दहशतवादी अबु सालेमला करायचे आहे लग्न...

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

दिल्ली व मुंबई येथील उच्च न्यायालयांनी याआधी यासदृश प्रकरणांमध्ये दोषीस विवाहबद्ध होण्याची अनुमती दिल्याचा दाखला देत सालेम याने हा अर्ज दाखल केला आहे

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये 12 मार्च, 1993 रोजी बॉंबस्फोट घडविण्याचे कारस्थान आखण्यात दोषी आढळलेला दहशतवादी अबु सालेम याने मुंब्रा येथील एका महिलेशी लग्न करण्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जाऊ देण्याची विनंती न्यायालयास केली आहे.

सालेम याने यासंदर्भातील पहिला अर्ज ऑगस्ट 2015 मध्ये केला होता. यानंतर संबंधित महिलेनेही टाडा न्यायालयासमोर सालेमशी विवाहबद्ध होण्यासाठी अनुमती मागितली होती. सालेम याच्याशी संबंध असल्याच्या वृत्तामुळे आपली बदनामी झाली असून आता दुसऱ्या कोणाशी विवाह करणे "अवघड' असल्याचे या महिलेने अर्जात म्हटले होते.

या पार्श्‍वभूमीवर सालेम याच्याकडून आता नव्याने अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिल्ली व मुंबई येथील उच्च न्यायालयांनी याआधी यासदृश प्रकरणांमध्ये दोषीस विवाहबद्ध होण्याची अनुमती दिल्याचा दाखला देत सालेम याने हा अर्ज दाखल केला आहे.