वानखेडे स्टेडियममधील तीन विक्रेत्यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - आयपीएल सामन्यांवेळी छापील किमतीपेक्षा जास्त किमतीला खाद्यपदार्थ विकणाऱ्या वानखेडे स्टेडियममधील तीन विक्रेत्यांवर वैधमापन शास्त्र विभागाने कारवाई केली. स्टेडियममध्ये अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी काय कारवाई केली, याबाबत वैधमापन विभागाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विचारणा केली आहे. 

आयपीएल सामन्यांच्यावेळी वैधमापन विभागाने मंगळवारी (ता. 16) स्टेडियमला अचानक भेट देऊन खाद्यविक्रेत्यांकडे चौकशी केली. त्यात पहिल्या मजल्यावरील गरवारे पॅव्हेलियनमधील मे. दानापाणी हे 75 रुपये छापील किंमत असलेले आइस्क्रीम 100 रुपयांना विकत असल्याचे दिसले. गावसकर स्टॅण्डमधील स्टॉल क्रमांक तीनमधील प्रतिनिधी आणि विजय मर्चंट स्टॅण्डमधील स्टॉल क्रमांक एकमधील प्रतिनिधी 55 रुपयांचे आइस्क्रीम 60 रुपयांना विकत असल्याचे निदर्शनास आले. 

या तिघांवर वैधमापन अधिनियमांनुसार कारवाई करून खटले भरण्यात आले आहेत. स्टेडियममध्ये छापील किमतीपेक्षा अधिक पैशांना वस्तूंची विक्री होऊ नये, यासाठी बीसीसीआयच्या अनुपालन अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, याबाबत स्पष्टीकरण देण्याबाबत वैधमापन विभागाने "बीसीसीआय'ला पत्र लिहिले आहे.