अबू सालेमचा पॅरोल नामंजूर ; कौसर बहारशी लग्नासाठी मागितली रजा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या कुख्यात गुंड अबू सालेमला टाडा न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. तो सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

नवी मुंबई : मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड अबू सालेमचा पॅरोलसाठीचा अर्ज कोकण विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे. तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेमने लग्नासाठी 45 दिवसांची रजा मिळावी यासाठी तळोजा तुरुंग प्रशासनाकडे अर्ज केला होता. या प्रकरणी कैद्यांना रजा मंजूर करण्याच्या अधिसूचनेतील नियमानुसार तो पात्र ठरत नसल्याने त्याच्या रजेचा अर्ज कोकण विभागीय आयुक्तांनी फेटाळला आहे. 

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या कुख्यात गुंड अबू सालेमला टाडा न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. तो सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटासह खंडणी, हत्या यांसारख्या गंभीर गुह्यातही त्याचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्याबाबत तपास सुरू आहे. 
कौसर बहारने अबू सालेमसह लग्नाची तयारी दाखवल्याने त्याने यापूर्वीही पॅरोलसाठी अर्ज दाखल केला होता; मात्र ही मागणीही फेटाळली होती. 

गेल्या आठवड्यात अबू सालेमने पुन्हा एकदा तुरुंग प्रशासनाकडे 45 दिवसांचा पॅरोल अर्ज केला होता; मात्र भारत आणि पोर्तुगाल देशात गुन्हेगार हस्तांतरणाबाबत झालेल्या करारानुसार त्याच्यावर मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. स्फोटक कायदा आणि दहशतविरोधी कायद्यांतर्गत त्याच्यावरील दोषारोप सिद्ध आहेत, अशा परिस्थितीत पॅरोलवर रजा मंजूर करण्याच्या अधिसूचनेतील नियमानुसार तो रजेस पात्र ठरत नसल्याने अबू सालेमचा अर्ज कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी चार दिवसांपूर्वी फेटाळला. 

5 मे रोजी लग्नाची तारीख 

वर्षभरापूर्वी सालेमची ओळख कौसर बहार नावाच्या तरुणीसोबत झाली. तिच्यासोबत लग्नासाठी त्याने 5 मे ही तारीख निश्‍चित केल्याचे म्हटले जात आहे.  

 
 

Web Title: Abu Salem Parol dismiss kausar bahar marriage