महिलेच्या पोटात २.७५ किलोची गाठ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - महिलेच्या पोटातून पावणे तीन किलोचे फायब्रॉईड (गाठी) काढण्यात पालिकेच्या कूपर रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले. दोन तास ही शस्त्रक्रिया सुरू होती.  

मुंबई - महिलेच्या पोटातून पावणे तीन किलोचे फायब्रॉईड (गाठी) काढण्यात पालिकेच्या कूपर रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले. दोन तास ही शस्त्रक्रिया सुरू होती.  

कूपर रुग्णालयात ३६ वर्षांची महिला वर्षभरापूर्वी उपचारांसाठी दाखल झाली. त्या वेळी सात महिन्यांची गरोदर असल्याप्रमाणे तिच्या पोटाचा आकार दिसत होता. तसेच अति रक्तस्त्रावामुळे तिला अशक्तपणा जाणवत होता. तपासणीत तिच्या गर्भाशयात अनेक गाठी दिसल्या. तसेच गर्भाशयाचा आकार २६ आठवड्यांचा गर्भ असल्यासारखा झाला होता. २.७५ किलोग्रॅमचा एका पूर्ण विकसित बाळाच्या आकाराची गाठ पाहिल्यावर तिच्या कुटुंबीयांनाही धक्काच बसला, अशी माहिती या महिलेवर शस्त्रक्रिया करणारे स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. गणेश शिंदे यांनी दिली. शस्त्रक्रियेदरम्यान व नंतर महिलेला पाच पिशव्या रक्त चढवले. वेळीच शस्त्रक्रिया झाली नसती तर पोटातील गाठींच्या वजनामुळे मूत्रपिंडावर दाब पडून ती निकामी झाली असती, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

महिलांनी मासिक पाळीसंबंधी त्रासांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला डॉ. शिंदे देतात. पोटात होणाऱ्या गाठीमुळे पाळीत त्रास, अतिरक्तस्त्राव, मूत्राशय किंवा मूत्रपिंडावर ताण, शरीरसंबंधावेळी त्रास आदी समस्या उद्‌भवू शकतात. काही महिलांना गर्भ न राहणे किंवा वारंवार गर्भपात होण्याच्या समस्येचाही सामना करावा लागू शकतो, असेही डॉ. शिंदे म्हणाले.

Web Title: 2.75 kg knot in the stomach of the woman

टॅग्स