाच आकडा गाठण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. तुलनेने दिल्ली मेट्रो मार्गाची लांबी 65 किलोमीटर असताना प्रवाशांचा आकडा 25 कोटीपर्यंत पोचण्यासाठी 2002 ते 2007 पर्यंतचा कालावधी लागला. कोलकाता मेट्रो रेल्वे प्रशासनाला हाच आकडा गाठण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. दिल्ली व कोलकाता मेट्रोची तुलना करता हा आकडा जलद गाठण्यात आला. 

मुंबई मेट्रो वन कंपनीला 20 कोटी प्रवाशांचा आकडा गाठण्यासाठी 786 दिवस लागले होते, तर पुढील पाच कोटी प्रवाशांचा आकडा गाठेपर्यंत 171 दिवसांचा अवधी लागला. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम असल्याचा फायदाही मेट्रोला झाला. बेस्ट, रिक्षा, टॅक्‍सीसह ऍपवर आधारित टॅक्‍सींची मेट्रो स्थानकाला जोड मिळाल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. बेस्ट प्रशासनाने मेट्रोच्या साकीनाका स्थानकापासून चांदिवलीपर्यंत बेस्टच्या विशेष फेऱ्या पिक अवरमध्ये सुरू केल्या आहेत. 

Web Title: 25 crore Mumbai Metro passengers