उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे मतदारांच्या चर्चेचा विषय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - 'अरे, हा तर आडाणीच आहे. हा तर लखपती आहे, असे हे उद्‌गार केंद्राबाहेर पाहायला मिळत होते. निवडणूक आयोगाने या वर्षी मतदान केंद्राबाहेरच उमदेवारांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या कुंडल्याच लावल्या होत्या. त्यामुळे उमेदवारांच्या व्यक्तिगत आयुष्याचा लेखाजोखा सर्वसामान्य मतदारांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत 227 जागांसाठी 2275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाच्या माहितीचा गोषवारा त्या त्या प्रभागातील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आला आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकावार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, दुसऱ्या क्रमांकावर स्थावर आणि जंगम मालमत्ता आणि तिसऱ्या क्रमांकावर उमेदवारांवर असलेले गुन्हे याची माहिती लावण्यात आली आहे. आपापल्या प्रभागातील उमेदवारांची लावलेली ही जगजाहीर कुंडली पाहून लोक, अरे, हा अडाणी आहे. हा तर जाम पैसेवाला दिसतोय. आणि हा तर गुंडच वाटतोय, असे कळत-नकळत उद्‌गार लोकांच्या तोंडातून बाहेर पडत होते.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमदेवारांपैकी जवळपास 20 उमेदवार अशिक्षित आहेत. तर पाचवीपेक्षा कमी शिक्षण असलेले उमदेवार 100 च्या घरात आहेत. तर नववी पास असलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याचे पाहायला मिळाले. अशा वेळी मतदान करताना मतदारांच्या समोर उमेदवारांचा मांडलेला लेखाजोखा लोकशाही बळकट करण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे राजकीय विश्‍लेषक सांगत आहेत.