ठाणे: "त्या' तथाकथित म्होरक्‍यांवर कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

या बैठकीमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे तसेच रिक्षा स्टॅंडवर रिक्षा उभी न करता इतरत्र रिक्षा उभी करणा-या बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकाच्या कारवाईच्यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणे आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली...

ठाणे - स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाला समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे व त्यांचे इतरत्र नियमन करणे याबाबत आज (शुक्रवार) ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची महत्वपूर्ण चर्चा झाली. दरम्यान अनधिकृत फेरीवाल्यांना अभय देणा-या तथाकथित म्होरक्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच या समस्येच्या मुळाशी जावून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस यंत्रणा सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी सिंग यांनी दिली.

आज सकाळी पोलिस आयुक्त मुख्यालयामध्ये झालेल्या या बैठकीला सह पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलिस आयुक्त सत्य नारायण, पोलिस उपायुक्त लोखंडे, स्वामी, वाहतूक पोलिस उपायुक्त पालवे, महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त मारूती गायकवाड आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे तसेच रिक्षा स्टॅंडवर रिक्षा उभी न करता इतरत्र रिक्षा उभी करणा-या बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकाच्या कारवाईच्यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणे, शहरातील फेरीवाला क्षेत्र वाढविणे, शहरात रिक्षा स्टॅंडची संख्या वाढविण्यासाठी जागेची पाहणी करणे, रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्यासाठी पोलिस उपायुक्त स्तरावर कारवाई करणे व त्यासाठी महापालिकेच्यावतीने क्रेन देणे, सदरची सर्व बेवारस वाहने डायघर येथे स्थलांतरित करणे, पोलिस स्टेशनच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्या डायघर येथे हलविणे आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.

त्याचप्रमाणे स्टेशन परिसरात उच्च प्रतिचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व त्याची लिंक पोलिस मुख्यालयात देण्याबाबत; तसेच कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक कारवाईवेळी अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे वापरण्याबाबतही चर्चा झाली. याबाबत महापालिका आयुक्त, सह पोलिस आयुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

Web Title: Action Plan against street hawkers