उल्हासनगरमध्ये ४८२ उमेदवार आजमावणार नशीब

उल्हासनगरमध्ये ४८२ उमेदवार आजमावणार नशीब

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी (ता. ७) शेवटचा दिवस होता. या दिवशी ८१ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. आता ४८२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. यापैकी पॅनेल १८ मधून सर्वाधिक ५४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामुळे २० पॅनेलमध्ये २१ फेब्रुवारीला रणकंदन होणार असून, प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे.

उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. ही बंडखोरी शमवण्यासाठी बंडखोरांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी कंबर कसली होती. त्यामुळे दिवसअखेर ८१ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची समक्ष भेट घेत उमेदवारी मागे घेतली, तर ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरलेल्या १,७३८ उमेदवारांपैकी ६४६ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करत अनामत रक्कम भरली होती. त्यानंतर झालेल्या छाननीत तब्बल ८३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे आता उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात ४८२ उमेदवार उरले आहेत.

पॅनेल १८ मधून सर्वाधिक उमेदवार
२०१२च्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील पॅनेल १८ ने सर्वाधिक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या पॅनेलमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन (आठवले गट), भारिप बहुजन महासंघ, भाजप, पीपल रिपब्लिकन पार्टी व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांत कमी मतांच्या फरकाने या पॅनेलमध्ये निकाल लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

सर्वांत कमी उमेदवार पॅनेल नऊमध्ये
उल्हासनगर महापालिकेच्या पॅनेल ९ मधून अवघे १० उमेदवार रिंगणात आहेत. याच पॅनेलमध्ये भाजपकडून रिंगणात उतरलेले ओमी कलानी यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. यामुळे भाजपकडून दीपा पंजाबी व डिंपल ठाकूर यांच्या जोडीला अपक्ष उमेदवार मनोज लासी यांना घेतले आहे. यामध्ये साई पक्षाकडून सुजाता रिझवानी, आशा इदनानी आणि अजित गुप्ता रिंगणात आहेत. शिवसेनेकडून रिंकू सुनील केदार, मिना भंडारी आणि जितू चैनानी रिंगणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com