डॉ. आंबेडकर स्मारकासाठी एमएमआरडीएचे 50 कोटी

तेजस वाघमारे
बुधवार, 29 मार्च 2017

मुंबई - इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या अर्थसंकल्पात सुमारे 50 कोटींची आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 6245 कोटींची तरतूद केली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

मुंबई - इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आपल्या अर्थसंकल्पात सुमारे 50 कोटींची आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 6245 कोटींची तरतूद केली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सरकारने एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. काही दिवसांपूर्वीच इंदू मिलच्या जमिनीचा ताबा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने (एनटीसी) सरकारकडे दिला आहे. स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी एमएमआरडीएने 2017-18 च्या अर्थसंकल्पात 50 कोटींची तरतूद केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा अर्थसंकल्प लवकरच जाहीर होणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यासाठी एमएमआरडीएने 800 कोटींची तरतूद केली आहे; तर अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 आणि डी. एन. नगर ते दहिसर या मेट्रो 2 अ या मार्गासाठी प्रत्येकी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो 2 ब आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो 4 प्रकल्पांसाठी प्रत्येकी 200 कोटींची तरतूद आहे. मोनो रेलसाठी 208 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवडी ते न्हावा शेवा प्रकल्पांसाठी सुमारे 1200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक स्तरावर जलस्रोतांचा विकास करण्यासाठी सुमारे 300 कोटींची तरतूद केल्याचेही सूत्रांनी सांगितले.