समान निधीच्या आश्‍वासनानंतर कर्जमुक्ती बाजूला?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

शिवसेनेने मुद्द्याला बगल दिल्याची चर्चा

शिवसेनेने मुद्द्याला बगल दिल्याची चर्चा
मुंबई - शिवसेना आणि भाजपच्या आमदारांना समान निधी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात लेखी तसेच तोंडी आश्‍वासन दिले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने दिली. त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुखे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री शिवसेनेच्या मंत्र्यांची "मातोश्री'वर बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शिवसेना आमदारांना मिळणारा कमी निधी, याबाबत चर्चा झाली. त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची त्यांच्या "वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी निधीचे समान वाटप करण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे या मुद्‌द्‌यावरून असलेली आमची नाराजी दूर झाली आहे, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीच्या मागणीवर सभागृहात लेखी आणि तोंडी आश्‍वासन दिले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली होती. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातही शिवसेनेने हा मुद्दा लावून धरला होता. या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही भेट घेतली होती; मात्र त्यांच्याकडून कोणतेही ठोस आश्‍वासन मिळाले नव्हते. आता समान निधीचे आश्‍वासन मिळाल्याने शिवसेनेने कर्जमाफीचा मुद्दा बाजूला सारला का, असा प्रश्‍न निर्माण होण्यास वाव आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Web Title: After the release of the funds of the same promise?